शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (19:53 IST)

जावेद अख्तर : असं काय घडलं ज्यामुळे सलग सुपरहिट सिनेमे देणारी सलीम-जावेदची जोडी तुटली?

Javed Akhtar
जावेद अख्तर यांच्या आईला पत्रं लिहायची भारी हौस होती. त्या जवळपास दरदिवशी पत्र लिहायच्या.
आपल्या पतीला, जाँनिसार अख्तर यांना लिहिलेल्या पत्रात त्या जावेद यांच्याविषयी लिहितात, "जादूविषयी सांगावं ते नवलच. त्याला विचारलं की, तुझ्या आजोबांचं नाव काय तर सांगतो 'स्टॅलिन' आणि तुझ्या काकाचं नाव काय, तर म्हणे 'चाचा दालिब' (गालिब)." जावेद अख्तर लिहितात, "माझ्या आई-वडिलांनी नऊ वर्ष संसार केला. त्यानंतर ते वेगळे राहिले."
 
जावेद अख्तर यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी ग्वाल्हेरच्या कमला हॉस्पिटलमध्ये झाला. जावेद अख्तर सांगतात,
 
"माझा जन्म झाल्यानंतर मला बघायला वडिलांचे काही मित्र आले होते. त्यातल्याच एकाने माझ्या वडिलांना, मुलाचं नाव काय ठेवणार असं विचारलं? यावर त्यातल्याच एकाने माझ्या वडिलांना त्यांची आठवण सांगितली. माझ्या वडिलांनी माझ्या आईशी लग्न केल्यावर एक नज्म म्हटली होती, 'लम्हा लम्हा किसी जादू का फसाना होगा' यातल्याच जादू नावावरून माझं नाव जादू ठेवलं."
 
"मी चार वर्षांचा होईपर्यंत मला याच नावाने हाक मारली जायची. जेव्हा मला शाळेत घालायचं ठरलं तेव्हा जादू नावामुळे सगळे जण मला चिडवतील असं सगळ्यांनी माझ्या आईला सांगितलं. त्यामुळे जादूच्या जवळपास असलेलं नाव शोधायला सुरुवात झाली. आणि यातूनच माझं नाव जावेद असं ठेवलं. सहसा तुमच्या खऱ्या नावावरून तुमचं टोपणनाव ठेवलं जातं. पण माझ्या बाबतीत ते उलटं घडलं होतं. पण आजही माझे कुटुंबीय आणि मित्र मला 'जादू' या नावानेच हाक मारतात."
कानात 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' वाचला...
जेव्हा एखादया मुस्लीम कुटुंबात मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या कानात अजान वाचली जाते.
जावेद अख्तर सांगतात, "माझ्या जन्मानंतर माझ्या वडिलांच्या काही मित्रांनी त्यांना विचारलं की, तुझा तर देवावर विश्वास नाहीये. तू तर नास्तिक आहेस. मग आता काय करशील? त्यांच्या सोबत असणाऱ्या एका मित्राच्या हातात मार्क्सचा 'कम्युनिस्ट मॅनिफेस्टो' होता. माझ्या वडिलांनी तो मॅनिफेस्टो हातात घेतला आणि त्यातली, 'वर्कर्स ऑफ द वर्ल्ड यूनाइट, यू हॅव नथिंग टू लूज बट यॉर चेन्स' ही ओळ माझ्या कानात वाचली."
 
वडिलांशी कधीच पटलं नाही
जावेद अख्तर सांगतात, "बऱ्याचदा मुलांच्या वडिलांच्या बाबतीत तक्रारी असतात की आमचे वडील आम्हाला हवे तसे नाहीयेत. पण प्रत्येक माणूस आपल्याला हवा आहे तसा असेलच असं नाही. ते मुळात कवी स्वभावाचे होते. त्यामुळे असे लोक बऱ्याचदा बेजबाबदार वागत असतात. माझे वडीलही तसेच होते."
 
जावेद अख्तर यांनी त्यांचं बालपण लखनऊ, अलीगढ आणि भोपाळमध्ये व्यतीत केलं.
 
