सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (15:25 IST)

सिगारेट ओढणाऱ्या कालीमातेच्या पोस्टरवरून वाद, काय आहे प्रकरण?

kalika mata puja
कालीमातेप्रमाणे पोशाख करून सिगारेट ओढत असलेल्या एका महिलेच्या पोस्टरवरून कॅनडामध्ये वाद निर्माण झाला आहे. ओटावामधील भारतीय उच्चायुक्तालयाने या पोस्टला विरोध दर्शवला आहे.
 
भारतीय उच्चायुक्तालयाने एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे, "कॅनडामधील हिंदू समाजाच्या काही नेत्यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. एका चित्रपटाच्या पोस्टरवर देवी-देवतांचं अपमानास्पद सादरीकरण करण्यात आल्यासंबंधी ही तक्रार आहे. हा चित्रपट आगा खान म्युझियमच्या 'अंडर द टेंट प्रोजेक्ट'चा भाग आहे.
 
"टोरंटोमधील आमच्या उच्चायुक्तांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना या तक्रारीबद्दल माहिती दिली आहे. या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत अनेक हिंदूंनी कॅनडामधील प्रशासनशी संपर्क साधल्याची माहितीही आम्हाला मिळाली आहे. कॅनडा सरकार आणि कार्यक्रमाच्या आयोजकांना आमची विनंती आहे की, त्यांनी अशा चिथावणीखोर गोष्टी मागे घेण्याचं आवाहन करावं."
 
कॅनडामधीलच नाही, तर भारतातील लोकही या प्रकरणी आपला विरोध प्रदर्शित करत आहेत.
 
हे वादग्रस्त पोस्टर एका चित्रपटाचं आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई या आहेत. शनिवारी (2 जुलै) लीना यांनी आपल्या 'काली' या चित्रपटाचं पोस्टर ट्वीट केलं होतं. ही एक परफॉर्मन्स डॉक्युमेंट्री असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
हिंदू धर्माचं आचरण करणारे अनेक जण या पोस्टरला विरोध करत आहेत. यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
लीना या कॅनडामध्ये आपलं शिक्षण घेत आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, मी माझ्या चित्रपटात देवींचं जे रुप दाखवत आहे ते 'मानवतेचं स्वरूप आणि विविधतेचा सन्मान करणारं आहे."
 
त्या म्हणतात, "एक कवयित्री आणि चित्रपटनिर्माती म्हणून मी कालीला एका स्वतंत्र वेगळ्या रुपात पाहते."
LEENA MANIMEKALAI
भारतामध्ये धार्मिक प्रतीकांना मोठ्या पडद्यावर दाखवणं हा बऱ्याच काळापासून अतिशय संवेदनशील मुद्दा राहिला आहे. सेन्सॉर बोर्डाने 2015 साली 'अँग्री इंडियन गॉडेसेस' नावाच्या एका चित्रपटामध्ये अनेक दृश्यांना कात्री लावण्याची मागणी केली होती. या चित्रपटात अनेक हिंदू देवी-देवतांचे फोटो दाखविण्यात आले होते.
 
आपल्या चित्रपटात धार्मिक विषय आणि संदर्भ दाखवल्यावरून अनेक कलाकारांना तसंच चित्रपटनिर्मात्यांना विरोध सहन करावा लागला आहे.
 
काही दिवसांपूर्वीच भाजपच्या एका माजी नेत्याने पैंगबर मोहम्मद यांच्या बद्दल वादग्रस्त विधानं केलं होतं. त्यानंतर देशातील अनेक भागांमध्ये आंदोलनं झाली.
 
गेल्या आठवड्यात राजस्थानमध्ये एका हिंदू व्यक्तिची हत्या केल्या प्रकरणी दोन मुसलमान युवकांना अटकही करण्यात आली. मृत व्यक्तिने संबंधित नेत्याच्या विधानाचं समर्थन केल्याने त्याची हत्या केल्याचा या दोन व्यक्तिंनी म्हटलं होतं.
 
