मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (18:12 IST)

Aryan Khan: शाहरुख खानच्या मुलाने आतापर्यंत कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केलंय?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल विभाग म्हणजेच NCB च्या मुंबई शाखेने आर्यनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
 
मुंबईतील एका हायप्रोफाईल क्रूझवर ड्रग्जचं सेवन, वाहतूक होत असल्याची माहिती NCB ला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून NCB ने क्रूझवर ही कारवाई केली.
 
या कारवाईदरम्यान शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान हासुद्धा याठिकाणी आढळून आला. या प्रकरणात NCB ने आर्यनसह इतर आठ जणांना ताब्यात घेतलं असून या सर्वांची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
पण या सर्व प्रकरणामुळे आर्यन खानसंदर्भात सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याचे अनेक व्हीडिओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
 
शाहरुख खानप्रमाणेच आर्यन खान हासुद्धा चित्रपट क्षेत्राशीच संबंधित आहे. त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊ -
 
शाहरुख खानचा मोठा मुलगा
अभिनेता शाहरूख खान आणि पत्नी गौरी खान यांचं आर्यन खान हे पहिलं अपत्य होय. आर्यनचा जन्म 13 नोव्हेंबर 1997 रोजी नवी दिल्ली येथे झाला. आर्यनला सुहाना आणि अबराम अशी ही दोन लहान भावंडं आहेत.
 
आर्यनने लंडनच्या सेव्हन ओक, तसंच भारतात धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून आपलं शालेय शिक्षण घेतलं. पुढे कॅलिफोर्नियातून त्याने सिनेमा निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं, असं टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.
चित्रपट करिअर
शाहरुख खानप्रमाणेच आर्यन खानलाही चित्रपट क्षेत्रातच रस आहे. 2001 मध्ये आलेल्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटात त्याने काम केलं होतं. तसंच 'कभी अलविदा ना कहना' चित्रपटातही त्याने काम केलं होतं. त्याचा सिन नंतर कट केल्याचं म्हटलं जातं.
 
चित्रपट क्षेत्रातील आवडीपोटीच आर्यनने पुढे जाऊन कॅलिफोर्नियाच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथं त्यांने फिल्म मेकिंगचा कोर्स पूर्ण केला.
 
दरम्यान, आर्यन खानने आतापर्यंत दोन चित्रपटांसाठी आवाज दिला आहे. 2004 साली 'द इनक्रेडिबल्स'चं हिंदी व्हर्जन 'हम है लाजवाब' या चित्रपटात त्याने पहिल्यांदाच आपला आवाज दिला.
 
या चित्रपटाकरिता आर्यनला सर्वोत्तम डबिंग चाईल्ड आर्टिस्टचा पुरस्कार मिळाला.
 
यानंतर 2019 मध्ये आर्यन खानला आपल्या वडिलांसोबत काम करण्याची पुन्हा संधी मिळाली. 'लायन किंग' चित्रपटात दोघांनीही आपला आवाज दिला होता. शाहरुखने मुफासा तर आर्यनने सिंबा या पात्राला आपला आवाज दिला होता.
 
या चित्रपटाचंही त्यावेळी खूप कौतुक झालं होतं.
 
आर्यन अद्याप कोणत्याही चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसलेला नाही. पण चित्रपट क्षेत्रातील इतर स्टार किड्सप्रमाणेच करण जोहर यांनाच तो आपला गॉडफादर मानतो, असं म्हटलं जातं.
 
करण जोहर लवकरच आर्यन खानला लाँच करण्यासाठी एक चित्रपट बनवणार असल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये आहे.
 
पण, आर्यनला अभिनयाऐवजी दिग्दर्शनात रस आहे, असं शाहरूखनं अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
तायक्वांदोत सुवर्णपदक
आर्यनची ओळख एक अभिनेता याव्यतिरिक्त एक अॅथलीट म्हणूनही आहे. त्याला खेळाची विशेष आवड असल्याचं सांगितलं जातं.
 
आर्यनने मार्शल आर्टचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्याला तायक्वांदो प्रकारात ब्लॅक बेल्ट मिळालेलं आहे.
 
2010 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या तायक्वांदो स्पर्धेत आर्यनने सुवर्ण पदकाची कमाई केली होती.