गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (10:52 IST)

दिव्या भारती : तीन वर्षांच्या करिअरमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर अन् वयाच्या 19 व्या वर्षी गूढ मृत्यू

Divya Bharti
"आता खूप उशीर झाला आहे. वेळ वाळूसारखा हातून निसटून गेला आहे. मला रडत-रडत निरोप देऊ नका, आता मी खूप आनंदी आहे. आता माझ्या भांगेत सिंदूरही भरलेला आहे."
 
रुग्णालयाच्या एका खोलीत मृत्यूशी अखेरची झुंज देणारी तरुणी तिच्या कुटुंबीयांना असं म्हणत होती.
 
पण हे 31 जानेवारी 1992 ला प्रदर्शित झालेल्या 'दिल का क्या कसूर' चित्रपटातलं दृश्य होतं.
 
अभिनेत्री दिव्या भारतीनं चित्रपटात तिच्या कुटुंबीयांसमोर अखेरचा श्वास घेताना हे डायलॉग म्हटले होते.
 
या चित्रपटाच्या सुमारे एका वर्षानंतर एप्रिल 1993 मध्ये दिव्या भारतीनं प्रत्यक्ष जीवनातही अशाच प्रकारे कुटुंबीयांसमोर अखेरचा श्वास घेतला. मृत्यूच्या वेळी तिचं वय अवघं 19 वर्ष होतं.
 
25 फेब्रुवारी 1974 ला जन्मलेली दिव्या भारती आज जिवंत असती तर तीचं वय 50 वर्ष असतं. तिचं करिअर अवघं 2-3 वर्षांचं होतं. तरीही दिव्याची प्रसिद्धी, तिच्यातील कलागुण आणि स्वभाव यामुळं ती आजही सर्वांच्या आठवणींमध्ये अप्रत्यक्षरित्या उपस्थित आहे.
 
दिव्या आनंदी, चंचल, स्वच्छंदी, मोकळ्या स्वभावाची, प्रतिभावान, उत्तम अभिनेत्री, काहीशी मुडी आणि चेहऱ्यावर एक वेगळीच जादू असलेली तरुणी. दिव्याच्या वर्णनासाठी वापरण्यात आलेल्या शब्दांचा विचार केला तर जवळपास सगळ्यांनीच तिचं वर्णन या शब्दांमध्ये केलं आहे.
1992 मध्ये आलेला 'दीवाना' चित्रपट दिव्याच्या करिअरमधील मोठा हिट चित्रपट होता. गुड्डू धनोआ हे दीवानाचे निर्माते होते.
 
"दिव्या उत्तम अभिनेत्री होती. वन टेक अॅक्टर. डान्स मास्टर सेटवर फक्त एकदा स्टेप दाखवायचे आणि दिव्या म्हणायची शॉट घ्या. तिला रिहर्सलचीही गरज नव्हती. शिमलामध्ये 'ऐसी दिवानगी' गाण्याचं शुटिंग तिनं 104 ताप असूनही पूर्ण केलं होतं. आम्हाला तीन दिवसांत गाणं संपवायचं होतं. पण दिव्या नको म्हटलं तरी आराम न करता शुटिंग करत राहिली," असं ते म्हणाले.
 
'जितेंद्र यांची हिरोईन बनायचं होतं'
दिव्या भारती एवढ्या कमी काळासाठी चित्रपटसृष्टीमध्ये होती की, तिच्याबाबत माहिती मिळवण्यासाठी अवघे दोन-तीन इंटरव्ह्यू उपलब्ध आहेत. ते वारंवार पाहूनच तिच्या शब्दांचे अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो.
 
उदाहरण द्यायचं झाल्यास, एका व्हिडिओ इंटरव्ह्यूमध्ये दिव्याला तिच्या महत्त्वाकांक्षांबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर ती म्हणाली होती, "स्वप्न शिखरावर पोहोचायचं आहे. पण कुणाची मदत नको आहे. मी जे काही बनेल ते स्वतःच्या मेहनतीनं बनेल. मला स्वतःची जागा स्वतः तयार करायची आहे."
 
हे ऐकल्यानंतर जग जिंकण्याचं स्वप्न असलेल्या आत्मविश्वासू, स्वाभिमानी आणि महत्त्वाकांक्षी तरुणीचा चेहरा समोर येतो.
 
