मंगळवार, 31 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By मनोज पोलादे|

मारूती चितमपल्ली

अरण्ययात्री लेखक

प्रसिद्ध निसर्ग साहित्यिक
निसर्गाचा मराठी साहित्याशी संबंध केवळ वर्णनापुरते होते. पण मारूती चितमपल्लींनी निसर्गाला नायकत्व दिले. त्याची विविध रुपे, त्याच्या भावभावना, सगेसोयरे साहित्यात आणले. लोकांना जंगलसाक्षर करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.

वनाधिकारी म्हणून नोकरी करताना आपल्या कामाकडे त्यांनी नोकरी म्हणून न पाहता आवड म्हणून पाहिले. त्यामुळेच ते चांगले काम करू शकले. या काळात जी माहिती व जे अनुभव मिळाले ते त्यांनी लेखनात आणले.

कर्नाळ्याच्या अभयारण्यात असताना पक्षीतज्ज्ञ डॉ. सलिम अली यांचा सहवास लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्षी, वन्यजीव निरिक्षणातले शास्त्रशुद्ध बारकावे जाणून घेतले. त्यानंतर मग जंगलात रमलेल्या चितमपल्लींनी तेथेच आपले विश्व शोधले.

इतरांच्या दृष्टीने जंगलातील नीरस, एकाकी, रूक्ष जीवन चितमपल्ली यांनी आनंददायी बनविले. यातूनच साहित्य निर्मिती घडली. चितमपल्ली यांची लेखनशैली सरळ, साधी, प्रवाही व थेट संवाद साधणारी आहे. शब्दांचे बुडबुडे व कल्पना विलासाला त्यात स्थान नाही.

त्यांचे साहित्य निसर्ग, वन्यजीव, पशु, पक्षी यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास आहे. कारकीर्दीच्या सुरवातीस त्यांनी पक्षी जाय दिगंतरा हे पुस्तक लिहिले. तेव्हापासून आजतागायत त्यांची निसर्ग लेखनाची आवड व उत्साह कमी झालेला नाही.

विदर्भातील मेळघाट, ताडोबा, पेंच, नवेगाव, कर्नाळा या वन्यप्राणी व पक्षी अभयारण्यात त्यांची बहुतांश कारकिर्द गेली. या प्रत्येक ठिकाणचा अनुभव त्यांच्यातील लेखकास काहीतरी देणारे ठरला. त्यातूनच त्यांची पुस्तके आकाराला आली.

चितमपल्लीही वाचनवेडे आहेत. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर त्यांनी संस्कृत पाठशाळेत जाऊन संस्कृतचे पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेतले आणि संस्कृत साहित्याचे विपुल प्रमाणात वाचन केले. हे वाचन त्यांनी रसडोळस वृत्तीने केले. हे वाचन करीत असताना त्यांच्यातला वनविद्येचा अभ्यासक सदैव जागता राहिला आहे.

त्यांना आठ-नऊ भाषा येतात; परंतु इतर कोणासही न येणारी प्राणी आणि पक्ष्यांची भाषाही येते, समजते. नागझिरा अभयारण्य ही त्यांचीच निर्मिती, त्यांचे आवडते जंगल.चितमपल्लींचे महत्त्वाचे काम म्हणजे पक्षिकोशाचे. गेली तीन दशके ते त्यासाठी मेहनत घेत होते.

या कोशात मुख्यत्वे अनेक स्थानिक भाषांमधील अपरिचित पक्ष्यांची नावे आहेत. स्थानिक भाषांमधील ध्वनिवाचक, काव्यमय, रंगवाचक, स्थलदर्शक, व्यक्तिविशेष, वनस्पतीविषयक, कोकणी व आदिवासी नावांचा खजिना मिळतो. कोशात जातिवाचक, व्यवसायवाचक व नातीगोती दर्शवणारी नावेदेखील पक्ष्यांना दिलेली दिसतात.

चकवा चांदण या आत्मचरित्रात्मक ग्रंथातून आपल्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. चितमपल्ली यांनी निसर्ग साहित्याचा प्रांत एवढा समृद्ध केला की, याची दखल साहित्य विश्वाला घेणे भाग पडले. त्यातूनच मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा बहूमान त्यांना प्राप्त झाला.

सोलापूर येथे झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साहित्याच्या क्षेत्रात केलेल्या अनमोल कामगिरी करिता त्यांना महाराष्ट्र शासनाच्या साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मारूती चितमपल्ली यांचे साहित्य ः

चकवा चांदण, पक्षी जाय दिगंतरा, अरण्यवाचन, ज जंगलाचे देणे, पाखरमाया, नागझिर्‍याच्या जंगलात, रानपाखरं आदी.