1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (13:30 IST)

जवान : फक्त पाच चित्रपट करून अॅटली एवढा चर्चित दिग्दर्शक कसा बनला?

Atlee
मुरलीधरन काशी विश्वनाथ
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका जोडप्याचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री कृष्ण प्रिया सोबत तिच्या पतीचा हा फोटो होता आणि त्याच्या रंगावरून त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं.
 
सोशल मीडियावर झालेल्या या ट्रोलिंगनंतर या फोटोमध्ये दिसणारा हा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली असल्याची माहिती समोर आली.
 
सोशल मीडिया ट्रोलिंग आणि अॅटली यांचं नातं थोडं घट्टच आहे असं म्हणावं लागेल. कारण शाहरुख खानसोबत त्याने एक्सवर शेअर केलेला एका फोटो बनावट असल्यावरूनही तो प्रचंड ट्रोल झाला होता.
 
अॅटली कुमारने 2013 मध्ये त्याच्या दिग्दर्शनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि केवळ चारच चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर त्याने शाहरुख सोबत 'जवान' हा चित्रपट दिग्दर्शित केलाय.
 
'जवान' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय असं अनेक अहवालांमधून दिसतंय. जवान चित्रपटाने आत्तापर्यंत तब्बल 520 कोटींचा गल्ला जमवल्याची चर्चा आहे.
 
या चित्रपटाची, शाहरुख खानची चर्चा होत असली तरी अनेकांना उत्सुकता आहे या चित्रपटाचा दिग्दर्शक अॅटली कोण आहे याची?
 
अॅटलीने आतापर्यंत केवळ पाचच चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. 'जवान'नंतर त्यांचं नाव देशभरात पोहोचलं असून केवळ तमीळच नाही, तर भारतीय चित्रपट सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून आता त्याचं नाव घेतलं जाऊ लागलं आहे.
 
वरकरणी पाहता अॅटलीने अल्पावधीतच मिळवलेलं हे यश अविश्वसनीय असलं तरी अगदी किरकोळ शरीरयष्टी असणारे आणि सहज वावरणारे अॅटली यांच्या कारकिर्दीत एकही अयशस्वी चित्रपट नाहीये हे विशेष.
 
21 सप्टेंबर 1986 रोजी मदुराई, तामिळनाडू येथे थिरुपरनकुंद्रम येथे जन्मलेल्या अॅटली याचं नाव अरुण कुमार असं आहे.
 
चेन्नईतल्या सत्यभामा महाविद्यालयातून व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शंकर यांचे सहाय्यक म्हणून काम सुरु केलं.
 
त्यांनी शंकर यांच्या 'नानबन' (3 इडियट्सचा तमिळ रिमेक) आणि रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या 'एन्थिरन' (रोबोट) या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
 
अॅटलीच्या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी होती?
यानंतर, त्याने मुगापुथगम (फेसबुक) नावाचा एक लघुपट दिग्दर्शित केला ज्यामध्ये तमिळ अभिनेता शिवकार्तिकेयन मुख्य भूमिकेत होता. या लघुपटाने खूप लक्ष वेधून घेतलं होतं.
 
यानंतर त्याने 'राजा' नावाच्या एका चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन अनेक निर्मात्यांचे उंबरठे झिजवले आणि अखेर तमिळ चित्रपट निर्माते ए.आर. मुरुगदोस यांनी हा चित्रपट निर्मिती करण्याची तयारी दाखवली.
 
फॉक्स स्टार स्टुडिओच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली होती.
 
आर्या, जय, नयनतारा आणि नाझरिया नाझिम यांच्या भूमिका असलेला ‘राजा रानी’ हा त्या वर्षीच्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला.
 
25 कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने तब्बल 84 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचा एक बंगाली रिमेक देखील बनवण्यात आला आणि समीक्षकांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं होतं.
Atlee
पहिल्याच चित्रपटाने, अॅटली यांना अनेक पुरस्कार मिळवून दिले. तामिळनाडू सरकारकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार आणि तामिळ फिल्मफेअर पुरस्कारदेखील या चित्रपटाला देण्यात आले.
 
तामिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार विजय यांच्यासोबत अॅटलीने त्यांच्या दुसऱ्याच चित्रपटात काम केलं. कालाईपुली ​​थानू यांची निर्मिती असलेल्या या 'थेरी' नावाच्या चित्रपटात विजयसोबत समंथा आणि अॅमी जॅक्सन या अभिनेत्रींनी अभिनय केला होता.
 
