गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (18:27 IST)

पारूल परमार : जागतिक पॅरा बॅडमिंटनची राणी

भारताच्या पारूल दलसुखभाई परमार यांनी वय आणि शारीरिक अडचणींवर मात करत पॅरा बॅडमिंटनच्या वुमेन्स सिंगल स्टँडिंग (WS SL3) श्रेणीत जागतिक क्रमवारीतलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे रँकिंग पारूल यांच्याच नावावर आहे.
 
इतर कुठल्याही करियरपेक्षा क्रीडा क्षेत्रातलं करियर सहसा अल्पायुषी असतं. सलग चाळीस वर्ष सक्रीय असणारे अॅथलिट विरळेच.
 
या निकषावर पारूल परमार यांना 'सुपरवुमन' म्हटलं तर वावगं ठरू नये. वयाच्या 47 व्या वर्षीदेखील त्यांनी पॅरा बॅडमिंटनच्या वुमेन्स सिंगल स्टँडिंग (WS SL3) श्रेणीत जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.
 
इतकंच नाही तर हे स्थान इतकं बळकट आहे की जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या मानसी जोशी पारूलपेक्षा तब्बल एक हजार अंकांनी मागे आहे.
 
पारूल परमार 3210 अंकांसह पहिल्या स्थानावर आहेत तर मानसी जोशी 2370 अंकांसह दुसऱ्या स्थानी आहे.
 
बॅडमिंटन मैदानावरच्या आपल्या या उत्तुंग कामगिरीमुळे 2009 सालीच त्यांचा अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
 
संकटांचं संधीत रूपांतर
 
गुजरातमधल्या गांधीनगरमधून येणाऱ्या पारूल परमार यांना लहानपणीच पोलिओ झाला.
 
वयाच्या तिसऱ्या वर्षी आणखी एक संकट ओढावलं. झोक्यावरून पडल्यामुळे त्यांच्या मानेच्या हाडाला दुखापत झाली आणि उजवा पायही फ्रॅक्चर झाला.
 
पारूलसाठी पुढचं आयुष्य म्हणजे संघर्षच होता. त्यांचे वडील बॅडमिंटनपटू होते आणि ते जवळच्याच जिमखान्यात खेळायला जायचे.
 
पारूलसाठी काहीतरी व्यायाम किंवा अॅक्टिव्हिटी असायला हवी, असा सल्ला दिला. त्यामुळे पारूल वडिलांसोबत जिमखान्यात जाऊ लागल्या.
 
पुढे त्या शेजारच्या मुलांसोबतही खेळू लागल्या. सुरुवातीला त्या फक्त बसून मुलांचा खेळ बघायच्या. पण पुढे त्या स्वतःही खेळू लागल्या.
 
इथूनच त्यांना बॅडमिंटनची आवड निर्माण झाली. बॅडमिंटनमधलं त्यांचं कौशल्य पहिल्यांदा हेरलं ते प्रशिक्षक सुरेंद्र पारिख यांनी. त्यांनी तिला खेळण्यासाठी आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं.
 
भक्कम साथ
आपल्याला यशाच्या मार्गावर नेण्यासाठी आई-वडिलांनी आणि भावंडांनी अनेक त्याग केल्याचं पारूल सांगतात.
 
पारूलची भावंडं स्वतःच्या इच्छा बाजूला करून पारूलला प्राधान्य द्यायचे.
 
बॅडमिंटनमध्ये करियर घडवण्यासाठी पारूलला आवश्यक ते सर्व पुरवणं, हेच त्यांच्या कुटुंबाचं एकमेव उद्दिष्ट बनलं.
 
माझ्या क्रीडा कारकिर्दीत कुणीही मी दिव्यांग आहे किंवा इतरांपेक्षा कमी आहे, याची जाणीवही होऊ दिली नाही.
 
एकदा शाळेत पारुलच्या शिक्षकाने, 'मोठी झाल्यावर तुला काय व्हायचं आहे', असं विचारलं. पारूलकडे याचं उत्तर नव्हतं. त्यांनी तो प्रश्न वडिलांना विचारला. त्यावर एका क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले - 'उत्तम बॅडमिंटनपटू'.
 
पुढे पारूल यांनी वडिलांची ही इच्छा पूर्ण करून दाखवली.
सुरुवातीला व्यावसायिक पॅरा बॅडमिंटन खेळू शकतात, हे पारूल यांना माहिती नव्हतं. मात्र, कुटुंबाची त्यांना भक्कम साथ होती.
 
त्यामुळे पॅरा बॅडमिंटनमध्ये करियरला सुरुवात केल्यानंतर कुटुंबाने तर मदत केलीच, शिवाय सोबतचे खेळाडू आणि इतरही अनेकांनी आर्थिक मदतीचे हात पुढे केले.
 
मात्र, मला माझ्या कुटुंबाची आणि समाजाची जशी भक्कम साथ मिळाली तशी अनेक दिव्यांग खेळाडूंना मिळत नाही, अशी खंत पारुल व्यक्त करतात.
 
महत्त्वाचे पुरस्कार
2007 साली पारूल यांना सिंगल्स आणि डबल्स अशा दोन्ही प्रकारांमध्ये जागतिक मानांकनं मिळाली आहेत. 2015 आणि 2017 साली झालेल्या जागतिक चषकांमध्येही त्यांनी पुरस्कार पटकावले.
 
2014 आणि 2018 साली झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्येही त्यांनी सुवर्ण पदकांची कमाई केली. या संपूर्ण काळात या श्रेणीत त्या राष्ट्रीय विजेत्या होत्या.
 
पारुल यांचं संपूर्ण लक्ष आता यावर्षी होणाऱ्या टोकियो पॅरा ऑलिम्पिक्सकडे लागलं आहे. 2009 साली भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंह पाटील यांच्या हस्ते अर्जुन पुरस्कार मिळाला. हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता, असं त्या म्हणतात.
 
आयुष्यात इथवर पोहोचू, असा विचारही कधी केला नव्हत, असं पारूल म्हणतात.