IND vs PAK: सामन्या आधी पाकिस्तानला दणका, शाहीननंतर आणखी एक खेळाडू जखमी
आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तान विरुद्ध करणार आहे. 28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ जवळपास सज्ज झाले आहेत, मात्र सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम जखमी झाला आहे. सराव सामन्यादरम्यान त्याला ही दुखापत झाली. पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आधीच संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. संघातील त्याच्या अनुपस्थितीने पाकिस्तानी खेळाडूंचे मनोधैर्य खचले आहे.
आता मोहम्मद वसीमलाही वगळल्याने पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी कमकुवत होऊ शकते. मोहम्मद वसीम दुखापतग्रस्त असून तो भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर जाऊ शकतो, असा दावा अनेक माध्यमांनी केला आहे. मात्र, पीसीबीकडून याबाबत कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
अहवालानुसार, 21 वर्षीय मोहम्मद वसीमला सराव सत्रादरम्यान पाठीला दुखापत झाली आणि तो भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही. वसीम या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर पाकिस्तानचा संघ अडचणीत येऊ शकतो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघात बरेच बदल करण्यात आले आहेत. भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड संघासोबत नाहीत. बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला असून द्रविड कोरोना संसर्गामुळे संघासोबत नाही. त्याचवेळी पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदीही दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला असून आता मोहम्मद वसीमलाही दुखापत झाल्याचे वृत्त आहे.