समीक्षकांनी या चित्रपटाचं फारसं कौतुक केलं नसलं तरीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात मात्र या चित्रपटाला यश मिळालं होतं.
 
यानंतर सुपरस्टार विजयने आणखीन एक चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी अॅटलीने दिली.
 
'मेर्सल' नावाच्या या चित्रपटामध्ये विजय यांच्यासोबत अभिनेत्री समंथा आणि वाडीवेलू यांनी अभिनय केला होता. हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता.
 
या चित्रपटाने तब्बल 250 कोटींची कमाई केलेली होती. त्याकाळात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या चित्रपटांपैकी मेर्सल हा एक चित्रपट होता.
 
युरोपमधील सर्वात मोठ्या सिनेमागृहांपैकी एक असलेल्या ग्रँड रेक्समध्येही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.
 
अॅटलीचा पुढचा चित्रपट ‘बिगिल’ मध्ये देखील विजयने अभिनय केला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 58 कोटी रुपयांची कमाई केली आणि पहिल्या चार दिवसांत 75 कोटी रुपयांची कमाई केली.
 
या चित्रपटाची निर्मिती केलेल्या AGS कंपनीने घोषणा केली की, या चित्रपटाची एकूण कमाई 300 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.
 
विजय यांनी काम केलेला हा पहिला असा चित्रपट होता ज्याने कमाईच्या बाबतीत 300 कोटींचा टप्पा पार केला.
 
'बिगील' चित्रपटाची शूटिंग सुरु असतांनाच अॅटलीच्या पुढच्या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
 
अखेर जून 2022मध्ये या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
 
तसं बघायला गेलं तर हा अॅटलीच्या कारकिर्दीतला केवळ पाचवा चित्रपट होता. मात्र, या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या संस्थेने तब्बल 300 कोटी रुपये या चित्रपटात गुंतवण्याची तयारी दाखवली.
 
आता 'जवान' चित्रपटाबाबत येणाऱ्या प्रतिक्रिया संमिश्र असतानादेखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
 
चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या चारच दिवसानंतर या चित्रपटाने तब्बल 287 कोटींची कमाई केल्याच्या बातम्या आहेत. एकूण कमाईच्या बाबतीत शाहरुख खानचा 'जवान' 300 कोटींपेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज तज्ज्ञांनी लावलाय.
 
उत्कृष्ट कलाकारांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी
केवळ पाचच चित्रपट दिग्दर्शित केलेल्या अॅटली यांनी त्यांच्या चित्रपटांची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवलंय.
 
सातत्याने उत्कृष्ट कलाकारांसोबत काम करणं ही अॅटलीच्या चित्रपटांची ओळख बनत चालली आहे. त्यांच्या पहिल्या दोन चित्रपटांमध्ये जी.व्ही.प्रकाश कुमार यांनी संगीत दिलं होतं.
 
जी.व्ही.प्रकाश कुमार हे सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचे भाचे म्हणूनही ओळखले जातात. जवान या चित्रपटाला देखील अनिरुद्ध यांनी संगीत दिलं आहे.
 
अॅटलीच्या पहिल्या दोन चित्रपटांमध्ये जॉर्ज सी विल्यम्स यांनी सिनेमॅटोग्राफी केली आणि पुढच्या तिन्ही चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी जी के विष्णू यांनी केली होती.
 
चित्रपटाच्या एडिटिंग साठी त्यांनी सातत्याने रूबान यांच्यासोबत काम केलं आहे.
 
प्रत्येक चित्रपटामध्ये तेच तंत्रज्ञ वापरून अॅटली त्यांच्या मनातील चित्रपट पडद्यावर आणण्यात यशस्वी ठरले आहेत.
 
याशिवाय, अॅटलीची प्रमुख ताकद म्हणजे एस रमणगिरी वासन, जे टीव्ही मालिकांचे लेखक होते. या दोघांनी सगळ्यात पहिल्यांदा थेरी या चित्रपटासाठी संवादलेखनाचं काम केलं होतं.
 
