गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (08:59 IST)

डंकी, हिरानी आणि शाहरुख : 20 वर्षांत सर्व हिट चित्रपट देणारा दिग्दर्शक

Raj kumar hirani
तुम्ही 90 च्या दशकातील जाहिराती पाहिल्या असतील, तर तुम्हाला टीव्हीवरील लुनाची जाहिरात आठवत असेल त्यात एक माणूस दुचाकी चालवत म्हणतो - 'चल मेरी लुना'.
किंवा फेव्हिकॉलची जाहिरात यायची त्यात एक माणूस म्हणायचा की 'यह फेव्हिकॉल का मजबूत जोड है, जो टुटेगा नही'
 
या जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याचं नाव आहे राजकुमार हिरानी.
हे तेच राजकुमार हिरानी ज्यांनी शाहरुख खानसोबत 'डंकी' हा चित्रपट बनवला आहे. ते असे दिग्दर्शक आहेत ज्यांनी वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवून चित्रपट सृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं.
 
त्यांच्या चित्रपटांमध्ये ते रुग्णाला एक 'जादू की झप्पी' देतात. कधीकधी ते गांधीजींना लेख आणि पुस्तकांमधून बाहेर काढतात त्याला 'गांधीगिरी'चं नाव देतात. आणि गांधीना 'बंदे में हैं दम' म्हणण्याचं धाडस देखील ते दाखवतात.
 
आणि कधी कधी 'थ्री इडियट्स'मध्ये डिग्रीच्या नव्हे तर स्वप्नांच्या मागे धावण्याची इच्छा जागृत करतात.
 
तर 'पीके' या चित्रपटात ते एलियनच्या माध्यमातून पृथ्वीवरील लोकांना धर्माबद्दल ज्ञान देतात.
 
ज्येष्ठ चित्रपट पत्रकार रामचंद्रन श्रीनिवासन म्हणतात की 'हिरानी हे एकमेव दिग्दर्शक आहेत ज्यांचे 20 वर्षांत पाचही चित्रपट सुपरहिट ठरले.'
 
हिरानींचा हिट फॉर्म्युला
असं काय आहे की त्यांचा प्रत्येक चित्रपट यशस्वी होतो?
 
बीबीसीच्या सहकारी मधु पाल यांच्याशी बोलताना ज्येष्ठ चित्रपट विश्लेषक गिरीश वानखेडे म्हणतात की त्यांच्या चित्रपटांमध्ये विनोदासोबतच सामाजिक समस्याही असतात.
 
वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, "फिल्म एडिटरपासून दिग्दर्शक बनलेल्या लोकांच्या चित्रपटांमध्ये काहीतरी वेगळं असतं जसं की, राजकुमार हिरानी. अशा लोकांच्या चित्रपटात एक खास प्रकारचा उत्स्फूर्तपणा असतो, पटकथेवर त्यांची पकड असते."
 
वानखेडे पुढे सांगतात की, "हिरानी यांच्या लेखनात हास्यासोबत समाजातील गंभीर प्रश्न मांडण्याची कला आहे. कथा इतकी साधीसरळ असते की तुम्ही त्यात हरवून जाता."
 
ते सांगतात की, "पीके हा खूप गंभीर चित्रपट होता पण हिरानींनी आपल्या पटकथेने तो मनोरंजक बनवला."
'मुन्नाभाई' ही सुद्धा साधी कथा होती, पण त्यातील पात्रं तुम्हाला अजूनही आठवतात. प्रेक्षकांना काय आवडेल हे हिरानींना समजतं. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते धोका पत्करायला घाबरत नाही."
 
हा एक विचित्र योगायोग आहे की 20 वर्षांपूर्वी डिसेंबरमध्ये हिरानींचा पहिला चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस' प्रदर्शित झाला होता आणि त्यासाठी राजू हिरानी हे शाहरुख खानशी बोलले होते.
 
त्यावेळी शाहरुख 'देवदास'ची शूटिंग करत होता. तसेच त्याच्यावर उपचार देखील सुरू होते त्यामुळे शाहरुखला 'मुन्नाभाई' करता आला नाही.
 