अलीकडेच जावेद अख्तर यांचं 'जादूनामा' हे चरित्र प्रसिद्ध झालंय.
या पुस्तकाचे लेखक अरविंद मंडलोई सांगतात, "जावेद अख्तर यांच्या आयुष्यात खूप संकटं आली, ज्याची आपल्याला कल्पना देखील करता येणार नाही. ते भोपाळमध्ये असताना सैफिया कॉलेजच्या एका रूममध्ये राहायचे. त्या रूममध्ये ढेकणांचं साम्राज्य होतं. जावेद साहेबांच्या खाण्याचा वेग इतका असायचा की, ते तीन मिनिटांत जेवण फस्त करायचे. या पाठीमागेही एक कारण होतं."
 
"ते ज्या हॉटेलमध्ये जेवायचे तिथं उधारी केलेली चालायची. पण हॉटेलचा मालक यायच्या आधी जेवून निघून जावं लागायचं. जावेद साहेबांची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे, जर त्यांचं काही चुकलं तर ते उघडपणे माफी मागायचे. शंकर महादेवन, सतीश कौशिक, अमिताभ बच्चन अशा कित्येक लोकांना त्यांनी संधी दिलीय. पण कधीच त्यांनी स्वतःचा बडेजाव मिरवला नाही."
 
एवढा सगळा संघर्ष करत असतानाच दिग्दर्शक बनायचं स्वप्न उराशी घेऊन जावेद अख्तर यांनी 4 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबई गाठली.
 
...आणि मीना कुमारींची फिल्मफेअर ट्रॉफी हातात घेतली
 
मुंबईत येऊन त्यांना सहाच दिवस झाले असतील, त्यांना त्यांच्या वडिलांचं घर सोडावं लागलं. त्यावेळी त्यांच्या खिशात अवघे 27 पैसे होते. सुरुवातीच्या काळात त्यांना संघर्ष करावा लागला. या काळात ते कमल स्टुडिओत, कधी कंपाऊंडमध्ये, कधी व्हरांड्यात तर कधी झाडाखाली, बेंचवर झोपून दिवस काढत होते.
 
त्या दिवसांच्या आठवणींविषयी जावेद अख्तर सांगतात की, "त्या काळात मीना कुमारी आणि कमाल साहेबांचं बिनसलं होतं. आणि त्यांच्या 'पाकीजा' चित्रपटाचं शूटिंग देखील संपलं होतं. सेटवर एक कॉस्च्युम रूम होती. तिथंच 'पाकीजा' चित्रपटाचे कॉस्च्युम ठेवले होते. एकदा मी ते कपाट उघडलं, त्यात चित्रपटात वापरलेले जुने शूज आणि सँडल भरलेले होते. शिवाय त्यात मीना कुमारींचे तीन फिल्मफेअर अवॉर्ड्स देखील ठेवले होते."
"तिथं एक मोठा आरसा होता. रात्रीचं तिथं कोणी नसताना मी रूम आतून बंद करायचो आणि ती ट्रॉफी हातात घेऊन आरशासमोर उभा राहायचो आणि विचार करायचो की ही ट्रॉफी मला मिळाल्यावर हॉलमध्ये टाळ्या वाजतील, माझी रिअॅक्शन काय असेल. आयुष्यात मी पहिल्यांदाच एखादी ट्रॉफी हातात घेतली होती, आणि ती मीना कुमारी यांची फिल्मफेअर ट्रॉफी होती."
 
1967 मध्ये जावेद अख्तर त्यांच्या वडिलांच्या 'बहू बेगम' या चित्रपटाच्या प्रीमियरला गेले होते.
 