मुंबईत राहणारी दिव्या माणिकजी कूपर ट्रस्ट स्कूलमध्ये शिकत होती. त्याठिकाणी तिच्याच बॅचमध्ये फरहान अख्तर, शरमन जोशीही होते. पण दिव्याला अभ्यासात फारशी आवड नव्हती.
 
दिव्याचे आई-वडील आता या जगात नाहीत. पण त्यांनी बॉलिवूड हंगामाला 2012 मध्ये एक मोठा इंटरव्ह्यू दिला होता. त्यात त्यांनी दिव्याबाबत मोकळेपणानं चर्चा केली होती.
 
दिव्याच्या आईच्या मते, "तिला अभ्यासाची आवड नव्हती. मी तिचा अभ्यास घ्यायचे पण ती समोर सुरू असलेल्या 'हिम्मतवाला' चित्रपटातील गाण्यावर डान्स करत असायची. जितेंद्र तिचे आवडते हिरो होते. दिव्या शाळेत होती तेव्हाच तिला ऑफर मिळू लागल्या होत्या. गोविंदाचे भाऊ कीर्ती कुमार यांनी तिला 'राधा का संगम' साठी साइन केलं होतं. दिव्याला फिरायला आवडत होतं. पण कीर्ती कुमार यांना दिव्याला समोर येऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळं दिव्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आलं."
नंतर सतीश कौशिक यांनी दिव्याचं नाव 'प्रेम' चित्रपटासाठी सुचवलं. पण त्यांचं तब्बूबरोबर पॅचअप झालं, त्यामुळं दिव्याची ती संधीही गेली. सुभाष घईंच्या 'सौदागर' बाबतही असंच काही झालं.
 
खरं म्हणजे, हिंदीच्या आधी दिव्याचा तेलुगू चित्रपट 'बॉबिली राजा' 1990 मध्ये व्यंकटेशबरोबर रिलीज झाला होता. तो चांगला हिट चित्रपट होता.
 
दिव्या हिंदीपूर्वी तेलुगूमध्ये बनली स्टार
दिव्याच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक बी गोपाल यांच्याशी बीबीसी तेलुगूच्या सहयोगी गौतमी खान यांनी चर्चा केली. "बोनी कपूर यांनी दिव्याची निर्माते सुरेश बाबू यांच्याशी भेट घालून दिली. आम्ही लगेचच तिला तेलुगू चित्रपटासाठी साइन केलं. पण तिला चित्रपटांमध्ये काही रस नव्हता. कारण ती फार लहान होती. तिला शॉपिंग करायला आवडायचं. नंतर सुरेश बाबूंनी दिव्याला समजावलं आणि अभिनयावर लक्ष केंद्रीत करायला सांगितलं. तसं केल्यास सगळं आपोआप मिळेल, असं त्यांनी तिला सांगितलं. दिव्या अत्यंत खास होती. ती तेलुगू चित्रपटापासूनच मोठी स्टार बनली, त्यामुळं मग तिला बॉलिवूडच्या ऑफर मिळू लागल्या."
 
तमिळ आणि तेलुगू चित्रपट रिलीज झाल्यानंतर राजीव राय यांनी तिला 1992 मध्ये 'विश्वात्मा' मध्ये हिंदी चित्रपटांत ब्रेक दिला.
 
1992 मध्ये एकाच महिन्यात 'विश्वात्मा', 'शोला और शबनम', 'दिल का क्या कसूर'... असे एकाच अभिनेत्रीचे सलग तीन चित्रपट प्रदर्शित झाले. जून 1992 मध्ये आलेल्या 'दीवाना' मध्ये तिनं ऋषी कपूर आणि शाहरुख खान असूनही सर्वांचं लक्ष वेधलं. त्यानंतर ती प्रचंड प्रसिद्ध झाली.
 
फिल्मफेअर मॅगझिनमध्ये प्रकाशित एका लेखातील वाक्यावरून दिव्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. 'सुनील शेट्टीचा पहिला चित्रपट 'बलवान' प्रदर्शित झाला तेव्हा दिव्या स्टार बनली होती. तेव्हा ती सुनील शेट्टीच्या बायसेपपेक्षा जास्त पैसे मागायची,' असं ते वाक्य होतं.
 