मात्र दोघेही चित्रपटाच्या कथेबद्दल खूप बोलायचे आणि तुम्हाला 'मुन्नाभाई'च्या श्रेयनामावलीतमध्ये शाहरुखचं नावही दिसेल.
 
वायरस ते फुनसुक वांगडूपर्यंत
'मुन्नाभाई एमबीबीएस' 'लगे रहो मुन्नाभाई' 'थ्री इडियट्स', 'पीके' आणि 'संजू' ..हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट होते.
 
सर्किट, व्हायरस, फुनसुक वांगडू या चित्रपटातील व्यक्तिरेखाही अनोख्या होत्या आणि संवाद दमदार होते.
 
उदाहरणार्थ, जेव्हा चित्रपटातील मुन्नाभाईचं पात्र एमबीबीएस शिकत असताना म्हणतो की , '206 टाइप की तो सिर्फ हड्डी है, तोडते टाइम अपुन लोग सोचते थे क्या?'
"या मौत पर ये फलसफा कि लाइफ में जब टाइम कम रहता है न, डबल जीने का डबल".
 
किंवा 3 'इडियट्स'चा फरहान (माधवन) जेव्हा म्हणतो, "दोस्त फेल हो जाए तो दुख होता है लेकिन दोस्त फर्स्ट आए तो ज्यादा दुख होता है."
 
ज्येष्ठ चित्रपट पत्रकार रामचंद्रन श्रीनिवासन यांच्या मते, 'शाहरुखसारखा यशस्वी स्टार आणि हिरानी यांच्या सारखे दिग्दर्शक 'डिंकी'मध्ये एकत्र येणं ही एक खास गोष्ट आहे.'
 
हिरानी यांचं कुटुंब पाकिस्तानातून आलं होतं
हिरानींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर, फाळणीनंतर त्यांचं सिंधी कुटुंब पाकिस्तानातून आग्रा इथं पोहोचलं आणि नागपुरात स्थायिक झालं, तिथं त्यांच्या वडिलांनी टाईपरायटिंग शिकवण्यास सुरुवात केली.
 
शाळा संपल्यानंतर राजकुमार हिरानी यांना इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी कॉमर्स आणि सीएचा अभ्यास सुरू केला पण अंकगणित समजू शकलं नाही.
 
मग काय झालं " थ्री इडियट्स'चा फरहान कुरेशी (आर माधवन) त्याच्या वडिलांना म्हणाला, "मुझे नहीं समझ में आती इंजीनियरिंग. रँचो बहुत सिंपल सी बात कहता है. जो काम में मज़ा आए उसे अपना प्रोफ़ेशन बनाओ. फिर काम काम नहीं, खेल लगेगा.”
 
("मला इंजिनिअरिंग समजत नाही. रँचो काहीतरी अगदी साधेपणाने सांगतो. तुम्हाला जे काही काम आवडते तोच तुमचा व्यवसाय बनवा. मग काम हे काम उरणार नाही, खेळासारखं वाटेल.")
 
राजकुमार हिरानी यांनी हीच गोष्ट वडिलांना सांगितली आणि वडील अगदी सहज म्हणाले, 'मग नको करू अभ्यास.'
 
त्यानंतर वडिलांच्या सांगण्यावरून हिरानी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेले.
 
पहिल्या वर्षी प्रवेश मिळाला नसला तरी दुसऱ्या वर्षी त्यांनी एफटीटीआयमध्ये एडिटिंगला प्रवेश घेतला.
 
हिरानी चित्रपटाचे प्रोमो एडिट करायचे
एडिटिंगच्या कलेने राजकुमार हिरानी यांच्या चित्रपट कारकिर्दीचा पाया घातला गेला, जिथं त्यांनी लघुपट इत्यादी एडिटिंग करण्यास सुरुवात केली आणि नंतर जाहिराती बनवल्या.
 
विधू विनोद चोप्रा जेव्हा '1942 अ लव्ह स्टोरी' बनवत होते तेव्हा हिरानींना त्याचा चित्रपटाचा प्रोमो बनवला. त्यानंतर हिरानी यांनी 'करीब'चा प्रोमो ही बनवला.
 
