नयनरम्य पाचूचे बेट  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  भारतातील सागरी संपत्ती, सागरी जीवनाचा वध घ्यायचं म्हटलं तर लक्षद्वीपला जायलाच हवे. त्यासाठी रेल्वेने तिरुअनंतपुरमला जावे लागते. तिथून खासगी कार करून करेळ-कन्याकुमारी करून कोचीनला जावे. लक्षद्वीपला जाताना कोचीन बंदरावरून जावे लागते. तिथून मग मिनीकॉय बोटीमधून प्रवासाला सुरुवात होते. कोचीन ते लक्षद्वीप हा 18 तासांचा सागरी प्रवस असतो. बोटीमध्ये साधारण दीडशे लोक बसतील, अशी व्यवस्था असते.
				  													
						
																							
									  वेगवेगळ्या फॅमिली केबिन्सही उपलब्ध असतात. तिथे राहण्याची सोय असते. शाकाहारी, मांसाहारी असे सर्व काही असते. जेवणात खोबरेल तेलाचा वापर अधिक असतो. सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी ही बोट असते. प्लॉस्टिकचा वापर कुठेही आढळत नाही. बेटावर जाण्यासाठी या मोठ्या बोटीतून उतरून छोट्या बोटीत जावे लागते. आपल्या देशात जशी कितीतरी बेटे आहेत, ती बेटे म्हणजे समुद्राखाली जे मोठमोठे पर्वत असतात, त्या पर्वतांचे शिखर. खरोखरच निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार आहे. प्रत्यके बेटाचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. काही बेटांवर राहण्याची व्यवस्था आहे. निसर्गाची किमया असणारी ही बेटे लक्षद्वीप सरकारतर्फे तशीच जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. कचरा, प्लॅस्टिक यांचा जराही वावर दिसत नाही. कचरा निर्मूलनासाठी ठिकठिकाणी व्यवस्था केली आहे. लक्षद्वीपमधील समुद्र सफारी करताना डॉल्फिनचे खेळ पाहायला मिळतात. कवरत्ती बेटावर मत्स्यालय आहे. त्यात वेगवेगळ्या माशांच्या जाती पाहायला मिळतात. माशांपासून लोणचे कसे तयार करतात, तेदेखील शिकायला मिळते. तो सील डब्यात कसा पॅक करतात, कोळंबीचे लोणचे कसे करतात, मासे कसे खारवतात हे सर्व पाहता येते. कडमठ बेटाचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिमेला पसरलेले लगून्स.
	
		 
 				  				  लगून म्हणने समुद्रापासून वेगळा झालेला आणि उथळ पाण्याचा भाग. लगूनचे पाणी नितळ आणि स्वच्छ असते. एक ते दीड किमी अंतरावर पसरलेल्या लगूनमधील खोल पाण्यात सहज चालता येते. येथे उपलब्ध असणारे वॉटर स्पोर्टस हेदेखील कडमठ बेटाचे एक आकर्षण आहे. 
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  स्नॉर्कलिंग, कायकिंग यासारख्या खेळाच्या आनंद येथे घेता येतो. विशेष म्हणजे या सर्व खेळांसाठी पोहता येणे बंधनकारक नाही. लाइफ जॅकेट अंगात चढवून हा अनुभव घेता येतो. विविध प्रकारचे रंगीबेरंगी मासे, जिवंच कोरल्स, स्टारफिश, समुद्री काकड्या, खेकडे या सर्वांनी संपन्न अशी ही बेटे वेगळाच अनुभव देतात.