पोस्टरवर हिंदू देवतेला सिगारेट ओढताना दाखवणं हा हिंदुत्वाचा अपमान असल्याचं मत अनेकांनी ट्वीटरवर व्यक्त केलं आहे. चित्रपट दिग्दर्शिकेवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी असं त्यांचं म्हणणं आहे.
 
चित्रपटकर्त्यांनी सर्वांच्या धार्मिक भावनांचा सन्मान करायला हवा, असंही काही ट्विटर युजर्सनं म्हटलं आहे.
 
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनीत गोयंका यांनी म्हटलं आहे की, देवीला अशापद्धतीनं दाखवणं हा संपूर्ण जगभरातील भारतीयांच्या भावना दुखावण्यासारखं आहे.
 
हे ट्वीट सोशल मीडियावरून हटवलं जावं अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
दिल्लीतील एका वकिलांनी चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना मणिमेकलाई यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली आहे.
 
मणिमेकलाई मूळ तामिळनाडूच्या आहेत आणि सध्या कॅनडामधील टोरंटोत चित्रपटांचा अभ्यास करत आहेत. टोरंटो मेट्रोपॉलिटन विद्यापीठात बहुसंस्कृतिवादाचा अभ्यास करण्यासाठी निवडण्यात आलेल्या 18 विद्यार्थ्यांपैकी त्या आहेत.
 
मी कालीप्रमाणे पोशाख करून टोरंटोमध्ये फिरते आणि त्याचंच चित्रण सिनेमात करण्यात आलं आहे, असं मणिमेकलाई यांचं म्हणणं आहे.
 
त्या सांगतात, "माझ्या चित्रपटात काली माझा आत्मा निवडते. त्यानंतर ती हातात एक 'प्राइड फ्लॅग' आणि एका हातात कॅमेरा घेऊन या देशातील मूळ निवासी तसंच आफ्रिकन, आशियाई, इराणी अशा वेगवेगळ्या वंशाच्या लोकांना भेटते. कॅनडाच्या या छोट्याशा विश्वात नांदणाऱ्या ख्रिश्चन, ज्यू, मुसलमान लोकांनाही ती भेटते."
 
एलजीबीटीक्यू समुदायाची ओळख बनलेल्या सप्तरंगी झेंड्याला 'प्राइड फ्लॅग' म्हटलं जातं. त्याला 'इंद्रधनुष्य झेंडा' असंही म्हणतात. 1978 साली एलजीबीटीक्यू समुदायाचं प्रतीक म्हणून या झेंड्याला मान्यता देण्यात आली. सुरूवातीला या झेंड्यामध्ये आठ रंग होते. नंतर ते कमी करून सहा करण्यात आले.
 
मणिमेकलाई यांनी आपल्या चित्रपटांमध्ये यापूर्वीही देवतांचं चित्रण केलं आहे. 2007 मध्ये त्यांचा 'गॉडेसेस' हा माहितीपट मुंबई आणि म्युनिक फिल्म फेस्टिव्हमध्ये दाखविण्यात आला होता.
 
त्यानंतर 2019 मध्ये त्यांच्या 'मादाती- अन अनफेअरी टेल' या चित्रपटात एका दलित मुलीची देवी म्हणून पूजा करण्याची काल्पनिक गोष्ट दाखविण्यात आली होती.
 
पोस्टरमध्ये जे दाखवलंय ते देवीच्या प्रेमाचंच स्वरुप आहे, असं मणिमेकलाई यांचं म्हणणं आहे. त्या सांगतात, "केनसिंग्टन मार्केटजवळ रस्त्यावर राहणाऱ्या एका कामगारानं दिलेल्या सिगारेटचा देवी स्वीकार करत आहे.
 
दक्षिण भारतातील काही गावांमध्ये खास सणांना लोक कालीप्रमाणे पोशाख धारण करतात आणि दारू पिऊन नाचतात."
 
भीतीच्या वातावरणामुळे आम्हा कलाकारांचा श्वास कोंडला नाही पाहिजे. आपल्याला आपली आवाज अजून मजबूत करायला हवा, असं मणिमेकलाई म्हणतात.