शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 फेब्रुवारी 2023 (23:53 IST)

आमीर खानला जे जमलं नाही, ते शाहरूखने कसं करून दाखवलं?

“मी चार दिवसांत मागची चार वर्षं विसरून गेलोय.”चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरूख खानचा पठाण रिलीज झाला आहे. या सिनेमाने पाच दिवसांत जगभरात पाचशे कोटींहून अधिक कमाई करत विक्रम केला आहे. या यशाचा आनंद शाहरूखच्या चेहऱ्यावरून, त्याच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट दिसत होता.
पठाणचं यश सेलिब्रेट करण्यासाठी शाहरूखने 30 जानेवारीला माध्यमांशी संवाद साधला. या प्रेस कॉन्फरन्समध्ये शाहरूख त्याच्या पूर्वीच्याच हसऱ्या, आनंदी रुपात पाहायला मिळाला. चेष्टा-मस्करी करत, प्रश्नांना हजरजबाबीपणे उत्तरं देणारा शाहरूख काही वेळा भावूक झालेलाही पाहायला मिळाला.
 
शाहरूखने म्हटलं, “मला मनापासून असं वाटतं की, लोकांना आनंद द्यावा. जेव्हा मला हे करण्यात अपयश येतं, तेव्हा इतर कोणापेक्षाही मला सर्वाधिक दुःख होतं. यावेळी मी आनंदी आहे... कारण मी लोकांना आनंद देऊ शकलो.”
 
शाहरूख पठाणला मिळालेल्या यशाबद्दल, लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल बोलत होता.
गेल्या काही काळात बॉलिवूडचे अनेक बिग बजेट चित्रपट कोसळले. त्यात अक्षय कुमार, रणवीर सिंह, आमीर खानसारख्या स्टार्सचेही चित्रपट होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आमीर खानचा लाल सिंह चढ्ढा रिलीज झाला होता. आमीरही या सिनेमातून चार वर्षांच्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर येत होता. त्यामुळे बॉलिवूडला या चित्रपटाकडून अपेक्षा होत्या. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला.
 
या सगळ्या पार्श्वभूमीवर पठाणला इतकं घवघवीत यश कसं मिळालं? शाहरूखला अशा कोणत्या गोष्टींचा फायदा झाला? आमीरला जे जमलं नाही, ते शाहरूखनं कसं करून दाखवलं?

1. शाहरूखचा कमबॅक
डिसेंबर 2018 मध्ये शाहरूखचा ‘झीरो’ सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाचं बजेट होतं 200 कोटी रुपये. पण ‘झीरो’ने बॉक्स ऑफिसवर 186 कोटी रुपयांची कमाई केली.
 
‘झीरो’ फ्लॉप ठरला होता. पठाणच्या यशाबद्दल बोलताना शाहरूखने झीरोच्या अपयशाचाही उल्लेख केला.
 
त्यानं म्हटलं, “झीरो नंतर माझा आत्मविश्वास डळमळीत झाला होता आणि अनेकदा मला भीतीही वाटायची.”
 
चार वर्षं मोठ्या पडद्यापासून दूर राहिल्याबद्दलही शाहरूखने मिश्किल टिप्पणी केली, “माझा शेवटचा सिनेमा चालला नव्हता. माझे चित्रपट आता चालणार नाहीत, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मी सुद्धा माझ्यासाठी दुसरे पर्याय शोधायला सुरुवात केली होती. मी जेवण बनवायलाही शिकलो.”
पण यावेळी जेव्हा शाहरूखने मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं, तेव्हा फॅन्स त्याच्यासाठी थिएटरपर्यंत आले.
 
प्रसिद्ध फिल्म ट्रेड समीक्षक कोमल नाहटा यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं, “शाहरूख बराच काळ मोठ्या पडद्यापासून लांब राहिला होता. त्यामुळे जेव्हा त्यानं कमबॅक केलं, तेव्हा प्रेक्षकांनीही तितक्याच प्रेमानं त्याला प्रतिसाद दिला. पठाणच्या यशाचं हे एक महत्त्वाचं कारण आहे.”
 
