शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (14:17 IST)

Laal Singh Chaddha: आमिर खान म्हणतो, 'मी माझे चित्रपट 6 महिन्यापर्यंत तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर मी येऊ देत नाही, कारण...'

आमिर 4 वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्क्रिन गाजवण्यासाठी सज्ज आहे. त्याचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.
 
आमिरचा हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. मात्र त्याचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
 
सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सध्या ट्वीटरवर #BoycottLaalSinghChaddha हे ट्रेंड करत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावर बहिष्कार टाकला जात आहे. दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर मधू पाल यांनी बीबीसीसाठी आमिर खानशी संवाद साधला. त्याचा हा संपादित अंश
 
लोकांनी निदान चित्रपटगृहापर्यंत तरी यावं...
मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट लाल सिंग चड्ढा ट्रेंड होत कारणाने आमिर चिंतेत आहे.
 
तो म्हणतो, "आम्हाला वाटतं आमचे चित्रपट हिट व्हावेत, जास्तीत जास्त लोकांनी ते पाहावेत. लोकांना ते चित्रपट आवडावेत. पण हे सगळं आता बॉक्स ऑफिस ठरवेल, त्याव्यतिरिक्त तरी दुसरा कोणता मार्ग नाहीये. आम्ही खूप मेहनत घेऊन चित्रपट बनवतो. लोकांनी हे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहापर्यंत तरी यावं. आणि मला सतत याचीच चिंता लागून राहिलेली असते."
 
मागच्या काही दिवसांत बॉलीवूडचे अनेक सिनेमे रिलीज झाले पण त्यांना बॉक्स ऑफिसवर जादू दाखवत आली नाही. याचं नेमकं काय कारण असू शकेल?
 
यावर आमिर सांगतो, "असं नाहीये की चित्रपट आता चालत नाहीयेत. आपण गंगूबाई, भूल भुलैया, काश्मीर फाइल्स, पुष्पा, आर आर आर या चित्रपटांची कमाई पाहिली तर हे सगळे 100 कोटी क्लबमध्ये आहेत. हे चित्रपट चालले कारण, लोक या चित्रपटांवर बोलले, ज्यामुळे लोकांनी हे चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिले. जर लोकांना चित्रपट आवडले तर ते चित्रपट चालतात, नाहीतर नाही चालत. पण याची दुसरी बाजू काय असेल तर चित्रपट रिलीज झाले की लगेचंच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतात."
 
मी माझे चित्रपट सहा महिन्यापर्यंत तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊ देत नाही, असंही तो पुढे म्हणतो.
 
आमिर पुढे सांगतो की, "ज्या चित्रपटांची चर्चा असते ते चित्रपट पाहायला प्रेक्षक नक्कीच थिएटर मध्ये येतात. काही चित्रपट चांगले असतात मात्र तरीही चालत नाहीत, याचं कारण ते चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकर येतात. मग लोकांना वाटतं की अजून थोडं थांबलो तर हा चित्रपट मला घरीच बघता येईल."
 
"त्यात आणि कोव्हीडनंतर तर बरेच चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर यायला लागले आहेत. मी माझे चित्रपट सहा सहा महिने ओटीटीवर येऊ देत नाही. लोकांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघावेत म्हणून ते तयार केलेत. मला ओटीटीसाठी काहीतरी करायचं असेल आणि संधी मिळेल तेव्हा मी ते नक्कीच करेन. पण जर मी चित्रपट बनवतोय तर मला तो थिएटरसाठी बनवायला आवडेल."
 
57 व्या वर्षी 18 वर्षांच्या मुलाची भूमिका साकारणं सर्वात मोठं आव्हान
 
बॉलीवूडमध्ये मोठी कारकीर्द घालवलेल्या आमिरने गेल्या तीस वर्षांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याला असं वाटतं की, 'लाल सिंग चड्ढा' ही त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण भूमिका होती.
 
तो म्हणतो की, "हा चित्रपट माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. हा हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गम्पचा अधिकृत रिमेक आहे. हा चित्रपट बनवणं आमच्यासाठी खूप अवघड होतं, कारण त्याची कथा. आम्ही अनेक ठिकाणी चित्रपटाचं शूटिंग केलंय. सगळीकडे फिरत फिरत या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करावं लागलं म्हणजेच या चित्रपटाचं शूटिंग कुठल्या एका ठिकाणी पूर्ण झालेलं नाही."
 
"यात सर्वांत मोठं आव्हान होतं माझं वय. आज मी 57 वर्षांचा आहे पण मी दाखवत असलेले पात्र कधी 18 वर्षांचं तर कधी 22 तर कधी 40 तर कधी 50 वर्षांचं दाखवण्यात आलंय. म्हणजे वयाचा प्रत्येक टप्पा दाखवण्यात आलाय. मी आता 18 वर्षांचा दिसत नसलो तरी तंत्रज्ञानामुळे ते थोड्याफार प्रमाणावर शक्य झालं. शाहरुखच्या रेड चिलीज या कंपनीने माझं वय लपवण्यासाठी बरीच मेहनत घेतलीय. यावेळेस सतत वजन वाढवणं आणि कमी करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. कधी 18 वर्षाच्या मुलासारखं दिसणं तर कधी खूप म्हातारं दिसणं खूप कष्टप्रद होतं. मला आशा आहे की लोकांना माझी मेहनत दिसेल."
 
चित्रपटातले अडल्ट सीन काढून टाकले
लाल सिंग चड्ढा हॉलिवूड चित्रपटाची हुबेहूब कॉपी आहे का?
 
