सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (15:50 IST)

कतार: शाहरूख खानमुळे माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका? त्याने म्हटलं...

कतारच्या तुरुंगात कैदेत असलेल्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. बॉलिवूड स्टार शाहरूख खानमुळं हे शक्य झाल्याची चर्चा या दरम्यान सुरू झाली.
 
भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी (13 फेब्रुवारी) एक ट्विट केलं. त्यात त्यांनी कतारमधून या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेमध्ये शाहरूख खानची महत्त्वाची भूमिका असल्याचा उल्लेख केला.
 
त्यानंतर शाहरूख खानच्या कार्यालयाकडून याबाबत एक निवेदन जारी करण्यात आलं. शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानीनं इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर हे निवेदन शेअर केलं. पीटीआय वृत्त संस्थेनंही याला दुजोरा दिला आहे.
 
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानंही यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे.
 
"दाहरा ग्लोबलमध्ये काम करणाऱ्या आणि कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या आठ भारतीयांची सुटका करण्यात आली. त्याचं भारत सरकार स्वागत करत आहे," असं या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
 
"या आठपैकी सात जण भारतात परतले आहे. या सर्व भारतीय नागरिकांची सुटका करून त्यांना घरी परतण्याची परवानगी देण्याच्या कतारच्या अमीर यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो," असंही यात म्हटलं आहे.
 
कतारमध्ये या भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्यांची अटक आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता.
 
सुब्रमण्यम स्वामींचं ट्विट आणि शाहरूखचे स्पष्टीकरण
मंगळवारी (13 फेब्रुवारी) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं होतं. "पुढच्या दोन दिवसांत मी यूएई आणि कतारचा दौरा करणार आहे. त्यादरम्यान विविध कार्यक्रमात सहभागी होणार असून, दोन्ही देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध त्यामुळं अधिक दृढ होतील," असं या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
 
ज्येष्ठ भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही एक ट्विट केलं.
 
"मोदींनी शाहरूख खानलाही त्यांच्यासोबत कतारला न्यायला हवं. परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्थेला कतारच्या शेखना राजी करण्यात अपयश आलं. त्यामुळं मोदींना शाहरूख खानला मध्यस्थी करायला सांगावं लागलं," असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
 
या मुद्द्यावर शाहरूख खानकडून एक स्पष्टीकरण देणारं निवेदन सादर करण्यात आलं.
 
शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर हे स्पष्टीकरण पोस्ट केलं. 'Official statement from the office of Mr. Shah Rukh Khan' अशा मथळ्याचं हे स्पष्टीकरण आहे.
 
"कतारमधील भारतीय अधिकाऱ्यांच्या सुटकेमध्ये शाहरूख खान यांच्या कोणत्याही भूमिकेचं वृत्त शाहरूख खान यांच्या कार्यालयाकडून फेटाळलं जात आहे. हे सर्व दावे तथ्यहीन आहेत. या यशाचं श्रेय पूर्णपणे यात सहभागी असलेल्या भारतीय अधिकाऱ्यांचं आहे. शाहरूख खान यांचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"सरकारची सर्व धोरणात्मक प्रकरणं सक्षम नेत्यांकडून अगदी योग्य प्रकारे हाताळली जातात. इतर भारतीयांप्रमाणेच शाहरूख खान यांनाही नौदलाचे अधिकारी सुरक्षितपणे आपल्या देशात परतल्याचा आनंद आहे. त्यांच्यातर्फे सर्वांना शुभेच्छा," असंही या निवेदनात म्हटलं आहे.
 
माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये का झाली होती अटक?
कतारच्या सरकारनं या माजी अधिकाऱ्यांना ताब्यात का घेतलं होतं, याबाबत काहीही अधिकृत खुलासा केलेला नाही. पण काही स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तांमध्ये यासंबंधी बातम्या आल्या होत्या.
 
