UNLOCK JINDAGI - मनाचे परिवर्तन करणाऱ्या अनलॉक जिंदगीचे ट्रेलर प्रदर्शित
दोन वर्षांपूर्वी साऱ्या जगावर एक मोठे संकट आले, कोरोना महामारीचे. अवघ्या काही दिवसांतच या महामारीने जगभर हाहाकार माजवला. कोरोनाच्या विळख्यात आपण असे अडकलो की, संपूर्ण जग ठप्प झाले. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, उद्योगधंदे, मंदिरे, दळणवळणाची साधने. संपूर्ण जगच थांबले. निर्मनुष्य रस्ते पाहून जीव घाबराघुबरा व्हायचा. लोकांचे एकमेकांना भेटणे थांबले. या महामारीत कित्येकांनी आपले प्राण गमावले, अनेकांचे भावनिक, आर्थिक, अशा सगळ्याच बाजूने नुकसानही झाले. आजही हे भयाण वास्तव आठवले, की अंगावर काटा येतो. लॉकडाऊनमधील ही परिस्थिती लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. रियल रील्स प्रस्तुत, राजेश गुप्ता निर्मित, दिग्दर्शित 'अनलॉक जिंदगी' या चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर लाँच झाले असून या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'अनलॉक जिंदगी'चे लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत.
ट्रेलरमधील पहिलाच सीन काळजाचा ठोका चुकवणारा आहे. यात एक स्वार्थी व्यावसायिक, फ्रँटलाईन वर्कर,त्याची काळजी करणारी बायको, गृहिणी, दोन असाह्य स्त्रिया यांची कहाणी पाहायला मिळणार आहे. या सगळ्यांचे आयुष्य समांतर जात असतानाच प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत. ट्रेलरमध्ये माणुसकीचा खरा चेहरा समोर आणणारी अनेक दृश्ये यात दिसत आहेत. कठीण प्रसंगात रक्ताची नाती कशी मागे फिरतात आणि अनोळखी कसे मदत करतात, याचे दर्शनही यातून होत आहे. माणसाच्या मनाचे परिवर्तन करणाऱ्या या चित्रपटाची लंडन, मेक्सिको, पॅरिस आणि टोरांटो फिल्म फेस्टिवलमध्येही निवड झाली आहे. येत्या १९ मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
दिग्दर्शक आणि निर्माते राजेश गुप्ता म्हणतात, '' ही खूप साधी गोष्ट आहे, ज्याचा अनुभव कोरोनाच्या काळात अनेकांनी अनुभवला आहे. एक गंभीर विषय त्याचे गांभीर्य जाऊ न देता विनोदी पद्धताने मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण पुण्यात झाले आहे. लॅाकडाऊन संपल्यानंतर पुण्यात लॅाकडाऊनचे चित्रीकरण करणे, निश्चितच आव्हानात्मक होते. तरीही आम्हाला अपेक्षित असे चित्रीकरण आम्ही केले. कोरोनाच्या काळातील अस्सल स्थिती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. माणसाचे मतपरिवर्तन करणारी ही कथा आहे. या चित्रपटाची दादासाहेब फाळके पुरस्कारासह आठ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली असून त्यापैकी दोन चित्रपट महोत्सवात आम्हाला बेस्ट फिचर फिल्म आणि बेस्ट नरेटिव्ह फिचर फिल्मचा पुरस्कारही मिळाला आहे.