फोटो साभार- सोशल मीडिया
छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या मालिकेतील मराठमोळी अभिनेत्री अनघा भोसलेने अध्यात्माच्या मार्गाचीच निवड करत भरात आलेली कारकीर्द आणि मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
'अनुपमा' मालिकेत नंदिनीची भूमिका साकारत असलेली अनघा भोसले बऱ्याच दिवसांपासून मालिकेतून गायब होती. अखेर यामागील कारण समोर आलं असून, तिने मोठा निर्णय घेतला आहे.
इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून तिने मनोरंजन सृष्टी सोडण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.
"हरे कृष्ण, मी मालिकेत दिसत नसल्यानं तुम्हा सगळ्यांना माझी काळजी वाटत आहे हे मला माहितीये आहे. मला भरभरून प्रेम देणाऱ्या सगळ्यांचे आभार. अजूनपर्यंत ज्यांना माहिती नाही, त्यांना मी आज सांगते की, मी फिल्म्स आणि टीव्ही इंडस्ट्री सोडली आहे. माझ्या निर्णयाचा आपण आदर करावा आणि माझी साथ द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे. मी अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. आध्यात्माविषयी असलेल्या श्रद्धांमुळे मी हा निर्णय घेतला आहे. तुम्ही सगळे आपआपलं कर्तव्य करत राहाल. जे तुम्हाला भगवान श्रीकृष्णापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताहेत त्यांच्यापासून स्वतः दूर ठेवाल हे मला माहिती आहे."
आपण सर्वच ईश्वराची मुले आहोत, यावर माझा विश्वास आहे. आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे, फक्त मार्ग वेगवेगळे आहेत. आपण सगळ्यांनी विश्वास अबाधित ठेवला पाहिजे. माझ्यासाठी ईश्वर नेहमीच दयावान राहिला आहे. आपण ज्या उद्देशाने जन्म घेतला आहे, ते उद्दिष्ट पूर्ण करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. सगळ्यांची ईश्वराची इच्छा आणि प्रेम समजून घेतलं पाहिजे. मला वाटतं तुम्हाला कुठलं उत्तर हवं असेल, तर ते भगवत गीतेतून मिळवू शकता. जे लोक माझ्यावर प्रेम करतात, त्यांना माझ्या आयुष्यातील घटनांचे माहिती वेळोवेळी देत राहिन. मी सर्व धर्मांचा आणि सर्वांच्या आयुष्याचा आदर करते", असं तिने म्हटलं आहे.
वाढत्या वजनाच्या टेन्शनमुळे मानसिक तणाव वाढला
मनोरंजन सृष्टी सोडण्याच्या निर्णयावर TIMES NOW या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनघा सांगते, "पडद्यावर सडपातळ दिसण्याच्या दबावामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. कॅमेऱ्यासमोर परफेक्ट दिसण्याच्या कल्पनेनं मला झपाटलं होतं. आणि त्या नादात माझ्या ताटात जेवण पाहून ही मला भीती वाटायची. मला माझं वजन वाढेल याची धास्ती लागून राहायची. मी वास्तविक जीवनात सडपातळ दिसत होती पण टेलिव्हिजनवर गोलमटोल दिसते असं लोक मला सांगायचे. याचा माझ्यावर परिणाम होत होता."
भविष्यातील आपल्या योजनांबद्दल तिने सांगितले की, "ती न्यूट्रिशनचा कोर्स करणार आहे. तिला लोकांना हेल्दी फूड खाण्याविषयी सांगायच आहे."
पण सध्या तरी तिने आपल्या आयुष्यात अध्यात्माच्या मार्गाचीच निवड करत भरात आलेली कारकिर्द आणि मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पण फक्त अनघाचं नाही तर याआधी ही बऱ्याच अभिनेत्रींनी अध्यात्माच्या मार्गावर चालत सिनेसृष्टीला रामराम ठोकलाय.
झायरा वसीम
यात 'दंगल' या चित्रपटाने प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री झायरा वसीम ही आहे. झायराने 'दंगल', 'सिक्रेट सुपरस्टार' आणि 'द स्काई इज पिंक' या सिनेमांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. पण एक दिवस तिने आपल्या सोशल मीडियावर धर्माच्या प्रचारात लक्ष केंद्रित करून चित्रपटांपासून दूर जाण्याची घोषणा केली. झायराने अचानक फिल्म इंडस्ट्रीमधून संन्यास घेण्याच्या घोषणेवर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
सना खान
'बिग बॉस' फेम सना खानने अनेक हिट चित्रपट दिले. 'धन धना धन गोल', 'जय हो', 'वजह तुम हो' आणि टॉयलेट एक प्रेम कथा अशा यशस्वी चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 'झलक दिखला जा सीझन -7', 'खतरों के खिलाडी सीझन -6′, कॉमेडी नाइट्स बचाओ' आणि 'एंटरटेनमेंट नाईट' सारख्या कार्यक्रमांनी तिने छोटा पडदाही गाजवला. पण एवढे करूनही गुजरातच्या सुरतमध्ये मौलाना अनसशी लग्न करून सना खानने बॉलिवूडच्या जगाला निरोप दिला. इस्लाम धर्माचा प्रचार करणे हा तिचा हेतू असल्यामुळे तिने हा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा होत्या.
अनु अगरवाल
'आशिकी'या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री अनु अग्रवाल हीने एका अपघातानंतर तिच्या आयुष्यात मोठे बदल केले. हा अपघात इतका भयंकर होता की तिला जवळपास एक महिना जाणीव झाली नाही, ती कोमामध्येच राहिली. जेव्हा अनु अग्रवाल कोमातून परत आली तेव्हा तिचे जग बदलले होते. तिने अध्यात्माचा मार्ग धरला. सध्या अनु योग करते आणि अध्यात्मिक मार्गावर चालत आहे.