1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Rumors Surface That Some of Uddhav Thackeray's MPs Are in Contact with Shinde

'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा: उद्धव ठाकरेंचे काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या अफवा

'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा: उद्धव ठाकरेंचे काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या अफवा; संजय राऊत यांची 'रोखठोक' प्रतिक्रिया सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात उद्धव ठाकरे (UBT) गटातील काही खासदारांसोबत गुप्त बैठक घेतली. ही बैठक रात्री उशिरा सुरू झाली आणि सकाळपर्यंत चालली. या चर्चेनंतर उद्धव ठाकरे गटातील खासदारांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम्हाला या बैठकीची माहितीच नाही आणि आमचा याच्याशी काहीही संबंध नाही.
 
उद्धव ठाकरे गटातील खासदारांची प्रमुख प्रतिक्रिया:
संजय जाधव (परभणी लोकसभा खासदार):“मी दोन दिवसांपासून पुण्यात आहे, त्यामुळे त्या बैठकीचा माझ्याशी काहीही संबंध नाही. मी कोणत्याही बैठकीला गेलो नाही, ना कुणाशी संपर्क केला आहे. माझे काम नेहमीप्रमाणे चालू आहे. सध्या तरी पक्षांतराचा काहीही प्रश्न नाही.”
 
नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली लोकसभा खासदार):“मी अशा कोणत्याही बैठकीत उपस्थित नव्हतो. या बातम्यांना काही अर्थ नाही. अशी बैठक झाली की नाही याचीही मला माहिती नाही.”
 
संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम लोकसभा खासदार):“मी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन कोणत्याही बैठकीत उपस्थित नव्हतो. मला ना निमंत्रण होते, ना कोणी बोलावले होते. त्यामुळे त्या बैठकीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मी गेलोही नाही.”
 
संजय दिना पाटील:“अशी कोणतीही बैठक झालेली नाही. आमचे नेते अरविंद सावंत यावर पत्रकार परिषद घेऊन उत्तर देतील. त्यासाठी थांबा.”
 
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी ऑपरेशन टायगरबाबत सूचक विधान केले आहे. ते म्हणाले,
“शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ऑपरेशन टायगर निश्चितपणे राबवणार आहे. मात्र हे करताना सांगून किंवा जाहीर करून करण्यात येणार नाही. ज्या दिवशी ठरेल, त्या दिवशी उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसेल. त्यादिवशी त्यांचा खेळ खल्लास होईल!”
 
हे विधान नाशिकमध्ये केले असून, सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटातील खासदार फोडण्याच्या चर्चेला त्यांनी पुन्हा एकदा हवा दिली आहे. शिरसाठ यांनी हे बोलताना “डॉक्टरकी”चा उल्लेख करत शिंदे योग्य वेळ पाहून अचूक ‘फायर’ करतात, असा इशाराही दिला.
 
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आपल्या खासदारांची बैठक घेतली होती, ज्यात सर्व खासदारांनी पक्षाशी निष्ठा ठेवण्याची ग्वाही दिली होती. तरीही ठाण्यातील या कथित मध्यरात्रीच्या बैठकीमुळे ‘ऑपरेशन टायगर’ अर्थात ठाकरे गटातील खासदारांना आपल्या बाजूने वळवण्याच्या प्रयत्नांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
पुढील लेख
वैद्यकीय प्रमाणपत्राच्या बदल्यात लाच घेतल्याप्रकरणी ठाण्यात डॉक्टरला अटक