1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. एशिया कप 2022
Written By
Last Modified: सोमवार, 5 सप्टेंबर 2022 (07:21 IST)

IndvsPak: पाकिस्तानचा भारतावर 5 विकेट्सनी विजय, मोहम्मद नवाज सामनावीर

pak batsmens
आशिया चषक टी-20 स्पर्धेत सुपर 4 गटातील सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध विजय मिळवला आहे.
 
भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 182 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. ते पाकिस्तानने 19.5 षटकांत 5 विकेटच्या मोबदल्यात गाठून विजय प्राप्त केला.
 
पाकिस्तानचा सलामीवर यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान आणि अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज हे पाकिस्तानच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
 
रिझवानने 51 चेंडूंमध्ये 71 धावांची खेळी केली. तर मोहम्मद नवाजने 20 चेंडूंत आक्रमक 42 धावा केल्या.
 
मोहम्मद नवाजने गोलंदाजीतही चमक दाखवत 4 षटकांत 25 धावांत 1 गडी बाद केला. नवाजच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
182 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यालढतीतही मोठी खेळी करू शकला नाही. पण मोहम्मद रिझवान एक बाजू सांभाळून खेळत होता. चौथ्या क्रमांकावर आलेल्या नवाजची त्याला चांगली साथ मिळाली.
 
दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागिदारी करत पाकिस्तानचा विजय दृष्टिपथात आणला. पण मोक्याच्या क्षणी दोघेही माघारी परतल्याने सामन्यात रंगत आली होती.
 
दरम्यान, नवोदित खेळाडू अर्शदीप सिंहने पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अलीचा सोडलेला झेल भारताला महागडा ठरला. अखेरीस आसिफ अलीने खुशदिल शाहच्या सोबतीने पाकिस्तानचा विजय साकार केला.
 
तत्पूर्वी, भारतीय संघाने विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या बळावर 181 धावांची मजल मारली. रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांनी 54 धावांची खणखणीत सलामी दिली. पण मोठा फटका खेळण्याचा रोहितचा प्रयत्न खुशदील शाहच्या हातात जाऊन विसावला. त्याने 28 धावांची खेळी केली.
 
रोहित बाद झाल्यानंतर राहुलने आक्रमक पवित्रा स्वीकारला. पण शदाब खानने त्याची खेळी संपुष्टात आणली. त्यानेही 28 धावा केल्या.
 
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या लढतीत शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्यकुमारला या लढतीत 13 धावाच करता आल्या. दिनेश कार्तिक नसल्याने ऋषभ पंतवर जबाबदारी वाढली होती पण पण त्याला मोठी खेळी करता आली नाही.
 
भरवशाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला मोहम्मद हसनैनने शून्यावर बाद केलं. सहकारी एका बाजूने बाद होत असताना कोहलीने दिमाखदार खेळी साकारली. कोहलीने 44 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह 60 धावांची खेळी केली. दीपक हुड्डाने 16 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
 
10 षटकात शंभरी गाठणाऱ्या भारतीय संघाला पाकिस्तानने शिस्तबद्ध गोलंदाजीच्या बळावर ब्रेक लावला. पण शेवटच्या षटकांमध्ये पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकांनी सोपे झेल टाकले. पाकिस्तानतर्फे शदाब खानने 2 तर नसीम खान, मोहम्मद हसनैन, हॅरिस रौफ आणि मोहम्मद नवाझ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
 
भारतीय संघाने या लढतीसाठी हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा आणि रवी बिश्नोई यांना संघात समाविष्ट केलं. रवींद्र जडेजा आणि अवेश खान हे दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्यांच्या जागी दीपक हुड्डा आणि रवी बिश्नोई यांना संधी मिळाली. हार्दिक पंड्याच्या समावेशासाठी दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात आलं.
 
पाकिस्तानने दुखापतग्रस्त दहानीच्या ऐवजी हसनैनला संघात समाविष्ट केलं.
 
भारताने मागच्या रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यामुळे जर एशिया कपमध्ये आपलं स्थान टिकवायचं असेल तर काहीही करून हाँगकाँगविरुद्धची मॅच काढणं पाकिस्तानला भाग होतं. या मॅचमध्ये पाकिस्तानने धीमी सुरुवात केली. पुढे मोहम्मद रिझवान आणि फखर जमां यांनी काढलेल्या अर्धशतकामुळे पाकिस्तानने 193 धावांपर्यंत मजल मारली.
 
रिझवानने गर्मी आणि दमट वातावरणाचा सामना करत 78 रन्स काढल्या, तर दुसरीकडे झमानने त्याला चांगली साथ दिली.
 
दोन विकेट्सवर 193 धावांचा डोंगर रचल्यानंतर पाकिस्तानचे स्पिनर्स शादाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी सात विकेट्स घेत हाँगकाँगला अवघ्या 38 धावांत गुंडाळलं. हाँगकाँगच्या टीमने भारताविरुद्ध चांगला गेम दाखवला होता, मात्र पाकिस्तानसमोर त्यांचं काही चाललं नाही.
 
आता हाँगकाँगवर 155 धावा राखून विजय मिळवलाय म्हटल्यावर पाकिस्तानचा आत्मविश्वास दुणावलाय. साहजिकच मागच्या रविवारी (28 ऑगस्ट) झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी पाकिस्तान सज्ज झालाय. त्यात भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हटलं की क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला भरत येतं.
 
2012-13 पासून या दोन्ही संघांनी परस्पर दौरे केलेले नाहीत. मात्र आयसीसीने खेळवलेल्या टूर्नामेंटमध्ये हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी एशिया कपची घोषणा झाली होती. त्यामुळे हे दोन्ही संघ किमान तीनवेळा तरी आमने-सामने येतील अशी अपेक्षा होती.
 
आता या रविवारच्या सामन्यानंतर फायनल मध्ये हे दोन्ही संघ एकमेकांना भिडण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानची टीम-ए ग्रुपमधले अव्वल संघ आहेत. तेच बी ग्रुपमधील श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या टीमने सुपर फोरमध्ये आपलं स्थान मजबूत केलं आहे.