त्यानंतर त्यांनी अॅटलीच्या पुढील चित्रपटात म्हणजेच मेर्सल आणि बिगिलच्या पटकथा लेखनात योगदान दिलं. वासन यांनी 'जवान'चा स्क्रीनप्लेदेखील लिहिलाय.
 
एवढं यश मिळवूनही अॅटलीच्या चित्रपटांचं दुसऱ्या चित्रपटांशी साधर्म्य असल्याचे आरोप होतात.
 
उदाहरणार्थ, 'राजा रानी' हा चित्रपट मणिरत्नमच्या 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मौनरागम' आणि 2007 मध्ये कन्नड भाषेत प्रदर्शित झालेल्या 'मिलाना' या चित्रपटांसारखा असल्याचा आरोप होता.
 
तसंच विजयकांतच्या 1990 मध्ये आलेल्या ‘छत्रियां’ चित्रपटासारखाच 'थेरी' हा चित्रपट असल्याचं चाहत्यांना वाटलं होतं.
 
वडिलांच्या खुनाचा बदला घेणाऱ्या मुलाच्या कथेवर अनेक चित्रपट तामिळ भाषेत बनवले आहेत, मेर्सल या चित्रपटाची गोष्ट देखील अशीच काहीशी होती.
 
'बिगील' चित्रपटातील अनेक दृश्यं ही शाहरुखच्या 'चक दे इंडिया'मधल्या अनेक सीन्ससोबत मिळतीजुळती असल्याचं चाहत्यांनी सांगितलं होतं.
 
आता 'जवाना'ला देखील त्याच टीकेला सामोरं जावं लागतंय. या चित्रपटाचे इतर अनेक चित्रपटांसोबत साम्य असल्याचा आरोप चाहत्यांनी केलाय.
 
'जवान' या चित्रपटाचे तब्बल 23 इतर चित्रपटांशी साम्य असल्याचा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
Atlee
अॅटलीची चित्रपट निर्मितीची शैली
अॅटलीने दिग्दर्शित केलेले चित्रपट अत्यंत नाट्यमय असतात. सामान्य जीवनात न दिसणारे अनेक भडक प्रसंग त्यांच्या चित्रपटात दाखवण्यात येतात. याबाबत अॅटली त्यांचे गुरू शंकर यांच्या शैलीचं पालन करतात असं म्हणता येईल.
 
तामिळ चित्रपटांचे समीक्षक केबल शंकर हे अॅटलीला 'व्यावसायिक चित्रपटांचा चांगला दिग्दर्शक' मानतात.
 
याबाबत ते म्हणतात की जुन्या चित्रपटांची नक्कल केल्याचे आरोप त्यांच्यावर होत असले तरी 2000 मध्ये जन्मलेल्या मुलांना आवडतील असे चित्रपट बनवण्याची कला त्यांच्याकडे आहे हे मान्यच करावं लागेल. 'तेच त्यांच्या यशाचं गुपित आहे,' असं केबल शंकर यांनी सांगितलं.
 
"याशिवाय अॅटलीने स्वतःची शैली विकसित केलीय. त्याच्यावर हजारो आरोप लावले जाऊ शकतात पण व्यावसायिक चित्रपटांमध्ये त्या चित्रपटाने किती कमाई केली हेच त्या चित्रपटाच्या यशाचं परिमाण असतं," असंही केबल शंकर यांनी सांगितलं.
 
बॉलिवूडमध्ये त्याची जागा आहे का?
तामिळ सिनेमाच्या सुरुवातीच्या दिवसांपासून, दिग्गज एस.एस. वासनपासून अनेक तमिळ दिग्दर्शकांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे.
 
आणखी एक प्रतिष्ठित तमिळ चित्रपट निर्माते के बालचंदर यांनी 80 च्या दशकात काही हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.
 
त्यानंतर मणिरत्नम, शंकर आणि ए.आर. मुरुगदोस मणिरत्नम यांनी तमिळ आणि हिंदीमध्ये द्विभाषिक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे.
 
प्रभूदेवाने अलीकडच्या काळात काही हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे तर राघव लॉरेन्सनेही एका हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं.
 
त्यामुळे बॉलिवूडमध्ये कारकीर्द घडवू पाहणाऱ्या तामिळ दिग्दर्शकांच्या मांदियाळीत 'जवान'चे दिग्दर्शक अॅटलीचं भविष्य काय असेल हे येणारा काळच सांगेल.