त्यानुसार 30 ऑगस्ट 2022 च्या रात्री कतारच्या दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीस अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेस मध्ये काम करणाऱ्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं.
 
त्यानंतर या सर्वांना दोहामध्ये एका तुरुंगात इतर कैद्यांपासून वेगळ्या ठिकाणी विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. तुरुंगात ठेवण्यात आलेले हे सर्व कैदी कतारच्या नौदलासाठी काम करणाऱ्या एका कंपनीत उच्च पदावर काम करत होते.
 
या भारतीयांपैकी तीन निवृत्त कॅप्टन, चार कमांडर आणि एक नाविक आहेत. भारतीय दूतावासाच्या एका माजी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना जवळपास एका वर्षासाठी अट्टल गुन्हेगारांप्रमाणं पूर्णपणे विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं.
 
स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या भारतीयांनी दोहामध्ये काम करत असताना पाणबुड्यांच्या प्रोग्रामसंदर्भातील संवेदनशील माहिती इस्रायलला पुरवल्याचा आरोप आहे.
 
अशाप्रकारचे आरोप सिद्ध झाल्यास त्यासाठी कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. ही कंपनी कतारच्या नौदलासाठी एका पाणबुडीच्या प्रोजेक्टवर काम करत होती. या योजनेचा उद्देश रडारला चकवा देण्यास सक्षम असणाऱ्या इटालीयन तंत्रज्ञानावर आधारित उच्च तंत्रज्ञानाच्या पाणबुड्या मिळवणं हा होता.
 
कतारनं मे 2022 मध्ये ही कंपनी बंद करण्याचा आदेश दिला होता. या कंपनीतील जवळपास 70 कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या अखेरीपर्यंत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश भारतीय नौदलातील माजी सैनिक होते.
 
2023 मध्ये अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची मृत्यूदंडाची शिक्षा कमी करून त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.
 
भारत सरकारसमोरचे मोठे आव्हान
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारचे अमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांना दुबईत COP28 परिषदेदरम्यान भेटले होते. पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी कतारमध्ये राहणारा भारतीय समुदायाबाबत आणि द्विपक्षीय संबंधांबाबत माहिती घेतली होती.
 
दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अत्यंत महत्त्वाची होती असं मानलं जातं. या बैठकीबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रनथिर जैस्वाल यांनी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांबाबत चांगल्या प्रकारे चर्चा झाल्याची माहिती दिली होती.
 
भारतीयांना देण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचंही भारत सरकारनं म्हटलं होतं.
 
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या आठ भारतीयांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. या आठ जणांची सुटका करण्यासाठी भारत सरकारवर प्रचंड दबाव होता. काँग्रेस, एआयएमआयएम आणि इतर विरोधी पक्षांनी या भारतीयांना शक्य तेवढ्या लवकर परत आणण्याची मागणी केली होती.
 
गॅस करार
याप्रकरणी गेल्या आठवड्यात भारत आणि कतार यांच्यामध्ये एका मोठ्या करारावर सह्या झाल्या होत्या.
 
हा करार पुढच्या 20 वर्षांसाठीचा आहे. त्याचं एकूण मूल्य 78 अब्ज अमेरिकन डॉलर (भारतीय चलनात 605 लाख कोटी रुपये) एवढं आहे. कतारकडून 2048 पर्यंत एलएनजी (लिक्विफाय नॅचरल गॅस) खरेदी करण्यासंदर्भातील हा करार आहे.
 
भारतातील सर्वात मोठी एलएनजी आयातदार कंपनीनं (पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड-पीएलएल) कतारची सरकारी कंपनी कतार एनर्जीबरोबर हा करार केला आहे. या करारांतर्गत कतार दरवर्षी भारताला 75 लाख टन गॅसची निर्यात करणार आहे.
 
उल्लेखनीय बाब म्हणजे, या करारावर सह्या झाल्यानंतर भारतीयांचा सुटका करण्यात आली.
 
 
Published By- Priya Dixit