'हिप्पी'सारखा चेहरा
सुप्रसिद्ध उर्दू साहित्यिक कुर्रतुल ऐन हैदर लिहितात, "त्याच प्रीमियरमध्ये वाजिदा तबस्सुम बोट दाखवत म्हणाल्या की, 'हा तर अख्तर भाईंचा मुलगा जादू आहे ना?' त्यावेळी हा मुलगा भविष्यात मोठा व्यक्ती होईल असं भाकीत करण्याचं माझ्याकडे दुसरं कोणतं कारण नव्हतं. मला तर तो मुलगा हिप्पीसारखा वाटला. त्याने मनगटावर हिप्पी ब्रेसलेट घातलं होतं आणि तो थोडा सैरभैर असल्यासारखा दिसत होता."
"नंतर कळलं की, मुश्ताक सिंग नावाच्या शीख मित्राची ती आठवण होती. आपल्या प्रतिभेच्या आणि ह्युमरच्या साथीने जावेदने आपला लढा दिला. ह्युमर आणि मैफिल रंगवण्याची कला त्यांना त्यांच्या मामाकडून मिळाली होती."
 
सलीम खान यांच्यासोबत केलं काम
जावेद अख्तर यांनी सुरुवातीला डायरेक्टर असलेल्या कमाल अमरोही यांच्यासाठी क्लॅपर बॉय म्हणून 50 रुपये प्रति महिना पगारावर काम केलं.
 
त्यानंतर त्यांना एस.एम.सागर यांच्याकडे नोकरी मिळाली. त्यावेळी सलीम खान त्यांच्या एका चित्रपटात रोमँटिक रोल करत होते.
 
सागर यांना या चित्रपटाच्या डायलॉगसाठी रायटर मिळत नव्हता. त्यांनी जावेदना 'सीन लिहिता येतो का?' असं विचारलं.
 
यावर जावेद साहेबांनी तीन चार सीन लिहून दिले. सागर यांना ते सीन आवडले आणि त्यांनी लगेचच जावेदना एक स्क्रीनप्ले लिहायला दिला.
सलीम आणि जावेद यांनी पहिल्यांदाच एकत्र येत या चित्रपटात काम केलं. पुढे त्या दोघांनी मिळून 'अधिकार' चित्रपटाचा स्क्रीनप्ले लिहिला. पण क्रेडिट देताना मात्र या दोघांची नावं वगळण्यात आली.
 
यानंतर दोघेही रमेश सिप्पी यांच्या स्टोरी डिपार्टमेंटसाठी काम करू लागले.
 
जावेद सांगतात, "त्यावेळी रमेश सिप्पी 'अंदाज' हा चित्रपट बनवत होते. आम्ही दोघांनी या अंदाज चित्रपटासाठी काम केलं आणि आम्हाला बिलिंगही मिळालं. पण बिलिंग करताना आमच्या दोघांची नावं वेगवेगळी दिली होती. त्यानंतर 'हाथी मेरे साथी' साठी झालेल्या बिलिंगमध्ये पहिल्यांदाच आमच्या दोघांची नावं सलीम-जावेद अशी एकत्र करण्यात आली."
 
पहिल्यांदाच झळकलं पोस्टरवर नाव
सलीम-जावेद जोडीगळीने सलग नऊ सुपरहिट चित्रपट दिले. त्यांचा चौथा चित्रपट 'जंजीर' जेव्हा हिट झाला तेव्हा सलीम-जावेद यांनी पोस्टरवर लेखकाचं नाव पाहिजे असा आग्रह धरला.
 
जावेद सांगतात की, "जेव्हा आम्ही आमचं नाव पोस्टरवर हवं असं सांगितलं तेव्हा असं करता येत नाही म्हणत आम्हाला नकार देण्यात आला. मुंबईत 'जंजीर' रिलीज झाल्यानंतर आम्ही दोन जीप भाड्याने घेतल्या, त्यात 3-4 जणांना बसवलं आणि सोबत पेंट आणि शिड्या दिल्या. त्यांना सांगितलं की, मुंबईत जिथे जिथे चित्रपटाचं पोस्टर दिसेल तिथे तिथे, 'रिटन बाय सलीम-जावेद' असं लिहून या."
 
"अख्खी रात्र ती जीप मुंबई शहरभर फिरली आणि प्रत्येक एका पोस्टरवर सलीम-जावेद असं लिहिलं. त्या घटनेपासून पोस्टरवर लेखकांची नावं देण्याचा ट्रेंड सुरू झाला."
'त्रिशूल' चित्रपट रिलीज झाल्यानंतर जुहूमध्ये चित्रपटाचं मोठं पोस्टर लावण्यात आलं होतं. या पोस्टरवर ना हिरो-हिरोईनचं नाव होतं ना दिग्दर्शकाचं. यावर फक्त 'ए फिल्म बाय सलीम-जावेद' एवढंच लिहिलं होतं.
 
