शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (10:40 IST)

संजय लीला भन्साळी- सलमानसोबतचा इन्शाल्ला झाला नाही आणि त्या रागातून गंगूबाई बनला

सुप्रिया सोगळे
हम दिल दे चुके सनम, देवदास, गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत यासारखे भव्य चित्रपट करणारे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
 
चित्रपट प्रेक्षकांना आवडतो आहे. लोक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. चित्रपटाने आतापर्यंत 60 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट, आतापर्यंतचा प्रवास यासंदर्भात संजय लीला भन्साळी यांच्याशी केलेली बातचीत...
 
रागातून बनला गंगूबाई काठियावाडी
गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची कहाणी संजय लीला भन्साळी यांच्या मनात घर करून राहिली होती. या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम करायला सुरुवातही केली नव्हती, पण ही गोष्ट त्यांच्या डोक्यात होती.
 
दरम्यानच्या काळात त्यांनी ब्लॅक, गुजारिश, सावरियाँ यासारखे चित्रपट केले. पण ते तिकीटबारीवर यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर भन्साळी यांनी ऐतिहासिक चित्रपटांकडे मोर्चा वळवला. गोलियों की रासलीला- रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
 
पद्मावतनंतर भन्साळी सलमान खानला घेऊन 'इन्शाल्ला' चित्रपटाच्या तयारीला लागले होते. चित्रपटाचा सेट तयार झाला होता. चित्रीकरणाच्या आधी सलमान आणि भन्साळी यांच्यात वेबनाव झाल्याच्या बातम्या समोर आल्या. तो चित्रपट बारगळला. इन्शाल्ला चित्रपट फसल्याने प्रचंड राग आल्याचं भन्साळी यांनी सांगितलं. असं का झालं असेल याचा त्यांनी विचार केला. आठवडाभर रागातच गेला.
 
मग त्यांनी सहाय्यकांना गंगूबाई काठियावाडीचं स्क्रिप्ट बाहेर काढायला सांगितलं. इन्शाल्ला चित्रपट सुरू असताना आलिया भट्टबरोबर त्यांनी काम केलं. त्यावेळी त्यांनी गंगूबाई काठियावाडीमधल्या भूमिकेविषयी विचारलं. सुरुवातीला आलिया हा चित्रपट करण्याबाबत साशंक होती, पण नंतर तिने होकार दिला. इन्शाल्लाचं काम थांबल्यानंतर दीड महिन्यानंतर गंगूबाई चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. भव्य सेट तयार करण्यात आला, दिमाखदार कपडेपट सज्ज झाला. गाणी तयार झाली.
 
रागाचं रुपांतर सकारात्मक ऊर्जेत केल्याचं भन्साळी सांगतात.
 
इन्शाल्ला चित्रपट का बारगळला?
संजय लीला भन्साळी यांनी कारकीर्दीत सुरुवातीला सलमान खानला घेऊन 'खामोशी' आणि 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट केले. यानंतर या दोघांचे संबंध दुरावले. दोन दशकांनंतर भन्साळी-सलमान जोडी इन्शाल्लाच्या निमित्ताने एकत्र येणार असं चित्र होतं. पण चित्रीकरण सुरू होण्यापूर्वीच सगळं बारगळलं. याचं काय कारण? विचारल्यावर भन्साळी म्हणाले, जी गोष्ट बारगळली त्यावर का बोलायचं?
 
नाही झालं नाही झालं. सलमान असताना बाजीराव चित्रपट झाला नाही. प्रत्येक चित्रपटाचं एक नशीब असतं. गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची नियती अशी ठरली होती. गंगूबाई यांची कहाणी साद घालत होती. चित्रपट बंद करून मी आगेकूच कशी करणार असं मला वाटलं होतं. मेहबूब स्टुडिओत सेट तयार झाला होता. आलिया गाण्यावर तालीम करत होती. लायटिंग झालं होतं. त्याक्षणी माझ्या तोंडून निघालं की हे सगळं बंद करा.
 
जे नशिबात लिहिलेलं असतं तेच होतं. बाजीराव मस्तानी चित्रपटाची मी घोषणा केली तेव्हा दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह शाळेत होते. ज्याच्या जे नशिबात असतं ते त्याला मिळतं.
 