'शहर और सिनेमा' या पुस्तकाचे लेखक आणि चित्रपट अभ्यासक मिहिर पंड्या यांनी म्हटलं, “कोरोनाकाळात थिएटर्स बंद होते. प्रेक्षक एका अशा चित्रपटाची वाट पाहात होते, जो त्यांची प्रतीक्षा संपवेल... त्यांना एका अशा चित्रपटाची अपेक्षा होती, जो ते आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत पाहू शकतील.”
 
“या दरम्यान काही दक्षिण भारतीय चित्रपटही आले होते, त्यांनी कमाईही केली. पण माझ्यामते प्रेक्षकांना एका अशा हिंदी सिनेमाची गरज होती, ज्यामध्ये मसाला आणि मनोरंजनाचा योग्य तो बॅलन्स असेल. पठाणच्या माध्यमातून लोकांची ही दोन वर्षांची प्रतीक्षा संपलीये आणि ते बाहेर येत आहेत.”
 
2. बॉयकॉट ट्रेंडचा फायदा
‘पठाण’चा टीझर रिलीज झाल्यापासूनच या सिनेमाबद्दल वाद सुरू झाला होता. सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंड सुरू झाले होते. 
सिनेमातलं 'बेशरम रंग' हे गाणं रिलीज झाल्यानंतर तर हा वाद सोशल मीडियाच्या पलिकडे पोहोचला.
 
सत्ताधारी पक्षातील अनेक नेते, अगदी मंत्र्यांनीही यावर टीका केली, बंदीची मागणी केली. 
या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाचे जे कपडे घातले आहेत, ते हिंदूंच्या भावना दुखावणारे असल्याचं चित्रपटाला विरोध करणाऱ्या गटाचं म्हणणं होतं.
 
अनेकांनी गाण्यातून हे दृश्य हटविण्याचीही मागणी केली होती. 
पण याचा परिणाम उलटा झाला. एक म्हणजे हे गाणं वादामुळेच अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं.
 
दुसरं म्हणजे जेव्हा थिएटरमध्ये हे गाणं सुरू व्हायला लागलं, तेव्हाही लोक उठून नाचताना दिसत होते.
कोमल नाहटा म्हणतात, “शाहरूखच्या फॅन्सने बॉयकॉट गँगला धूप घातली नाही. ब्रह्मास्त्र हिट झाल्यानंतर या गँगला काही प्रमाणात धक्का बसला होता. आता पठाणने त्यांना पूर्णच निष्प्रभ केलं. कोणतंही नियोजन यामागे नव्हतं...केवळ सिनेमा पाहण्यासाठी शाहरूखचे फॅन्स एकत्र येत गेले आणि त्यांनी धडा शिकवला.”
 

‘पठाण’प्रमाणेच ‘ब्रह्मास्त्र’बाबतही बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला होता. मात्र तरीही ब्रह्मास्त्रने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली.
 
मिहिर पंड्यानं म्हटलं, “गेल्या काही काळापासून बॉलिवुडमध्ये बॉयकॉट ट्रेंड पाहायला मिळाला, जो बऱ्याच अंशी स्पोन्सर्डही असतो. त्यामुळे त्याचं एक काउंटर नॅरेटिव्हही तयार झालं. आम्ही काय पाहायचं हे इतर कोणी का ठरवावं, असा विचार करूनही अनेक लोक पठाण पाहायला गेले. त्यामुळे सिनेमाघरात गर्दी होत आहे.”
 
3. शाहरूखचं मौन
वर्षं 2017... ‘इंडिया टुडे’च्या कॉन्क्लेव्हमध्ये शाहरूखला एक प्रश्न विचारला गेला- तुम्ही एक चांगले मुसलमान आहात, पण असं मानूया की तुम्ही शेखर कृष्णा आहात...

शाहरूखने सेकंदभराचाही वेळ न घालवता म्हटलं- शेखर राधा कृष्णा... SRK

हा व्हीडिओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरूख आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखला जातो...
 
मात्र गेल्या दोन वर्षांत शाहरूख फारसा माध्यमांसमोर येऊन बोलला नाही. आर्यन खानच्या अटकेचं प्रकरण असो की पुराव्याअभावी त्याची झालेली सुटका असो... शाहरूख कोणत्याही मुद्द्यावर बोलला नाही. 