सलीम-जावेदच्या चित्रपटात स्क्रिप्ट दोघे मिळून लिहायचे, पण डायलॉगची जबाबदारी जावेद अख्तर यांच्यावर असायची.
 
चित्रपट दिग्दर्शक विनय शुक्ला सांगतात की, "जावेद त्यांच्या डायलॉग मध्ये 'रेटरिक' वापरतात. त्यांच्या डायलॉग्जमध्ये इतर लेखकांसारखं अवडंबर माजवलेलं नसतं. जसं त्यांना शब्दांशी खेळता येतं अगदी तसंच ते त्यांच्या चित्रपटात सायलेंसचा वापर करतात. शोले चित्रपटात त्यांनी अमिताभ आणि जया यांच्यातील अव्यक्त प्रेम दाखवलं.
 
शक्ती चित्रपटात आईच्या मृत्यूनंतर विजयचं घरी येणं, काही न बोलता आपलं दुःख व्यक्त करणं दाखवलं. शोले चित्रपटात अहमदचा मृतदेह आणि घोड्यांच्या टापा वाजणं आणि त्याचवेळी इमाम साहेबांनी विचारणं, इतना सन्नाटा क्यों है भाई."
 
'जंजीर' चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांची शिफारस
अमिताभ बच्चन आणि जावेद अख्तर यांची पहिली भेट आनंद चित्रपटाच्या सेटवर झाली आणि या भेटीनंतर ते त्यांचे चाहते झाले.
 
त्यांच्या अभिनयाने तर ते प्रभावित झालेच होते पण त्यांच्या वागणुकीमुळे देखील ते प्रभावित झाले होते.
 
जावेद अख्तर सांगतात की, त्यांनी अमिताभ बच्चन यांना कधीच कोणाची निंदानालस्ती करताना ऐकलेलं नाही. सुपरस्टार असूनही अनेकदा बच्चन सकाळी 7 वाजता शूटिंगसाठी स्टुडिओत पोहोचल्याचं त्यांनी पाहिलंय.
 
बऱ्याचदा बाकीचे लोक पोहोचलेलं नसायचे, पण बच्चन त्यांच्या गाडीत थांबून फ्लोअरचा दरवाजा कोणीतरी उघडेल म्हणून वाट बघत बसायचे.
 
जावेद अख्तर सांगतात, "त्यावेळी प्रकाश मेहरा 'जंजीर' चित्रपट बनवत होते. त्यांनी धर्मेंद्र यांना लीड रोल देण्याचा विचार केला होता. मात्र या त्यांनी या ना त्या कारणाने हा चित्रपट नाकारला. इतर अभिनेत्यांनाही ऑफर देण्यात आली होती. पण चित्रपटात एकही रोमँटिक सीन नाही असं सांगत त्यांनी यात काम करण्यास नकार दिला."
"दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी बऱ्याच चित्रपटात काम करून देखील त्यांना हिट चित्रपट देता आला नव्हता. मी त्यांना 'परवाना' आणि 'रास्ते का पत्थर' सारख्या एक-दोन चित्रपटात पाहिलं होतं. भले ही हे चित्रपट चालले नसतील पण अभिनेता म्हणून बच्चन यांनी आपली छाप सोडली होती."
 
"या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना लीड रोल द्यावा म्हणून मी प्रकाश मेहरा यांची मोठ्या कष्टाने मनधरणी केली. आणि त्यानंतर जे घडलं ते सगळ्यांनाच माहीत आहे. चित्रपटासाठी मी जे डायलॉग्ज लिहिले होते त्यात बच्चन यांनी स्वतःची शैली वापरून ते आणखीन प्रभावी केले होते. असा फोकस आवड आणि एनर्जी मला दुसऱ्या अभिनेत्यामध्ये दिसलीच नाही."
 
