स्वातंत्र्यदिनाचा घोळ
ND
भारताचार्य सु.ग. शेवडे २६ जानेवारी १९५० या दिवशी घटना तयार झाली. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी खर्या अर्थाने भारत स्वतंत्र नव्हता, अशा अर्थाचे पुरावे, इतिहासात मिळतात. १५ ऑगस्ट या दिवशी भारताची फाळणी झाली आणि असंख्य जिवांची आक्रंदने सार्या जगाने ऐकली ! मात्र ऐकू गेली नाहीत, ती नेहरूंना आणि त्यांच्या काँग्रेसला ! हा स्वातंत्र्यदिवस नव्हताच मुळी, तर तो होता `वासाहतिक स्वराज्य दिन' ! म्हणून २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्यदिन का मानू नये, असा प्रश्न आपल्यासमोर घेऊन आले आहेत इतिहासाचे अभ्यासक व प्रथितयश प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे !
१९१२ मध्ये बंगालची फाळणी मागे घेण्यास भाग पाडले
राष्ट्र म्हणजे एकमेकांच्या सुखदु:खांशी समरस होणारा लोकसमूह. गांधींच्या उदयापूर्वी हिंदुस्थान हे `राष्ट्र' होते. नंतर तो केवळ एक भूभाग वा देश म्हणून अस्तित्वात आला, असे म्हणावे लागते; कारण १९०५ मध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्झनने केली. फाळणीचे हे दु:ख संपूर्ण राष्ट्राने आपले मानले. तशी जाणीव असणारे नेते तेव्हा होते. म्हणूनच पंजाबमधून लाला लजपतराय, मुंबई प्रांतातून लोकमान्य टिळक आणि मद्रास प्रांतातून चिदंबरम् पिल्ले यांसारखे नेते या फाळणीविरुद्ध जनमत निर्माण करू लागले. परिणामी १९१२ मध्ये ती फाळणी मागे घेण्यात आली.
फाळणीनंतर भारतियांवर झालेले भयंकर अत्याचार ही स्वातंत्र्याची मिळकत होती काय ?
१९४७ मध्ये त्याहून भयंकर फाळणी झाली. अर्धा पंजाब, संपूर्ण सिंध, बलुचिस्तान आणि अर्धा बंगाल एवढा भूभाग पाकिस्तान म्हणून निर्माण झाला. गांधी आणि त्यांचा उपग्रह असलेले नेहरू यांनी तोवर राष्ट्राला `देश' करून टाकले होते. त्यामुळे १४ व १५ ऑगस्टच्या रात्री एका भागात जीवित व मालमत्ता यांच्या विद्ध्वंसाचे थैमान चालू असतांना उर्वरित भारतात ढोल, ताशे, लेझिम आणि ड्रम वाजवत बेहोषीने नाचत स्वातंत्र्यदिन साजरा केला जात होता. काही भाग नरकयातनेत होरपळत असतांना नेहरू नियतीशी झालेला संकेत सांगत होते.
अरुण सारथी यांच्या पुस्तकातील उल्लेख
हे सर्व विचार मांडले आहेत अरुण सारथीं यांनी. त्यांचे नवे पुस्तक पुण्याच्या अस्मिता प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. `पंडित जवाहरलाल नेहरू : खिलाफत ते काश्मीर', या पुस्तकात मेंदूला झिणझिण्या आणणार्या बर्याच गोष्टी आहेत. अरुण सारथी हे साक्षेपी विचारवंत आणि इतिहासाचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या अभ्यासाची व निष्कर्षांची पद्धत भन्नाट आहे. प्रस्तुत पुस्तक हे विचारवंतांना आव्हानात्मक ठरेल, हे नक्की.
उदाहरणादाखल त्यांनी स्वातंत्र्यदिनाबद्दल मांडलेली धक्कादायक वस्तूस्थिती देत आहे. यावर अधिक अभ्यास व चर्चा अपेक्षित आहे.
१५ ऑगस्ट १९४७ ची घटनात्मक स्थिती
१५ ऑगस्टची नेमकी घटनात्मक परिस्थिती काय होती, याचा धांडोळा आजतागायत घटनातज्ञांनी, इतिहासकारांनी किंवा राजकीय पंडितांनी दुर्दैवाने घेतलेला नाही. त्या दिवशी भारताला स्वातंत्र्य नव्हे, तर `वासाहतिक स्वराज्य' मिळाले होते. हिंदुस्थानचे सम्राट (एम्परर) सहावे जॉर्ज, भारताचे राजे (किंग ऑफ इंडिया) हे पद भुषवू लागले. त्या नात्याने त्यांनी माऊंट बॅटन यांची भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक केली.
१५ ऑगस्ट १९४७ हा स्वातंत्र्यदिन नव्हे, तर `वासाहतिक स्वराज्य दिन' !
यावरून हे स्पष्ट होईल की, १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला जे मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते. तो स्वातंत्र्यदिन नसून `वासाहतिक स्वराज्य दिन' होता. तरीही त्या दिवसाला स्वातंत्र्यदिन संबोधून नेहरूंनी जनतेची जी घोर फसवणूक केली, ती दरवर्षी थाटामाटाने तशीच चालू आहे.
