मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : शनिवार, 30 जानेवारी 2021 (21:12 IST)

राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याचा फायदा होईल का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 ते 9 मार्चदरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत.
 
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या दौऱ्याविषयी माहिती देताना सांगितलं, "राज ठाकरे 1 ते 9 मार्च यादरम्यानची एखादी तारीख निश्चित करणार आहेत आणि अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी जाणार आहेत."
 
9 मार्चला मनसेचा 15 वा वर्धापन दिन आहे. त्यामुळे यादिवशी राज ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काही मोठी घोषणा करतील काय, याकडेही लक्ष असणार आहे.
 
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं भाजपनं स्वागत केलं आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यावर टीका केली आहे.
 
माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, अयोध्येला सगळ्यांनीच गेलं पाहिजे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याचा आनंद आहे.
 
"नुसतं एका ठिकाणी जाऊन चालत नाही, हिंदू धर्मात चारधाम आहेत. त्यामुळे लोकांनी केवळ अयोध्येत जाण्याऐवजी बद्रीनाथ किंवा पशुपतीनाथ येथेही जावे," असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
 
नवाब मलिक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बाळा नांदगावकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर गेले त्यावेळेस नवाब मलिकांनी असा प्रश्न विचारला नाही. खरं तर मुस्लीम धर्मातही हजसारख्या जागा श्रद्धेच्या मानल्या जातात, तिथं जाणाऱ्यांचा आम्ही आदर करतो. त्यांना आम्ही विचारत नाही की, तुम्ही हजलाच का जाता म्हणून?"
 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
 
त्यांनी म्हटलंय, "राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचे कोणीही राजकारण करू नका. राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे कोणाला रामाचे दर्शन घ्यायला जायचे असल्यास त्याकडे राजकारण म्हणून पाहता येणार नाही."
 
पण, राजकीय प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन अयोध्या दौऱ्याचा राज ठाकरे यांच्या मनसेला खरंच फायदा होईल का? मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना मनसे आणि भाजप युतीची ही नांदी ठरेल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
भाजप-मनसे युती?

राज ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि मनसे एकत्र लढवणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
 
याविषयी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं की, "युती ही समविचारी घटकांची होत असते. विचारधारांवर होत असते. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली किंवा तशा प्रकारचे काही वातावरण झालं तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष व संघटना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगलं वातावरण निर्माण होईल."
 
भाजपसोबतच्या युतीविषयी विचारल्यावर बाळा नांदगावकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "मुंबई महापालिकेतल्या युतीविषयी आमच्यात आताच काही ठरलेलं नाहीये. भाजपनं मनसेच्या दौऱ्याचं स्वागत केलं, त्याचा आम्हालाही आनंद आहे. पण, भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र यायला भाजपला काही अडचण नसेल तर आम्हालाही काही अडचण वाटत नाही."
 
असं असलं तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेसोबत युती करणं भाजपसाठी फायद्याचं ठरेल की अडचणीचं, ते येणार काळ सांगेल, असं मत राजकीय विश्लेषक नोंदवतात.
 
राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांच्या मते, "भाजपला सध्या मित्र पक्षाची गरज आहे हे खरं आहे. कारण राज्यातील तीन पक्ष एकत्र लढल्यास त्याचा काय परिणाम होतो, हे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपनं पाहिलं आहे. तेच महापालिका निवडणुकीत घडू नये, यासाठी भाजप प्रयत्न करेल. त्यामुळे मित्र पक्षाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जवळ घेणं भाजपची गरज आहे."
 
अयोध्या दौऱ्याचा फायदा

आगामी निवडणुका केवळ मराठीच्या मुद्द्यावर लढवता येऊ शकत नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांच्या मनात आस्था निर्माण करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असू शकतो, असं संदीप प्रधान पुढे सांगतात.
 
ते सांगतात, "आगामी निवडणुका केवळ मराठीच्या मुद्दयावर लढवता येणार नाही, याची राज ठाकरे यांना कल्पना आहे. आता पुढील काळात ज्या निवडणुका होत आहेत त्या मुंबई-ठाणे या भागात आहेत आणि या भागात केवळ मराठीच्या मुद्द्यावर उभं राहता येणार नाहीये. कारण या भागातील अमराठी माणसांचा टक्का मोठ्या प्रमाणावर वाढला आहे आणि याच भागात मनसे चांगली कामगिरी करू शकतं.
 
"त्यामुळे एकीकडे मराठीचा मुद्दा, तर दुसरीकडे अयोध्येला जाण्याची घोषणा, असं धोरण मनसे आखताना दिसत आहे. यातून राज ठाकरे यांचा उत्तर भारतीयांच्या मनात आस्था निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. याचा त्यांना किती फायदा होईल, हे नंतर समजेल."
 
"अयोध्या दौऱ्याचा मनसेला एक फायदा होऊ शकतो. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत जो मराठी मतदार हिंदुत्वाचा पुरस्कर्ता आहे आणि भाजप त्यांना जवळचा वाटत नाही. पण, शिवसेना-मनसे यांच्याविषयी त्यांच्या मनात जवळीक आहे, असा मराठी मतदार मनसेकडे वळू शकतो. त्यासाठी मग भाजप आणि मनसे छुपी हातमिळवणी करू शकतात," असं मत पत्रकार किरण तारे मांडतात.
 
ते पुढे सांगतात, "अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं आपण हिंदुत्वाचा पूर्णपणे अंगीकार केल्याची संधी राज ठाकरे यांना मिळाली आहे. आपली हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू झाली आहे, हे दाखवण्यासाठी राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा करायचा ठरवलं असावं. पण, यामुळे खरंच त्यांची हिंदुत्ववादी म्हणून प्रतिमा निर्माण होईल का, हा प्रश्न आहे. कारण सध्या हिंदुत्ववादी नेता म्हणून देशात नरेंद्र मोदींपेक्षा मोठी प्रतिमा दुसऱ्या कुणाचीही नाही."
 
पण, राज ठाकरे पहिल्यापासूनच आपल्या हिंदुत्वावर ठाम आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाचं काय झालं, याविषयी सगळ्यांना माहिती आहे, अशी भूमिका बाळा नांदगावकर मांडली आहे.