शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (18:17 IST)

माँटेनेग्रो : भौगोलिक वैविध्य जपणारा देश

माँटेनेग्रो हा दक्षिणपूर्व युरोपातला देश आहे. माँटेनेग्रो म्हणजे ‘काळा पर्वत'. अल्बानिया, क्रोएशिया, सर्बिया, बोस्निया हे माँटेनेग्रोचे शेजारी देश आहेत. विसाव्या शतकापर्यंत माँटेनेग्रो हा युगोस्लाव्हियाचा भाग होता. माँटेनेग्रो हा खूपच सुंदर देश आहे. इथे भौगोलिक वैविध्य पाहायला मिळतं. उंचच उंच
पर्वतरांगा, सोनेरी वाळूने नटलेले समुद्रकिनारे आणि इथली टुमदार शहरं पर्यटकांना आकर्षित करतात.
 
2006 मध्ये माँटेनेग्रो स्वतंत्र देश म्हणून उदयाला आला. यानंतर या देशाने आर्थिक प्रगतीसाठी बरेच प्रयत्न केले. ‘पॉडगॉरिका' ही या देशाची राजधानी आहे. ‘माँटेनेग्रीन' ही इथली अधिकृत भाषा आहे. या देशात बर्याकच पर्वतरांगा आहेत. तसेच इथला काही भाग सपाटही आहे. ‘स्कॅडार' हा या देशातला सर्वात मोठा तलाव तर ड्रिना, लिम आणि तारा या प्रमुख नद्या आहेत. या देशात बराच काळ उन्हाळा असतो. इथे उन्हाळ्यात कोरडे वातावरण असते. इथला हिवाळा सौम्य असतो. जंगली डुकरे, अस्वले, हरणं, कोल्हे, लांडगे, रानमांजरं असे बरेच प्राणी इथे आढळतात. काही प्रजातींचे मासे, गोगलगायी आणि कीटक फक्त माँटेनेग्रोमध्येच आढळतात. इथे विविध प्रकारची झाडेही आहेत. 
 
हा प्रदेश पंधराव्या शतकापासून माँटेनेग्रो म्हणून ओळखला जातो. या देशात विविध प्रकारचे उद्योग आहेत. स्टीलनिर्मिती, अॅल्युमिनियमशी संबंधित उद्योग, शेतमालावर प्रक्रिया करणे आणि पर्यटन हे इथले प्रमुख उद्योग आहेत. बटाटे, आंबट फळे, धान्ये, ऑलिव्ह ही पिके इथे घेतली जातात.
 मेघना शास्त्री