कामात परफेक्ट आणि खोड्या काढण्यातही पुढं
दिव्याच्या अॅक्टिंगबाबत तिच्या आईनं बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. "पहलाज निहलानी यांच्या 'शोला और शबनम' मध्ये दिव्याचा एक गंभीर सीन होता. पण दिव्या क्रिकेट खेळत बसली होती. दिग्दर्शक डेवीड धवन यांनी दिव्याला बोलावलं आणि 'बी सीरियस' असं म्हटलं.
 
त्यावर दिव्यानं उलट उत्तर दिलं की, माझा मरायचा सीन असेल तर मला खरंच मरावं लागेल का? दिव्या म्हणाली तुम्ही कॅमेरा सुरू करा, माझ्याकडून चूक झाली तर मी चित्रपट सोडून देईल. त्यानंतर - 'तू रूठा तो रूठके इतनी दूर चली जाऊँगी, सारी उमर पुकारे फिर भी लौट के न आऊँगी' हे गाणं चित्रित झालं. रात्री आम्ही तो शॉट पाहिला आणि डेवीड धवन यांच्या डोळ्यात ते पाहून पाणी आलं."
 
बीबीसीच्या सहयोगी मधू पाल यांच्याबरोबर निहलानी यांनी काही आठवणी शेअर केल्या होत्या.
 
"तिच्यात एक प्रकारचा खोडकरपणा, बालिशपणा होता. 'शोला और शबनम' चित्रपटाचा एक इमोशनल सीन होता. पण डायलॉग येताच ती हसायला लागायची, 32 टेक झाले तरी तिचं हसणं बंद होत नव्हतं. पण कामाबाबत ती समर्पितही होती. एकदा शुटिंगदरम्यान तिचा पाय जखमी झाला होता. तरीही तिनं अॅक्शन सीन सुरुच ठेवला. तिच्या पायात खिळा घुसलेला होता. मी सकाळचं शूट रद्द केलं. पण ती सकाळी 6 वाजताच माझ्याकडं आली आणि शूट सुरू केलं.
 
"दीवाना चे दिग्दर्शक गुड्डु धनोआ यांच्या मते, काम करताना ती चांगलंच काम करायची पण इतर वेळी खोड्या करायची. ती खूपच खोडकर होती. आम्ही 'दीवाना'चं पायलिया हे गाणं उटीमध्ये शूट करत होतो. शुटिंग सुरू होण्याआधी सगळे पत्ते खेळत होते. दिग्दर्शक आणि ऋषी कपूर खुर्चीवर बसलेले होते. खुर्ची रिकामी नव्हती म्हणून ती ऋषीजींच्या मांडीवर जाऊन बसली आणि खोड्या करू लागली. ऋषीजी तिला म्हणाले, तू 18 वर्षांची आहे आणि मी 39 वर्षांचा आहे, हे तुला माहिती आहे का? मी 21 वर्ष मोठा आहे. पण दिव्याच्या खोड्या सुरुच राहिल्या."
 
साजिद नाडियाडवालांशी विवाह
दिव्याबाबत फोटोग्राफर आरटी चावला यांनी मला माहिती दिली. "दिव्याचा वाढदिवस होता. जेव्हाही अभिनेते यायचे तेव्हा ती अत्यंत उत्साहानं म्हणायची, चावला अंकल माझा जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर फोटो काढा, गोविंदाबरोबर फोटो काढा. पण अखेरच्या काही दिवसांत दिव्याचा स्वभाव बदलला होता. तेव्हा मेहबूब स्टुडिओमध्ये 'रंग' चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं. मी दिव्याला हाय केलं, पण तिनं उत्तर दिलं नाही. मला खूप आश्चर्य वाटलं...''
 
तेव्हा दिव्याच्या खासगी जीवनात बरंच काही घडत होतं. विशेषतः दिव्यानं निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्याशी लग्न केल्यानंतर. दिव्या तेव्हा फक्त 18 वर्षांची होती. 'शोला और शबनम'च्या सोटवर दोघांची भेट झाली होती. दिव्याच्या आईनं मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार सुरुवातील कुटुंबीय या लग्नाच्या निर्णयानं आनंदी नव्हते. पण नंतर सगळ्यांनी मान्य केलं.
 