गंगूबाई, रमणिक आणि चित्रपटातली नग्न दृश्यं
चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेगळ्याच जगात घेऊन जाण्याचं कसब असणाऱ्या भन्साळी यांनी गंगूबाई चित्रपटाची कहाणी हुसैन जैदी यांच्या पुस्तकातून घेतली आहे. पण गंगूबाई आणि त्यांना फसवणारा नवरा रमणिक यांच्या कथानकात भन्साळी यांनी बरेच बदल केले.
 
याबदलासंदर्भात भन्साळी म्हणाले, रमणिक आणि गंगूबाई यांच्या संबंधावर मला वेळ घालवायचा नव्हता. लग्न, संबंध, पठाणच्या बलात्काराचा प्रसंग मला चित्रपटात दाखवायचं नव्हतं. हे सगळं पडद्यावर दाखवून प्रेक्षकांना मला अस्वस्थ करायचं नव्हतं. गंगूबाईंचा आत्मा मला विकायचा नव्हता. नग्नता मला दाखवायचीच नव्हती. म्हणूनच मी रमणिकला धोका देणारा प्रेमी म्हणून सादर केलं.
 
चित्रपटातलं सगळ्यात घृणास्पद कॅरेक्टर रमणिकचं आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहायलाच नको. जी माणसं निरपराध लोकांचं आयुष्य उद्धस्त करतात, अशा लोकांना जगण्याचा अधिकार नाही.
 
भन्साळी यांच्या चित्रपटात संगीताची भूमिका महत्त्वाची बजावतं. चित्रपटाचं संगीत संयोजन ते स्वत:च करतात. एकीकडे चित्रपटातल्या गाण्यांचं महत्त्व कमी होत असताना, त्याच काळात भन्साळी संगीताला महत्त्व देतात. त्यांच्या चित्रपटातून गाण्यांना वजा करणं कठीण आहे. आजच्या पिढीवर इराण, कोरिया आणि पाश्चिमात्य चित्रपटांचा प्रभाव आहे. त्या चित्रपटात गाणी नसतात. आपले चित्रपट तिथे वेगळे ठरतात.
 
भारतात, आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यासाठी आपल्याकडे गाणी असतात. गाणी-संगीत हा आपला मोठा वारसा आहे. राज कपूर, मेहबूब खान, नौशाद, शंकर जयकिशन या दिग्गजांचे हे योगदान आहे. आपण त्यांचा वारसा नाहीसा करू शकतो का? माझ्या चित्रपटात गाणी तर राहणारच. मला गाणी खूप आवडतात.
 
संगीताशी असलेल्या ऋणानुबंधाबद्दल भन्साळी सांगतात, मी चित्रपटाची सुरुवात गाण्याने करतो. गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचा विचार सुरू केला तेव्हाच माझ्या मनात झूमे गोरी गाना डोक्यात आलं होतं. त्यानेच चित्रपट उघडतो. हे गाणं कसं वगळू शकतो? राज कपूर, विजय आनंद, आसिफ, गुरु दत्त यांच्याप्रमाणे गाणी मला चित्रित करायची आहेत. मी चांगली गाणी चित्रित केली आहेत. या दिग्दर्शकांनी जो मापदंड प्रस्थापित केला आहे तो मला गाठायचा आहे.
 
तशा स्वरुपाच्या कामाच्या मी प्रतीक्षेत आहे. गुरु दत्त एका दिवाणावर गाणं चित्रीत करायचे. विजय आनंद दिल का भवर एका जिन्यात चित्रित करत असत. ते महान होते. मुगले आझम चित्रपटातलं प्यार किया तो डरना क्या सारखं गाणं चित्रित करत नाही तोवर मी गाणी करत राहीन.
 
महिलांचा गौरव
भन्साळी यांचे चित्रपट महिलाप्रधान असतात. भन्साळी यांच्या मते महिला या देवाचा आविष्कार असतात. कारण त्या आयुष्य देतात. मोठ्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांची गोष्ट महिलाकेंद्रित असतात. बिमल रॉय, सत्यजीत रे, राज कपूर, ऋत्विक घटक यांचा प्रभाव ज्या दिग्दर्शकांवर आहे त्यांचे चित्रपट महिलाप्रधान असतात.