गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (16:39 IST)

नितीन देसाई तेव्हा 13 दिवस कामात एवढे मग्न होते की घरचे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवायच्या तयारीत होते

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करून त्यांची जीवन यात्रा संपवली आहे. कर्जतमधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कला आणि चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.स्थानिक आमदार महेश बालदी म्हणाले की, “ते मला दीड महिन्यापूर्वी भेटले तेव्हा ते आर्थिक विवंचनेत होते. हेच त्यांच्या आत्महत्येचं कारण असू शकतं. दुसरं कोणतंही कारण सध्यातरी वाटत नाहीये.”
 
पोलिसांनी दिलेली माहिती
नितीन देसाई यांनी जवळपास 10 तासांपूर्वी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. सध्या पोलीस तिथं पंचनामा करत आहेत. तसंच सुसाईड नोट अजून तरी सापडलेली नाही.
 
“नितीन देसाई यांचा मृतदेह ND स्टुडीओमध्ये मिळाला आहे. आम्ही सर्व पैलू तपासून पाहत आहोत,” असं रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितलं आहे.
 
रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं,
 
“सकाळी नऊ वाजता प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांचा मृतदेह एनडी स्टुडिओमध्ये आढळून आला. फॉरेन्सिक टीम, सायबर फॉरेन्सिक, डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंटची टीम घटनास्थळी तपास करत आहेत. तसंच खालापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीय. पोलिसांकडून सर्व पैलूंचा तपास करण्यात येतोय.”
 
नितिन देसाई अनेकदा स्टुडिओत यायचे आणि रात्री उशीरा किंवा सकाळी जायचे. ते आज बाहेर आले नाही म्हणून सुरक्षारक्षक पाहायला गेला असता त्याला मृतदेह आढळला. त्यानंतर सकाळी सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी 10 पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवले आहेत.
कोण होते नितीन देसाई?
नितीन चंद्रकांत देसाई यांचा जन्म दापोली झाला होता. कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, निर्माता असा त्यांचा प्रवास होता. अनेक चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
 
लगान (2001), देवदास (2002), जोधा अकबर (2008), प्रेम रतन धन पायो (2015) या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते.
 
त्याचबरोबर बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, यासारख्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी सेट तयार केले होते.
 
त्यांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत आशुतोष गोवारीकर, विधु विनोद चोप्रा, संजय लीला भन्साली या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं होतं.
त्यांनी कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि तीनदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
2005 मध्ये त्यांनी कर्जतला एनडी स्टुडिओ सुरू केला होता.
भव्यदिव्य सेट, अनोखं कला दिग्दर्शन यासाठी त्यांची ओळख होती.
मुंबईतल्या प्रसिद्ध लालबाग राजा गणपतीचा देखावा ते साकारायचे.
सुरुवातीच्या संघर्षाचे दिवस
नितीन देसाई यांचा जन्म एका मराठी मध्यमवर्गीय घरात झाला होता. त्यांनी जेजे स्कूलमधून फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं होतं. मात्र एकदा ते चित्रपटाच्या सेटवर गेले आणि ते त्या क्षेत्राच्या प्रेमात पडले.
 
'तमस' या दुरदर्शनवरच्या मालिकेपासून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी चाणक्य मालिकेसाठी कला दिग्दर्शन केलं. '1942, अ लव्ह स्टोरी' या चित्रपटाने त्यांना ब्रेक दिला आणि त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.
 
त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी सह्याद्रीला मुलाखत दिली होती. त्यात ते सांगतात, “मी ज्या घरात मोठा झालो त्यावेळी सगळ्यांना वाटायचं की आपल्या पोरांनी इंजिनिअर, डॉक्टर, व्हावं असं वाटायचं त्या काळात कला क्षेत्रात आणि त्यातही चित्रपट क्षेत्रात जायचं म्हणजे एक मोठं आव्हान होतं. मात्र माझ्या आई वडिलांनी मला पाठिंबा दिला. बीडीडी चाळीत माझा जन्म झाला. जेव्हा जेजे स्कुलमधून निघालो, तेव्हा मला फोटोग्राफीचा छंद झाला.”
“पहिल्यांदा मी 'तमस'च्या सेटवर सहाय्यक म्हणून कामाला होतो. तिथे मी 13 दिवस आणि 13 रात्री न थकता काम केलं. त्या क्षणी मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट मिळाल्यासारखं वाटलं. मी कामात इतका गढून गेलो होतो की मी घरी गेलो नाही. माझ्या घरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवायला घेतली होती. असे ते सुरुवातीचे दिवस होते. पण मला मजा आली.”
 
आईविषयीचा एक किस्सा ते नेहमी भावूक होऊन सांगतात, “मी स्वतंत्रपणे जेव्हा चाणक्यचा सेट उभारला तेव्हा मी माझ्या आईला तिथे घेऊन गेलो. सुरुवातीला तिला माझं काम कळलंच नाही. जेव्हा मी तिला नीट समजावून सांगितलं तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.”
 
देवदासच्या सेटच्या निर्मितीची कथा
देवदास चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याच्या निर्मितीची कथा त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितली होती.
 
ते म्हणतात, “देवदास तेव्हापर्यंत नऊ वेळा तयार करण्यात आला होता. आम्ही FTII मध्ये जाऊन आधीच्या आवृत्यांचा नीट अभ्यास केला. तेव्हा तो अतिशय भव्यदिव्य तयार करण्याचा निर्णय घेतला. मी संजय लीला भन्साळींना अट घातली की संपूर्ण सेट तुला वापरावा लागेल. कारण हम दिल दे चुके सनमच्या वेळी पूर्ण सेट वापरला गेला नव्हता.
 
चंद्रमुखीच्या पात्रासाठी आम्ही टेम्पल आर्किटेक्चरचा वापर केला होता. माधुरी दीक्षित तेव्हा लग्न करून अमेरिकेला गेली होती. तेव्हा संजयने तिला अमेरिकेहून बोलावून घेतलं होतं. जेव्हा तिने तो सेट पाहिला तेव्हा ती अतिशय खूश झाली. ती म्हणाली की इतकं भव्य काम केलंय, आता मला डबल रिहर्सल करावी लागेल.”
 
ND स्टुडिओवर जप्तीची कारवाई होणार होती?
नितीन देसाई सध्या आर्थिक अडचणीत होते आणि त्यांच्या कर्जतमधल्या एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची शक्यता होती. असं वृत्त काही दिवसांपूर्वीच रायगडमधील दैनिक कृषीवलने दिलं होतं.
 
नितीन देसाई यांनी काही सीएफएम या वित्तीय संस्थेकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. 2016 आणि 2018 अशा वेगवेगळ्या दोन वर्षात कर्जाचा करार नामा झाला होता. यासाठी देसाई यांनी विविध सर्व्हेनंबर असलेल्या तीन मालमत्ता (26 एकर, 5-89 एकर आणि 10.75 एकर) तारण ठेवली होत्या. काही कालावधीनंतर सीएफएम या वित्तीय संस्थेने आपल्याकडील सर्व कर्ज एडलवाइस ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपनीकडे सोपवली. परंतु कर्जाची वसुली होत नव्हती. आता ते कर्ज 249 कोटी रुपयांवर गेलं होतं, असं वृत्तात म्हटलं आहे.
 
रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांच्यानुसार, स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी एनडी स्टुडीओच्या जप्तीबाबत अद्याप निर्णय दिला नव्हतं.
 
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
 
हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
 
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
 
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
 
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
 
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
 
 
 
 
 
Published By- Priya dixit