विवाहाच्या वाटेवर (भाग 2)
सुधाच्या मुलीच्या लग्नातील रूखवत हा लग्नाच्या वेळी एक चर्चेचा विषच झाला. सुधाच्या विहीणबाईंनी नम्रतापूर्वक सांगितलं होतं, आम्हाला रूखवत देऊच नका. घरात पुष्कळ स्टीलची भांडी आहेत आणि हा आमचा एकुलता एक मुलगा आहे. तेव्हा तुम्ही भांडय़ाच्या खर्चात पडू नका. आजच्या जगात अशी माणसं खरंच विरळाच. नाहीतर पोटमाळ्यावर पोत्यात का भांडी ठेवाचं होईना पण मुलीच्या आई बाबांकडून सगळी भांडी घ्यायची आणि लग्नाच्या वेळी हेच दिलं नाही तेच दिलं नाही म्हणून भांडत बसणार्या खूप बायका आहेत. पण आता समाज सुशिक्षित होतो आहे. मुलं-मुली दोघेही भरपूर पगार कमवत आहेत त्यामुळे ‘रूखवत’ प्रकार बंद झाल्याचेही पाहण्यात येत आहे.सुधाला एकच मुलगी असल्याने तिने मुलीसाठी वेगवेगळे काचेचे सुबक, सुंदर सेट घेतले होते. विविध प्रकारच्या आणि सतत लागणार्या पिशव्या, पर्स असे प्रकार होते. घरात दिवाण-सोफा यावर घालायचे सुंदर सेट, पडदे, सर्व्हिंग बाऊल्स्, टी-पॉय, फ्लॉवर-पॉट असं काही बाही दिलं. या वस्तू बदलून घरातही वापरता येतात. यातील वाया जाणारं पडून राहणारं काहीच नव्हतं. घरात बदल म्हणून सारं वापरता येणारं आणि चार पाहुणे जास्तीचे आले तर डिनर सेट वगैरे उपयुक्त ठरणारा होता. सुधाच्या रूखवताचं कौतुक तित्या विहीणबाईंनी पुन्हा पुन्हा केलं. त्याही तितक्याच गुणग्राहक होत्या. पूर्वी पाच ताटं, दोन तांबे, पाच वाटय़ा, दोनफुलपात्री, तेला-तुपाचं तामलं, तेल हळदीसाठी वाटय़ा, फराळाचा डबा, समई, बाळकृष्ण, अन्नपूर्णा असं सगळं मोजकं सामान देण्याची प्रथा होती. पण पुढे पुढे अगदी चमच्यापासून वॉशिंग मशिनपर्यंत त्यात दिवाण, गोदरेज कपाट अन्न पिठाची चक्की आलीच इतकं सामान देण्याची प्रथा काही समाजात रूढ झाली. बदलच्या काळानुसार आता हळू हळू रूखवत प्रकार मोजक्याच वस्तूंचा होऊ लागला आहे. रूखवतात काय द्यावं हे मुलीच्या आई-वडिलांवर अवलंबून आहे. श्रीमंत माणसांना रूखवत मांडायला, रूखवताची कार्यालयातील जागा सुद्धा अपुरी पडते. असो, पण सुधाकडचा रूखवत आगळा वेगळा ठरला.तिने आधीच ‘महिरपी’ घरी मस्त बनवल्या होत्या. आणि आदल्या दिवशी सीमान्त पूजनाचे नवरा-नवरीचे हार कुठेतरी पडून राहतात म्हणून तिच्या कल्पक मैत्रिणीने सार्या मानाच्या पंगतीला फुलांच्या महिरपीने पाना-फुलांनी पंगत सजवली होती. शेवटी कृत्रिम सजावटीपेक्षा ताज्या फुलांची सजावट कितीतरी सुंदरच!अशा विविध कल्पना तुम्हालांही सुचतात का ते पाहा आणि वेगळं नावीन्यपूर्ण काय करता येतं ते पाहा. सार्यांनाच विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने सजावट करावी लागते. आपल्यातील कल्पकतेचा असाही उपयोग करू या.अनुपमा पंडित