 
कोमल नाहटा सांगतात, “गेल्या काही काळात शाहरूखला अनेकदा लक्ष्य केलं गेलं. फॅन्सना हे खटकलं. आपल्या सुपरस्टारला अशापद्धतीने टार्गेट होऊ दिलं नाही पाहिजे, असा विचार लोकांनी केला. आर्यनच्या अटकेनंतर ही भावना बळावली.”

 
मिहिर पंड्यांनी म्हटलं, “शाहरूख खानचा आपल्या प्रेक्षकांसोबत थेट कनेक्ट आहे. ज्यावेळी शाहरूखचे चित्रपट फ्लॉप होत होते, तेव्हाही त्याची लोकप्रियता कमी झाली नव्हती. शाहरूखच्या घराबाहेर आजही फॅन्सची तितकीच गर्दी जमते, जितकी पूर्वी जमायची.
शाहरूखला गेल्या काही दिवसांत त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जे सहन करावं लागलं, त्यामुळेही लोकांमध्ये त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. शाहरूखने या सगळ्या विषयांवर कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावरून प्रतिक्रिया दिली नव्हती, राग व्यक्त केला नव्हता. लोकांच्या हेही लक्षात आलं.”
 
कोमल नाहटा यांनी म्हटलं, “शाहरूखने खूप संयमी भूमिका घेतली. कोणतीही आदळापट, असभ्य भाषा वापरली नाही.”
 
कोमल नाहटा यांनी शाहरूखनं म्हटलेली एक गोष्ट सांगितली- “शाहरूखने दोन दिवसांपूर्वीच मला म्हटलं होतं की, परमेश्वराने आपल्याला एका भट्टीत टाकलं आहे, तावून-सुलाखून निघा... सोनं बनून बाहेर याल. ‘पठाण’चं यश आम्हाला या सोन्याप्रमाणे मिळालं आहे. गेल्या दीड-दोन वर्षांत आम्ही इतके तावून निघालोय की काही विचारू नका.”
 
शाहरूखच्या प्रतिमेबद्दल मिहिर पंड्या यांनीही आपलं निरीक्षण नोंदवलं.
 
“आपल्याकडे हिरोची प्रतिमा अशी असते की, तो नेहमी एकटा असतो, सगळे त्याच्या विरोधात असतात, तो सत्तेच्या विरोधात असतो. भारतीय समाजातल्या हिरोच्या या प्रतिमेसोबत शाहरूखची वैयक्तिक आयुष्यातली प्रतिमा मिळतीजुळती आहे. कदाचित त्यामुळेही लोक शाहरूखचा सिनेमा पाहायला जात आहेत.”
 
4. जागतिक स्तरावरील लोकप्रियतेचा फायदा
भारतीय चित्रपटांचे फॅन्स जगभरात आहेत. याची सुरूवात राज कपूरच्या रशियातील स्टारडमपासून झाली होती. शाहरूखचेही फॅन्सही असेच जगभरात आहेत.
 
शाहरूखची पठाण भारतात जेवढे पैसे कमावत आहे, त्यातली बरीचशी कमाई परदेशात होतीये.
 
यशराज फिल्म्सच्या मते, ‘पठाण’च्या पाच दिवसांतील कमाईमध्ये परदेशातील कमाईचा वाटा 208 कोटींचा होता.
 
शाहरूखच्या लोकप्रियता डिसेंबर 2021 मधील एका घटनेतूनही कळते.
 
ट्वीटर युजर अश्विनी देशपांडे यांनी सांगितलं, “इजिप्तमध्ये एका ट्रॅव्हल एजंटला पैसे ट्रान्सफर करायचे होते. पण त्यात अडचणी येत होत्या. तेव्हा मला त्याने म्हटलं की, तुम्ही शाहरूख खानच्या देशातून आला आहात. माझा तुमच्यावर विश्वास आहे. मी बुकिंग करतो. तुम्ही नंतर पैसे द्या. मी दुसऱ्या कोणासाठी असं करत नाही, पण शाहरूखसाठी काहीही.”
मिहिर पंड्या सांगतात, “गेल्या काही काळात शाहरूखचे जे चित्रपट भारतात यशस्वी झाले नाहीत, त्यांनी बाहेर चांगला व्यवसाय केला. शाहरूख नेहमीच एनआरआय ऑडियन्सचा स्टार आहे.”
 