5 एप्रिल 1993 च्या रात्री दिव्याच्या मृत्यूची बातमी आली तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला धक्का बसला. त्या रात्री काय-काय झालं याची माहिती आतापर्यंत अनेकदा विविध बातम्यांमधून वेगवेगल्या पद्धतीनं समोर आलं आहे.
दिव्याच्या आई-वडिलांनीही याबाबत मुलाखतीत सांगतिलं आहे. "त्या दिवशी सायंकाळी दिव्या म्हणाली की तिला स्वतःचं घर घ्यायचं आहे. आम्ही सगळे घर पाहायला गेलो. रात्री फोन आला की, नीता लुला घरी आल्या असून कॉस्च्युम पाहायचे आहेत, असं ते म्हणाले. मी रस्त्यात उतरलो आणि दिव्याचा भाऊ तिला सोडायला गेला. दिव्याच्या घरी आमची मोलकरीण, नीता लुला आणि तिचे पती होते. 15 मिनिटांनी फोन आला आणि दिव्या बाल्कनीतून पडल्याचं सांगितलं. ती खोडकर होती. मस्ती करताना दुर्घटना झाली असेल. ती आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हती. आणि तिला कोण आणि का मारणार?"
 
त्या दिवसाचा उल्लेख करताना फोटोग्राफर आरटी चावला म्हणाले की, "माझा मुलगा आणि मी अंत्य संस्काराला पोहोचलो तेव्हा दिव्या भारती यांच्या मृतदेहाला लाल ओढणी गुंडाळलेली होती. मी पाहतच राहिलो आणि रडू लागलो. माझं आणि दिव्याचं नातं किती दृढ होतं हे कुणालाही माहिती नव्हतं. फोटोग्राफर म्हणून नाइलाजानं मी तिच्या अंत्य संस्काराचे फोटोही काढत होतो."
 
दिव्या भारतीचा मृत्यू
मनोरंजन क्षेत्राशी संबंधित पत्रकार ट्रॉय राइबेरिया यांनी दिव्याच्या मृत्यूनंतर स्टारडस्टमध्ये त्याबाबत लेख लिहिला होता. 'ट्रॅजेडी दॅट शुक द नेशन-ब्लो बाय ब्लो अकाउंट' असा तो लेख होता.
 
"दिव्याच्या मृत्यूबाबत सर्वात आधी माहिती मिळाली त्यांच्यापैकी मी एक होतो. रात्री 1.30 वाजता दिव्याचा मृतदेह कॅज्युलिटी वार्डाच्या ट्रॉलीवर ठेवलेला होता. काळे स्लॅक्स आणि पोलका डॉट असलेल्या काळ्या-पांढऱ्या ठिपक्यांचा टॉप तिनं परिधान केला होता. दिव्याचे वडील लहान मुलांसारखे रडत होते. तिच्या भावाची अवस्थाही तशीच होती. मी बहिणीला सोडून जायला नको होतं, असं तो म्हणत होता," असं त्यांनी लेखात लिहिलं होतं.
 
"सुमारे तासाभरानंतर दिव्याचे पती साजिद आले. साजिद यांनी दिव्याला पाहिलं तर ते जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला. डॉक्टरांनी नंतर सांगितलं की, त्यांना हार्ट अटॅक आला होता. तेवढ्यात निर्माते पहलाज निहलानी तिथं पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली. तोपर्यंत बोनी कपूर, गोविंदा, कमल सदाना, सैफ हे सगळेही पोहोचले. दिव्याच्या आईशी उशिरा संपर्क झाला. त्या आल्या तेव्हा त्यांनी दिव्याचा चेहरा पाहिला आणि प्रचंड रडू लागल्या. त्या निघून गेल्या आणि नंतर थोड्या वेळानं आल्या."
 
दिव्याच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय आणि मित्र प्रचंड धक्क्यात होते. "आम्ही कुली नंबर वनचं शुटिंग करत होतो. पण सेटवर आम्ही सगळेच दुःखी होतो. सीनच्या दरम्यान ब्रेक व्हायचा तेव्हा आमच्या डोळ्यात अश्रू असायचे. एकिकडं आम्ही मस्तीचा मूड असलेलं गाण शूट करत होतो. पण कॅमेऱ्यामागे आम्ही प्रचंड भावूक झालेलो होतो," असं बीबीसीबरोबर बोलताना करिश्मा कपूर म्हणाल्या होत्या.
 
