1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. भाजप राष्ट्रीय अधिवेशन

ऱाम मंदिर मुद्यावरून गडकरी अडचणीत

- अभिनय कुलकर्णी

भाजपचे अध्यक्ष नितिन गडकरी यांनी आज राम मंदिर बांधण्यास सहकार्य केल्यास शेजारीच भव्य मशीद बांधण्याचा नवा प्रस्ताव जाहीर करताच, संघ परिवारातल्या संघटनांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यांचा कोप जाहीर होताच, गडकरींचे हे विधान घाईघाईने दुरूस्त करून मांडण्यात आले.

भाजपच्या येथे भरलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात गडकरी राम मंदिराविषयी काय बोलतात यावर सार्वत्रिक उत्सुकता होतीच. पण त्यांनी अगदी शेवटी तो मुद्दा 'जाता जाता' घेतला. या विषयावर काहीच बोललो नाहीत तर माध्यमे नवे अध्यक्ष त्यावर काहीच बोलले नाहीत, असे छापतील, असे सांगून 'हा मुद्दा आता न्यायप्रविष्ट आहे. परंतु, राम ही आमची श्रध्‍दा आहे. त्याच्या मंदिराचे अस्तित्व वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आता सिद्ध झाले आहे. या मंदिराशी लाखो हिंदूंच्या आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना निगडीत आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाने सामंजस्याची भूमिका घेऊन तेथे हिंदूंना मंदिर बांधू द्यावे, असे आवाहन केले. या आवाहनानंतर 'आम्ही या बदल्यात मंदिराशेजारी भव्य मशीद बांधून देऊ', असेही ते स्पष्टपणे म्हणाले.

गडकरींच्या या विधानानंतर संघ परिवारातील मंडळी चिडली. विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी तातडीने गडकरींवर तोंडसुख घेत मंदिराचा प्रश्न भाजपच्या कक्षेत नाही, असे बजावून भाजपचा तोडगा फेटाळला. हा मुद्दा तापतो आहे, असे लक्षात येताच, येथे भरलेल्या अधिवेशनात तातडीने पक्ष प्रवक्ता राजीव प्रताप रूडी यांची पत्रकार परिषद बोलाविण्यात आली. अयोध्याच्या वादग्रस्त जागी मंदिर बांधल्यानंतर या आंदोलनाशी निगडीत हिंदूत्ववादी संघटनांशी चर्चा करून 'योग्य' जागी मशीद बांधण्यास सहकार्य करण्यात येईल, असे रूडी यांनी स्पष्टीकरण दिले. या विषयावर पत्रकारांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर गडकरी यांच्या म्हणण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला, एवढेच सांगून रूडी यांनी यावर अधिक काही बोलण्याचे टाळले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा