शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (20:41 IST)

तर महाराष्ट्र पण मागे राहणार नाही : अब्दुल सत्तार

सीमावाद अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र मराठी माणसाची अडवणूक केली, तर महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. दोन्ही राज्यांमध्ये एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे सीमावाद करू नये. केंद्र सरकारने याची तात्काळ दखल घ्यावी. आणि महाराष्ट्राला न्याय मिळवून द्यावा. कारण जर अरे ला का रे झालं तर महाराष्ट्र पण मागे राहणार नाही. मराठी माणसावर अन्याय झाला तर राज्यातील एक ही पक्ष एकही माणूस तडजोड करणार नाही. कर्नाटक सरकार विरोधात सर्वांनी एकत्र यावं, एकत्र लढलो तर केंद्र सरकारलाही न्याय देण्यासाठी पुढे यावं लागेल.

अजित दादा असो किंवा कुणीही दादा असो सर्वांनी एकत्र येवून महाराष्ट्राच्या हिताचे बोलावे, पुढाकार घ्यावा. महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी एकत्र येण्याची भूमिका घ्यावी. सरकार सीमा भागातील नागरिकांच्या पाठीशी असून महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या कर्नाटकच्या लोकांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी. अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी  केली आहे.
 
उद्धव ठाकरे यांच्या टीका 
अडीच वर्षे सरकार बसलं मात्र परदे मैं रहने वाले आता बाहेर पडत आहे. आता सर्व जण बाहेर फिरत आहेत. प्रत्येकाने बाहेर फिरायला पाहिजे. ते पक्ष वाढीसाठी चांगलं असतं. पण गुजरातमध्ये जे काँग्रेसचे हाल झाले, तेच महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाचे होतील. त्यावेळी उद्धव साहेबांची तब्येत बरोबर नाही, रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, हे सांगणारा मी होतो’ असं सत्तार म्हणाले. 
 
नक्कल करायलाही अक्कल लागते
सुषमा अंधारे यांनी सत्तारांची नक्कल केली होती त्यावर त्यांना प्रश विचारला असता. नक्कल करायलाही अक्कल लागते. असं प्रत्युत्तर सत्तारांनी दिले. जी माझी नक्कल करते, त्या बहिणीबद्दल मी काही बोलणार नाही. पण नक्कल करायलाही अक्कल लागते. त्यांनी बोललं की आमची मते वाढतात, त्यांनी अजून बोलावं, असं सत्तार म्हणाले.
 
फुले-आंबेडकर यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका झाल्या. त्यांच्या या वक्तव्याबाबत पाटलांनी माफीही मागितली आहे. दरम्यान या विषयावर ‘बोलतांना सर्वांनी काळजी घ्यावी, मी जे बोललो ते ग्रामीण भागात बोलतात, आता तसं पुन्हा बोलणार नाही असं म्हणत सत्तारांनी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचेही स्पष्टीकरण दिले. त्यासोबतच अब्दुल सत्तार असो किंवा कुणीही असो महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करू नये,’ असा सल्लाही दिला.
 
संजय राऊत यांना कुलुपाची आठवण येतेय
सध्याचे एकमेव मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी सीमाप्रश्नी तोंड उघडले नाही. त्यांच्या गटाला जी निशाणी दिली आहे ती, ढाल तलवार न देता कुलूप द्यायला हवी असा घणाघात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता त्या उत्तर देताना, ‘संजय राऊत यांना कुलुपाची आठवण येतेय, ते काही दिवस आतमध्ये राहून आलेत. माणूस आत मध्ये राहून आला, की त्याला कुलूप चावीची जास्त आठवण येते’ असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

Edited by- Ratnadeep Ranshoor