मैफिलींची शान, जावेद अख्तर
70 च्या दशकाच्या मध्यापर्यंत जावेद अख्तर फक्त चित्रपटाचे लेखक म्हणूनच नाही तर मुंबईत रंगणाऱ्या मैफिलींची शान समजले जाऊ लागले.
 
'धर्मयुग' या प्रसिद्ध मासिकाचे संपादक राहिलेले धर्मवीर भारती यांच्या पत्नी लेखिका पुष्पा भारती त्यांच्या 'यादें, यादें और यादें' या पुस्तकात लिहितात, "कृष्ण चंदर यांचा मुलगा बिल्लूच्या लग्नासंदर्भात त्यांच्या घरी एक बैठक बसली होती. थोड्याच वेळात बिल्लूचे तीन मित्र आले आणि तिथेच बसले. त्या तिघांपैकी एकाकडे आमचं लक्ष गेलं. त्याचे विस्कटलेले केस, गबळ्या अवतारातील ते सडपातळ व्यक्तिमत्त्व होतं."
"तीक्ष्ण डोळ्यांचा तो तरुण मध्येच काहीतरी बोलायचा आणि बैठकीतले लोक हसायचे. त्यानंतर हा तरुण गालिच्यावर बसून 'सरौता कहाँ भूलि आए, प्यारे नंदोइया' गाऊ लागला तसं सर्व लोक त्याच्याभोवती जमा झाले आणि त्याच्यात सुरात सूर मिसळून गाऊ लागले. नंतर समजलं की हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून डझनभर हिट चित्रपटांचे लेखक जावेद अख्तर आहेत."
 
सलीम-जावेद जोडीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला
एकमेकांच्या सोबतीने कित्येक हिट चित्रपट देणाऱ्या सलीम-जावेद जोडगळीने आता एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
 
जावेद अख्तर यांना जेव्हा मी याचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले की, "सलीम साहेब माझ्यासाठी फादर फिगर होते. जर तुम्ही स्टील, सिमेंट किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये तुमचं पटत नसेल तरी तुम्ही पार्टनर होऊ शकता. पण जेव्हा आपण एकत्र स्क्रिप्ट लिहितो तेव्हा सीन मोजण्यासाठी ना कोणता मापदंड असतो, ना कोणतं मोजमाप असतं. तुम्ही लिहीत असाल तर त्यात असं काम करणं शक्य नसतं."
"त्यानंतर आयुष्याने आमचं फ्रेंड सर्कल विभागलं. माझे काही वेगळे मित्र झाले, तर त्यांचेही काही वेगळे मित्र झाले. आमची संध्याकाळ आता या वेगवेगळ्या मित्रांच्या सानिध्यात जाऊ लागली आणि आमच्यात एक अंतर निर्माण झालं. एक दिवस मला जाणवलं की, आमचं पूर्वी जे नातं होतं ते आता राहिलेलं नाही. पण न बोलताही आम्ही त्या गोष्टी समजून घेऊ शकत होतो, त्यामुळे आम्ही एकमेकांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. विचार जुळणारा आणि एकमेकांच्या मनापर्यंत पोहोचणारा पूल तुटला होता."
 
शबाना आझमींशी पहिली भेट
शबाना आझमी सांगतात की, चित्रपट दिग्दर्शक सई परांजपे यांच्या घरी माझी आणि जावेद अख्तर यांची पहिली भेट झाली.
 
जावेद यांनी शबाना यांचा 'स्पर्श' हा चित्रपट पाहिला होता. तो त्यांना इतका आवडला की, त्यांनी 'स्पर्श'च्या युनिटची भेट करून देण्याची विनंती सई परांजपे यांना केली होती.
 
शबाना सांगतात, "जावेदने तो चित्रपट इतक्या बारकाईने पाहिला होता की, त्यांना जवळपास सगळे डायलॉग्ज पाठ झाले होते."
जावेद सांगतात की, शबाना आझमी यांच्याशी पहिली भेट कधी झाली हे त्यांना आठवत नाही. पण दोघांच्याही घरी एकसारखंच वातावरण होतं.
 
