शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (17:35 IST)

IPL Auction: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी तुम्हाला माहितेय का?

देशातल्या सगळ्यात मोठ्या ट्वेन्टी-20 स्पर्धेविषयी तुम्हाला माहितेय का?
 
इंडियन प्रीमिअर लीग या स्पर्धेचं स्वरुप ग्लोबल असलं तरी ही स्पर्धा स्थानिक आहे. मात्र आयपीएलच्या छायेत होणारी एक स्पर्धा खऱ्या अर्थाने भारतव्यापी असते. आयपीएलमध्ये चमकणारे अनेक खेळाडू पहिल्यांदा या स्पर्धेच्या व्यासपीठावर छाप उमटवतात. आयपीएलसारखा जनाधार नसला तरी ट्वेन्टी-20 फॉरमॅटकरता नवनवीन खेळाडू समोर आणणाऱ्या या स्पर्धेचा घेतलेला आढावा.
 
स्पर्धेचं स्वरुप कसं असतं?
बीसीसीआयने 2006-07 मध्ये या स्पर्धेची सुरुवात केली. त्यावेळी 27 रणजी संघ 5 गटात विभागण्यात आले होते. गटवार अव्वल आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघ बाद फेरीत जातात.
 
2012-13 मध्ये नॉकआऊट फेरीचं रुपांतर सुपरलीग फेरीत करण्यात आलं. 2015-16 मध्ये सर्व संघांना चार गटांमध्ये विभागण्यात आलं. 2016-17 हंगामात एकत्रित संयुक्त झोन तयार करण्यात आलं.
 
2018-19 हंगामात नव्या संघांची भर पडली. झोनल सिस्टम रद्द करण्यात आली. सर्व संघ पाच गटांमध्ये विभागण्यात आले. गटवार अव्वल आणि दुसऱ्या क्रमांकाचे संघ सुपर लीग स्टेजसाठी पात्र ठरतील. सुपर लीगचे गटाच्या विजेत्यांमध्ये अंतिम मुकाबला होतो.
 
किती संघ सहभागी होतात?
देशभरातले तब्बल 38 संघ या स्पर्धेत सहभागी होतात. देशाच्या कानाकोपऱ्यात मॅचेस होतात.
 
संघांची आणि मॅचेसची संख्या प्रचंड असल्याने सगळ्याच मॅचचं थेट प्रक्षेपण शक्य नसतं. मात्र नॉकआऊट राऊंडच्या मॅचेस टीव्हीवर पाहायला मिळतात.
 
गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर ही स्पर्धा झाली होती. आंतरराष्ट्रीय वेळापत्रक, देशांतर्गत बाकी स्पर्धा, हवामान, मैदानांची उपलब्धता हे सगळं लक्षात घेऊन स्पर्धेचं नियोजन केलं जातं. साधारण महिनाभर ही स्पर्धा चालते.
 
सय्यद मुश्ताक अली कोण आहेत?
सय्यद मुश्ताक अली हे भारताचे माजी क्रिकेटपटू. 11 टेस्टमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. अल्प कारकीर्दीतही त्यांनी 612 रन्स करताना 2 शतकं 3 अर्धशतकं झळकावली.
 
विदेशी भूमीवर कसोटीत शतक झळकावणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले. त्यांनी 1936 मध्ये इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड इथं 112 रन्सची खेळी केली होती.
 
फर्स्ट क्लास क्रिकेटचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव होता. दहाहून अधिक संघांचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी 226 मॅचमध्ये 13,213 रन्स केलया. यामध्ये 30 शतकं आणि 63 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांच्या नावावर 162 विकेट्सही आहेत.
 
विजय मर्चंट आणि त्यांनी सलामीला येत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. मुश्ताक अली त्यांच्या आक्रमक आणि खणखणीत फटकेबाजी ओळखले जात.
 
1964 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. मेरलीबोन क्रिकेट क्लबने त्यांना आजीवन सदस्यत्व दिलं.
 
त्यांच्याप्रती आदरांजली म्हणून अखिल भारतीय स्वरुपाच्या ट्वेन्टी-20 स्पर्धेल त्यांचं नाव देण्यात आलं.
 
या स्पर्धेचं महत्त्व काय?
देशांतर्गत सर्व खेळाडू या स्पर्धेत खेळतात. अखिल भारतीय स्वरुपाची स्पर्धा असल्याने या स्पर्धेत केलेल्या प्रदर्शनाची देशभर चर्चा होते.
 
आयपीएल संघांचे टॅलेंट स्काऊट या स्पर्धेकर्डे फीडर स्पर्धा म्हणून पाहतात. टॅलेंट स्काऊट मंडळी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष ठेऊन असतात.
 
काही खेळाडूंना ट्रायलसाठी बोलावलंही जातं. काहींना लिलावावेळी संघात सहभागी करून घेतलं जातं.
 
शेवटच्या हंगामातील मानकरी कोण?
2019-20 हंगामात कर्नाटकसाठी खेळणाऱ्या देवदत्त पड्डीकलने 12 मॅचेसमध्ये 64.44 सरासरीने आणि 175.75 स्ट्राईकरेटने 580 रन्स केल्या. यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. देवदत्तला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने ताफ्यात सहभागी करून घेतलं. देवदत्त यंदाच्या आयपीएल हंगामात सातत्याने रन्स करतो आहे.
 
सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचा अविभाज्य भाग आहे.
 
सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी असलेला आर.साई किशोर चेन्नईकडे होता. मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. श्रेयस गोपाळ राजस्थान रॉयल्सकडून तर हर्षल पटेल दिल्लीकडून खेळतो आहे.
 
गेल्या वर्षी कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात अंतिम मुकाबला रंगला होता. या सामन्यात के.एल. राहुल, देवदत्त पड्डीकल, मयांक अगरवाल, मनीष पांडे, करुण नायर, के. गौतम, श्रेयस गोपाश, जगदीश सुचिथ, वॉशिंग्टन सुंदर, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवीचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, आर.साई किशोर, टी. नटराजन असे मोठे खेळाडू सहभागी झाले होते.
 
आजवरचे विजेते
आतापर्यंत कर्नाटक, बडोदा आणि गुजरात संघांनी प्रत्येकी दोनदा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. रणजी स्पर्धेची 41 जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबईला या स्पर्धेच्या एकाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. गेले दोन हंगाम कर्नाटकचं जेतेपदावर वर्चस्व आहे.
 
2006-07- तामिळनाडू
 
2007-08- स्पर्धा झाली नाही
 
2008-09- स्पर्धा झाली नाही
 
2009-10- महाराष्ट्र
 
2010-11-बंगाल
 
2011-12-बडोदा
 
2012-13- गुजरात
 
2013-14-बडोदा
 
2014-15-गुजरात
 
2015-16-उत्तर प्रदेश
 
2016-17- पूर्व विभाग
 
2017-18-दिल्ली
 
2018-19-कर्नाटक
 
2019-20-कर्नाटक