2000 साली हिरानींना 'मिशन काश्मीर' एडिटिंग करण्याची संधी मिळाली आणि तिथूनच हिरानींनी ठरवलं की ते स्वतःचा चित्रपट बनवतील.
 
त्यानंतर वर्षभर हिरानी यांनी कोणतंही काम केले नाही आणि केवळ एका कथवेवर ते काम करत राहिले,
 
ही कथा त्यांच्या जवळच्या मित्रांच्याच जीवनावर आधारित होती. त्यांचे हे मित्र वैद्यकीय शिक्षण घेत होते.
 
अनिल कपूर, विवेक ओबेरॉयपासून ते शाहरुखपर्यंत अनेक टप्पे पार करत राजकुमार हिरानी यांनी संजय दत्तसोबत 'मुन्नाभाई एमबीबीएस' हा पहिला चित्रपट केला.
 
संजय दत्त या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होता. सुरुवातीला संजय दत्त जिम्मी शेरगिलनी जी भूमिका साकारली आहे ती करणार होता पण त्याला प्रमुख भूमिका मिळाली.
 
हिरानी यांच्यावर टीका झाली नाही, असं नाही. संजय दत्तच्या जीवनावर आधारित 'संजू' हा चित्रपट आला तेव्हा रणबीर कपूरच्या कामाची प्रशंसा झाली आणि समीक्षकांनी त्याला एक मनोरंजक चित्रपट म्हटलं.
 
पण हिरानींच्या अनेक चाहत्यांनी याला प्रोपगंडा मूव्ही देखील म्हटलं होतं.
 
'संजू'वर टीका
चित्रपट समीक्षक एना वेटिकाड यांनी 2018 मध्ये फर्स्टपोस्टसाठी त्यांच्या चित्रपटांची समीक्षा करताना लिहिलं आहे की, "रणबीर कपूरने एक अप्रतिम काम केलं आहे परंतु हा एक 'डिसहॉनेस्ट' संजय दत्त बायोपिक आहे."
 
"राजकुमार हिरानी आणि अभिजात जोशी यांनी संजय दत्तच्या आयुष्यातील निवडक घटना घेऊन त्या घटनांना गोंजारून नायकाला पडद्यावर आणलं आहे."
 
"संजय दत्तच्या उणिवा ज्या आधीच जगजाहिर आहेत, त्या हलक्याफुलक्या विनोदी शैलीत मांडण्यात आल्या होत्या. अनेक उत्कृष्ट चित्रपट देणाऱ्या हिरानींसारख्या दिग्दर्शकानं हे केलं, हे दुर्दैव आहे."
 
गिरीश वानखेडे सांगतात, "अनेकांनी संजू चित्रपटावर टीका केली होती की वादग्रस्त आणि जिवंत अभिनेत्यावर चित्रपट कसा बनवता येईल.
 
"तुरुंगात गेलेल्या व्यक्तीच्या कथेत वीरता जोडली गेली हे प्रचारासारखचं होतं. पण हिरानींनी हे आव्हान स्वीकारलं आणि ते यशस्वी केलं."
 
राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एडिटर म्हणून केली आणि आजपर्यंत त्यांच्या चित्रपटांचे एडिटिंग ते स्वतः करतात.
 
ते त्यांच्या चित्रपटाची कथा त्यांचे सहकारी असलेल्या अभिजात जोशींसोबत स्वतः लिहितात. आता त्यांचं स्वतःचे प्रोडक्शन हाऊसही आहे.
 
एकेकाळी राज कपूर, हृषिकेश मुखर्जी यासारखे सेलिब्रिटी होते ज्यांच्या नावासमोर दिग्दर्शक, निर्माता, पटकथा आणि संकलक अशी बिरुदावली असायची.
 
यांची एकमेकांशी तुलना करण्याची नाही. पण राजकुमार हिरानी हे नाव याच यादीत सामील झालं आहे.
 
त्यांच्या या यशानंतर 'थ्री इडियट्स' या त्यांच्याच चित्रपटातील संवाद आठवतोय, " बच्चा काबिल बनो काबिल, कामयाबी तो झक मार कर पीछा करेगी."
 
Published By- Priya Dixit