"त्या काळात मुंबईतील पुरोगामी लेखकांच्या मांदियाळीत अली सरदार जाफरी, कैफी आझमी, इस्मत चुगताई, कृष्ण चंदर आणि राजेंद्र सिंग बेदी यांची नावं घेतली जायची. सगळे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होते. प्रत्येकाचं एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं. या सगळ्यांची मुलं देखील एकमेकांच्या ओळखीची होती.आणि अशीच शबाना आणि माझी पहिली भेट झाली असावी."
 
यावर शबाना आझमी सांगतात की, बरेच लोक गंमतीने म्हणतात की, आमचं बॅकग्राऊंड सेम असल्याने आमचं अरेंज्ड मॅरेज व्हायला हवं होतं. माझे वडील आणि त्यांचे वडील मित्र होते. जावेद सांगतात, मी अपूर्ण होतो मात्र शबाना भेटल्यानंतर ती अपूर्णता संपली.
 
जावेद अख्तर यांचा प्रेमळ स्वभाव
शबाना आझमी सांगतात, "वरवर असं वाटतं की जावेद खूप बेजबाबदार आहेत, पण खरं सांगायचं तर ते एक जबाबदार व्यक्ती आहेत. ज्याने त्यांना त्यांच्या वाईट वेळेत साथ दिलीय त्यांना ते कधीही विसरत नाहीत. ते नेहमी सांगतात की, जर तुम्ही एखाद्याचं चांगलं केलं असेल तर कधीच ती गोष्ट लक्षात ठेऊ नका किंवा बदल्यात तो तुमच्यासाठी काहीतरी करेल अशी अपेक्षा त्याच्याकडून ठेऊ नका."
"एक दिवस जानकी कुटीर यांच्या छतावर एक मांजर चढून ताटातील भाकरी पळवून नेत होती. हे बघून एक स्टाफ पुढे आला आणि तिला हुसकावून लावू लागला. पण जादू त्याला ओरडून म्हणाले की, तिला जाऊ दे, ती तिच्या पिल्लांसाठी ते घेऊन चालली आहे. ते वरून जरी कठोर हृदयाचे वाटत असले तरी ते अत्यंत प्रेमळ स्वभावाचे आहेत."
 
जावेद अख्तर यांना सौम्य विचार करण्याची क्षमता वारशातच मिळाली आहे.
 
त्यामुळेच ते लिहितात,
 
मैं और मेरी तन्हाई
 
अक्सर ये बातें करते हैं
 
तुम होती तो कैसा होता
 
तुम ये कहतीं तुम वो कहतीं
 
तुम इस बात पे हैरा होतीं
 
तुम उस बात पे कितनी हँसतीं
 
तुम होती तो ऐसा होता
 
तुम होतीं तो वैसा होता
 
विशेष म्हणजे एवढे मोठे गीतकार असूनही जावेद अख्तर यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिला शेर 1979 साली लिहिला.
 
जावेद सांगतात, "मला माझ्या लहानपणापासूनच माहीत होतं की जर मी मनात आणलं तर शेरोशायरी सुद्धा लिहू शकतो पण मी लिहिलीच नाही. ही कदाचित माझी नाराजी आणि वारसा असेल. शेर लिहून मी माझ्या वडिलांचा वारसा पुढे चालवलाय."
 
वडिलांविषयी विचारलं असता जावेद अख्तर सांगतात, "माझ्या वडिलांनी मला एकदा सांगितलं होतं की, अवघड भाषेत लिहिणं सोपं असतं पण सोप्या भाषेत लिहिणं अवघड असतं. त्यांच्या शायरीत खूप अवघड शब्द नसायचे. त्यांचा शब्दसंग्रह प्रचंड होता."
 
"जाँनिसार अख्तर यांची शायरी संथ अहे. 18 ऑगस्ट 1976 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या मृत्यूआधी 9 दिवस त्यांनी एका पुस्तकावर ऑटोग्राफ देताना लिहिलं होतं, जब हम न रहेंगे तो बहुत याद करोगे."
Published By- Priya Dixit