यावर आमिर सांगतो, "अजिबात नाही. आम्ही हा चित्रपट भारतीय संस्कृतीला साजेसा केलेला आहे. चित्रपटात जे अडल्ट सीन होते ते सुद्धा आम्ही काढून टाकले आहेत. जेणेकरून हा चित्रपट कुटुंबासोबत बसून पाहता येईल. या व्यक्तिरेखेचा निरागसपणा आजच्या तरुण पिढीने आणि मुलांनी पाहावा अशी आमची इच्छा आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही चित्रपटातले सर्व अडल्ट सीन काढून टाकले आणि कथेत मोठा बदल केला."
 
मुलगा जुनैदमध्ये दिसला लाल सिंग चड्ढा
आमिर खानचा मुलगा जुनैद लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. मात्र तसं न करण्याचं कारण सांगताना आमिर म्हणतो, "जुनैद थिएटर समजून घेण्यासाठी अमेरिकेत गेला होता आणि तिथेच तो 2 वर्षं शिकला. मी इकडे चित्रपटाची तयारी करत होतो.
 
मी माझ्या डायरेक्टरला सांगितलं होत की तू मला आधी काहीतरी टेस्ट शूट करून दाखव मगच आपण हा चित्रपट करू. जुनैद तेव्हाच अमेरिकेहून परत आला होता. माझी इच्छा होती की त्याने मला काही सीन शूट करून दाखवावेत म्हणजे मला समजेल की तो अमेरिकेहून काय शिकून आला."
 
"जुनैदने त्याची तयारी सुरू केली आणि त्याने 20 मिनिटांच शूटिंग करून आम्हाला दाखवलं. जेव्हा आम्ही हा व्हीडिओ पाहिला तेव्हा किरणला आणि मला आश्चर्य वाटलं. जुनैदचा अभिनय आमच्या मनाला स्पर्शून गेला.
 
मला जुनैदमध्ये लाल सिंग चड्ढा दिसत होता. मी ठरवलं होतं की, लाल सिंग चड्ढाची भूमिका आता जुनैदचं करेल. माझ्या मताला समर्थन मिळावं म्हणून मी इंडस्ट्रीतल्या काही मित्रांना सुद्धा हा व्हीडिओ दाखवला. 90% लोकांना माझा मुद्दा बरोबर पटला."
 
आमिरच्या मुलाचा महाराजा चित्रपटातून डेब्यू
सर्व तयारी झाली होती आणि जुनैदच्या नावाला सहमती मिळाली होती. पण चित्रपटाचे पटकथा लेखक अभिनेते अतुल कुलकर्णी आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा म्हणाले की आमिरने ही भूमिका करावी.
 
"ते म्हणाले की, चित्रपट प्लॉटप्रमाणे न जाता एखाद्या एपिसोडप्रमाणे पुढे जातोय. अशा परिस्थितीत न्यूकमरने हा चित्रपट करू नये. यावर प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर शेवटी मी चित्रपटात काम करायचं मान्य केलं.
 
आणि जर जुनैदबद्दल बोलायचं झालं तर तो खूप प्रॅक्टिकल आहे. त्याला स्वतः हा चित्रपट करायचा नव्हता. न्यूकमरसाठी हा खूप बिगबजेट चित्रपट आहे असं त्याला वाटलं. जुनैद आता 'महाराजा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचं शूटिंग सुरू झालंय."
 
किरण रावने तिच्या आगामी चित्रपटातून आमिरला का रिजेक्ट केलं?
किरण रावपासून घटस्फोट घेतल्यानंतरही आमिर आणि किरण एकत्र काम करताना दिसले होते. धोबीघाट सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारी किरण लवकरच एका नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'लापता लेडीज'
 
प्रत्येक चित्रपटाप्रमाणे याही चित्रपटात आमिर दिसणार का या प्रश्नावर आमिर म्हणतो, "यावेळी तिने मला रिजेक्ट केलंय. या चित्रपटासाठी ऑडिशन द्यायला मी गेलो होतो. पण स्क्रीन टेस्टमध्ये किरणने मला रिजेक्ट केलं. तिने कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नसल्याचं ठरवलंय.
 
रिजेक्शनमुळे एक अभिनेता म्हणून मला वाईट वाटतंय पण तो आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. मात्र, या भूमिकेसाठी तिला कोणी मिळालं नाही, तर ती मला घेईल असं ही तिने सांगितलं. म्हणजे तिने मला मला बॅकअपवर ठेवलं होतं."
 
'रिजेक्शनमुळे मला वाईट वाटायचं...'
आमिर पुढे सांगतो, "रिजेक्शनमुळे मला पहिल्यांदा वाईट वाटतं. मग मी विचार करतो की माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय आहे. मला आठवतंय, मी माझ्या सुरुवातीच्या वर्षांत हिंदी थिएटरच्या ऑडिशनला जायचो तेव्हा तेव्हा मला नाकारलं जायचं. तेव्हाही खूप वाईट वाटायचं.
 
"तिथेच नोटीस बोर्डवर गुजराती थिएटरसाठी ऑडिशन सुरू असल्याचं दिसलं. तिथे 30 ते 40 लोक कोरससाठी हवे होते. म्हणून मी विचार केला की काही झालं नाही तर मी कोरसमध्ये जाईन. मी लवकर हार मानत नाही. एक दरवाजा बंद झाला की मी लगेच दुसरीकडे वळतो."
 
किरण रावच्या चित्रपटाचा ट्रेलर लाल सिंग चड्ढाच्या रिलीज दरम्यान प्रदर्शित होणार आहे. दहा दिवसांत तुम्हाला किरणच्या चित्रपटाचा टीजरही दिसेल.
 
आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. याच दिवशी अभिनेता अक्षय कुमारचा रक्षाबंधन हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.
 
लाल सिंग चड्ढा हा चित्रपट टॉम हँक्सच्या 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर खान, साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य आहे. 'सिक्रेट सुपरस्टार' फेम अद्वैत चंदन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.