1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Mango and Cashew Growers in Konkan Face Crisis

कोकणातील आंबा-काजू उत्पादक अडचणीत: बोगस खते आणि कीटकनाशकांमुळे बागायतदारांचे नुकसान; राजू शेट्टी आक्रमक भूमिकेत

कोकणातील आंबा-काजू उत्पादक अडचणीत: बोगस खते आणि कीटकनाशकांमुळे बागायतदारांचे नुकसान; राजू शेट्टी आक्रमक भूमिकेत
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना बोगस व निकृष्ट खते व औषधांचा मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांनी निकृष्ट दर्जाच्या खते, किटकनाशके, वनस्पती वाढ नियंत्रक (PGR) आणि बुरशी नाशकांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन केले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकट्या औषधांसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांची खरेदी केली होती. कंपन्यांकडून योग्य वापर मार्गदर्शन न मिळाल्याने ही स्थिती निर्माण झाली.
 
पुण्यातील कृषी आयुक्तालयात झालेल्या बैठकीत राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले की,“कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व किटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि चुकीच्या औषध वापरामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने नुकसानभरपाई द्यावी.”
 
राजू शेट्टींच्या प्रमुख मागण्या:
संबंधित औषध कंपन्यांवर गुन्हे दाखल करणे
प्रभावित शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देणे
औषध कंपन्यांच्या किंमतींवर राज्य सरकारचे नियंत्रण असावे
दर्जा नियंत्रण विभागाने केवळ काही कंपन्यांची तपासणी करणे थांबवून सर्व बोगस कंपन्यांवर कारवाई करणे
 
शेट्टी यांनी असाही मुद्दा उपस्थित केला की, आंबा पिकासाठी सुमारे ७० कंपन्या औषधे विकतात. रोख पैसे दिल्यास ६०-६५ टक्के सवलत दिली जाते, परंतु दर्जा नियंत्रण विभाग फक्त थोड्या कंपन्यांची तपासणी करतो. यामुळे बोगस उत्पादने बाजारात मुक्तपणे विकली जात आहेत. 

बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे इतर पदाधिकारी, रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आंबा उत्पादक शेतकरी, दर्जा नियंत्रण विभागाचे संचालक सुनील बोरलकर, दापोली कृषी विद्यापीठातील संशोधक अनिल देसाई आदी उपस्थित होते.
 
कोकणातील आंबा-काजू शेतकरी सध्या नैसर्गिक आपत्तींसोबतच या निकृष्ट औषधांच्या समस्येने मोठ्या संकटात सापडले आहेत. राजू शेट्टी यांनी कृषी आयुक्तांकडे याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Photo: Raju Shetti Facbook
About Writer
वेबदुनिया न्यूज डेस्क