‘पठाण’मुळे देशातही अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सनाही फायदा झाला आहे. श्रीनगरमध्ये गेल्या 33 वर्षांत एखाद्या थिएटरबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे... त्याचं कारण शाहरूखचा ‘पठाण’ आहे.
 
मिहिर पंड्या यांनी म्हटलं, “शाहरूखचा सिनेमा यावेळी लहान शहरांमध्ये आणि सिंगल स्क्रीन थिएटरमध्येही उत्तम कमाई करत आहे. शाहरूख आपल्या शहरी उच्चभ्रू प्रेक्षकांच्या चौकटीतून बाहेर पडून सिंगल स्क्रीन थिएटरच्या प्रेक्षकांपर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय? शाहरूख खानच्या इतर सिनेमांपेक्षा ‘पठाण’ वेगळा आहे.”
 
कोमल नाहटा सांगतात, “शाहरूखची परदेशातली जी लोकप्रियता आहे, त्याचा फायदा पठाणला मिळतोय. शाहरूख आणि दीपिका या सिनेमात एकदम इंटरनॅशल स्टार्स वाटत आहेत.”
 
5. यशराजचा प्रमोशन फंडा
पठाणच्या रिलीजच्या काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. सिनेमात निगेटिव्ह रोल करणारा जॉन अब्राहम एका कार्यक्रमात सहभागी झाला होता.
 
तिथे त्याला पठाणशी संबंधित प्रश्न विचारला गेला. पण जॉनने तो प्रश्न ऐकून न ऐकल्यासारखा केला आणि पुढचा प्रश्न विचारायला सांगितलं.
 
हा पठाणच्या प्रमोशनचा एक भाग होता. पठाणच्या स्टारकास्टने कोणत्याही मीडियाला इंटरव्ह्यू दिला नाही.
 
मिहिर पंड्या सांगतात, “यशराजच्या चित्रपटांमध्ये राष्ट्रवादाचा डोसही असतो. राजकीयदृष्ट्याही त्यांचे चित्रपट बॅलन्स साधणारे असतात. कोणतीही एक बाजू घेत नाहीत. त्यांच्या आधीच्या चित्रपटातही हे दिसून आलं होतं. त्याचप्रमाणे प्रमोशनसाठी स्टार कास्टने कुठेही न जाणं हाही त्यांच्या नियोजनाचा एक भाग असू शकतो, कारण अति प्रमोशन झालं तरी लोकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.”
 
सुट्ट्या लक्षात घेऊन पठाण रिलीज केला गेला. 25 जानेवारीला पठाण रिलीज झाला. 26 तारखेला सुट्टी होती. त्यानंतर शनिवार-रविवार आला. सिनेमाचा ट्रेलरही खूप आधी रिलीज न करता, प्रदर्शनाच्या केवळ 15 दिवस आधी केला गेला.
 
काही थिएटरमध्ये शो सकाळी सहा वाजल्यापासून सुरू केले गेले आणि सिनेमा 8000 हून जास्त स्क्रीनवर रिलीज केला गेला.
कोमल नाहटा सांगतात, “सिनेमाला सुट्ट्यांचा फायदा निश्चित मिळाला आहे. पण 26 जानेवारी आणि सुट्टीनंतरही पठाणची कमाई सुरूच आहे. काही सिनेमांचं ऑल टाइम कलेक्शन जेवढं असतं, तेवढी पठाणची दोन दिवसांची कमाई आहे.
 