दिव्याच्या मृत्यूनंतर एक विचित्र बाब घडली
'रंग', 'शतरंज' आणि 'थोलि मुद्धू' हे चित्रपट दिव्याच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाले. 'रंग'मध्ये आयेशा जुल्का आणि दिव्या भारती यांनी एकत्र काम केलं होतं आणि दोघींमध्ये चांगली मैत्री होती.
 
"ती कायम म्हणायची जीवन फार छोटं आहे घाई करा. तिनं कधी स्पष्ट म्हटलं नाही पण तिला काही काहीतरी वाटत होतं. तिला प्रत्येक काम लवकर करायचं होतं. तिला जीवनात सर्वकाही मिळत होतं. काय चाललंय हे समजत नसल्याचं ती स्वतःच म्हणायची," असं बीबीसीशी बोलताना आयेशा यांनी सांगितलं.
"मला वाटतं की तिला आपल्यात जास्त दिवस राहायचं नाही, हे कदाचित तिला माहिती होतं. दिव्याच्या मृत्यूनंतर एक विचित्र गोष्ट घडली होती. काही महिन्यांनी आम्ही 'रंग'ची ट्रायल पाहायला गेलो. तेव्हा दिव्या स्क्रीनवर येताच स्क्रीन खाली पडली होती. ते आमच्यासाठी प्रचंड विचित्र होतं."
 
दिव्याचे पती साजिद यांच्याबाबत बोलायचं झाल्यास, विविध प्रकारच्या चर्चांनंतरही दिव्याचे पती साजिद आणि दिव्याच्या कुटुंबीयांचं नातं अगदी घट्ट होतं. 2004 पर्यंत साजिदचे जेवढे चित्रपट आले त्यात सुरुवातीला दिव्याचा फोटो असायचा आणि त्यावर - 'इन मेमरी ऑफ माय लविह्ंग वाइफ' असं लिहिलेलं असायचं.
 
नंतर साजिद यांनी वर्दा खानशी लग्न केलं. साजिद या मुद्द्यावर माध्यमांमध्ये फार बोलत नाहीत, पण सोशल सोशल मीडियावर वर्दा दिव्याशी संबंधित गोष्टी कधी कधी शेअर करत असतात.
"दिव्यानं सगळ्यात शेवटी ज्या परफ्युमला स्पर्श केला होता तो आजही साजिदकडं आहे. दिव्या आजही आमच्या जीवनाचा भाग आहे. माझी मुलं दिव्याचे चित्रपट पाहतात तेव्हा तिला बडी मम्मी म्हणतात. साजिदनं पहिल्यांदा 'किक' चित्रपट दिग्दर्शित केला तेव्हा त्यात सात समंदर हे गाणं ठेवलं. माझी आणि साजिदची भेट होण्यातही दिव्याचा संबंध होता. कारण मी दिव्याच्या मृत्यूच्या पहिल्या स्मृतीदिनी साजिद यांची मुलाखत घ्यायला गेले होते," असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं होतं.
 
1993 मध्ये दिव्याच्या मृत्यूनंतर तिचे लाडला (श्रीदेवी), मोहरा (रविना), हलचल (काजोल), विजयपथ (तब्बू), कर्तव्य (जुही) हे चित्रपट इतर अभिनेत्रींनी पूर्ण केले.
 
"निर्मात्यांना शक्यतो अभिनेत्यांच्या वर्तनाची भीती वाटत असते. पण दिव्या तशी नव्हती. सेटवर ती कुटुंबातील सदस्यासारखीच असायची. तिच्या भावनिक बाजूबद्दल बोलायचं झाल्यास ती दगडालाही पाझर फोडणारी होती. ती दुसरी श्रीदेवी आहे, असं लोक म्हणायचे. चांगल्या अभिनेत्रीबरोबरच एक चांगली व्यक्तीही इंडस्ट्रीनं गमावली. शी वॉज गॉड्स चाइल्ड," असं पहलाज निहलानी म्हणाले.
 
Published By- Priya Dixit