दुसरं म्हणजे सोशल मीडियावर बॉयकॉट ट्रेंड सुरू असताना शांत राहणं हा नियोजनाचा भाग होता. त्याचा खूप फायदा झाला. जर कलाकारांनी प्रत्युत्तरं द्यायला सुरूवात केली असती, तर सिनेमाबद्दल उत्सुकता कायम राहिली नसती. एवढे वाद सुरू आहेत आणि तरीही हे लोक शांत का, असा प्रश्नही लोकांना पडला. सिनेमात असं काय आहे की, हे लोक स्पष्टीकरण देत नाहीयेत या उत्सुकतेपोटीही लोक थिएटरपर्यंत आले.”
 
‘पठाण’वर होणारी टीका
पठाण बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असला तरी समीक्षक याला मसालापट मानत आहेत.
 
काही प्रेक्षकांच्या मते या सिनेमाचे स्पेशल इफेक्ट्स वाईट आहेत आणि कथेतही काही नावीन्य नाही.
 
सध्याच्या काळात ओटीटीमुळे प्रेक्षकांना दर्जेदार सिनेमा पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर प्रेक्षकांची टीका योग्य आहे असं गृहीत धरलं, तर पठाणच्या रेकॉर्डब्रेक कमाईमुळे चांगल्या सिनेमाचं नुकसान झालं आहे का?
 
मिहिर पंड्या या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणतात, “पॉप्युलर सिनेमाचं स्वतःचं असं एक टेम्पलेट असतं. एखादा सिनेमा चांगला आहे आणि तो बॉक्स ऑफिसवरही कमाई करतोय, हे थोड्याच सिनेमांच्या बाबतीत घडतं. गेल्या वीस वर्षांत हा मेळ साधणं कोणाला जमलं असेल तर राजकुमार हिरानींना. थ्री इडियट्स आणि मुन्नाभाई सीरिज. असे काही अपवाद वगळले तर उत्तम सिनेमा आहे आणि 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली असे चित्रपट कमी आहेत.
 
सलमान खानच्या रेडी, दबंग,वॉन्टेडसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात, पण ते कसे असतात हे आपल्यालाही माहितीये. ‘बजरंगी भाईजान’ हा असा चित्रपट आहे, ज्याने पैसेही कमावले आणि सिनेमाही चांगला होता.”
 
‘पठाण’वर होणारी टीका कोमल नाहटा यांना मान्य नाहीये.
 
ते म्हणतात, “हीच कथा जर बाँडपट किंवा अॅव्हेंजर्ससारख्या चित्रपटांमध्ये दिसली असती, तर त्याचं कौतुक झालं असतं. काही लोक सिनेमाबद्दल नकारात्मकता पसरवत आहेत. पण त्यामुळे सिनेमाच्या कमाईत काही फरक पडणार नाही. ज्या लोकांनी सिनेमावर टीका केली होती आणि कमाईच्या आकड्यांवर संशय घेतला होता, तेच शाहरूखच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्वांत पुढे बसले होते.”
 
पठाणच्या यशाने इंडस्ट्रीला काय फायदा होईल?
याचं उत्तर देताना कोमल नाहटा यांनी म्हटलं, “पठाणच्या कमाईने इंडस्ट्रीलाही फायदा झाला आहे. अनेक सिंगल स्क्रीन थिएटर बंद झाले होते. ते पठाणच्या रिलीजसोबतच सुरु झाले आहेत. बॉलिवुडच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, आता बॉलिवूडची सद्दी संपल्याचं म्हटलं जात होतं. पठाणच्या कमाईने या लोकांची तोंडं बंद केली आहेत.
 
दक्षिण भारतीय सिनेमा हा बॉलिवूडला आव्हान देऊ शकत नाही, हे पठाणनं सिद्ध केलं. पठाणने बाहुबलीच्या कमाईचा आकडा पार केला आहे.”
 
शाहरूख खान पठाणच्या यशानंतर 30 जानेवारीला माध्यमांसमोर आला होता. त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी म्हटलं, “जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगेन. ही दीपिका पादुकोण आहे...ती अमर आहे. मी शाहरूख खान आहे...मी अकबर आहे. हा जॉन आहे...तो अँथनी आहे. हाच सिनेमा आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे नाहीये. आम्ही या विविधतेवर, संस्कृतीवर आणि तुमच्यावर प्रेम करतो. म्हणूनच आम्ही सिनेमा बनवतो.”
 
Published By- Priya Dixit