सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (14:20 IST)

सलमान खानला आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेणारा आजार नेमका आहे तरी काय?

फिटनेस, फॅशन आणि बिनधास्त अशा अभिनेता सलमान खानच्या मनात आत्महत्येचे विचार यायचे? चक्रावून गेलात ना. पण हे खरं आहे. खुद्द सलमाननेच यासंदर्भात खुलासा केला आहे.
 
ट्रायजेमिनल न्युरॉल्जिया (Trigeminal Neuralgia) असं या आजाराचं शास्त्रीय नाव आहे. जवळपास दशकभर सलमान या आजाराने त्रस्त होता. आजारावरच्या उपचारांसाठी त्याला परदेशातही जावं लागलं.
 
सलमान खानच्या या आजाराची आज सोशल मीडियावर चर्चा आहे.
 
ट्यूबलाईट चित्रपटातील गाण्याचं दुबईत लॉन्चवेळी सलमानने या आजाराबद्दल सांगितलं होतं.
 
सलमानने नक्की काय त्रास याबद्दल सांगितलं. तो म्हणाला, मला जो आजार झाला होता त्यामध्ये आत्महत्येचे विचार मोठ्या प्रमाणावर मनात येतात. खूप वेदना होतात. मी त्यातून गेलो आहे. त्यावेळी मला असं वाटलं यातून बाहेर पडण्यासाठी मला आणखी जोमाने काम करायला हवं. कितीही वेदना झाल्या तरी त्या बाजूला सारून काम करायला हवं.
 
या आजारामुळे माझ्या आवाजात कर्कशपणा आला होता. दारु प्यायल्यामुळे ते झालं नव्हतं. रमझानच्या काळात मी दारू पीत नाही. आजारामुळे आवाजावर परिणाम झाला. आता मी बरा आहे. मला माझ्या आरोग्यावर काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागलं.
 
56 वर्षीय सलमान भाईजान नावाने प्रसिद्ध आहे. खऱ्या आयुष्यामध्ये सलमान खानची प्रतिमा ही बरीचशी वादग्रस्त राहिली आहे. हिट अँड रन केस, काळवीट शिकार, अनेक गर्लफ्रेंड्स या गोष्टींमुळे सलमान खानच्या आयुष्यात अनेक वादंग निर्माण झाले.
 
दुसरीकडे त्याची पडद्यावरची प्रतिमा मात्र सोज्वळ 'प्रेम' किंवा अन्यायाला विरोध करणारा 'हिरो' (मग तो चुलबुल पांडे असो, बॉडीगार्ड असो की बजरंगी भाईजान) अशीच राहिली आहे.
 
चित्रपट क्षेत्रात बॉडीबिल्डिंगचा ट्रेंड आणणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमानचं नाव घेतलं जातं. अनेक नव्या कलाकारांना संधी देण्याचं काम सलमानने केलं आहे.
 
Trigeminal Neuralgia आजार काय आहे?
ट्रायजेमिनल न्युरॉल्जिया हा मज्जातंतूंचा विकार आहे. यामध्ये चेहरा तसंच डोक्याला असह्य वेदना होतात.
 
चेहऱ्यामधील मज्जातंतूमधील बिघाडामुळे चेहरा वाकडा होतो. अतिशय वेदना होतात. प्रचंड दुखत असल्यामुळे चेहरा मागे पुढे किंवा उजवीकडे-डावीकडे करावसा वाटू लागतं.
 
हा आजार नेमका कशामुळे होतो हे अद्याप समजलेलं नाही. रक्तवाहिन्या आखडल्यामुळे, लाल रक्तवाहिन्या वाढल्यामुळे तसंच चेहऱ्याला येणाऱ्या गाठींमुळे हा आजार होतो.
 
या आजारामुळे चेहऱ्याचा एक भाग प्रचंड दुखतो. असह्य वेदना होतात. दात घासताना, चेहरा धुताना कळा जातात. या वेदना किती काळ राहतील याबाबत ठोस सांगता येत नाही. वेदनामुक्त काळाला रिमीशन म्हटलं जातं. जबडा, दात, हिरड्या आणि ओठ यांना सर्वाधिक फटका बसतो.
 
आजाराचा परिणाम?
या आजारामुळे रुग्णांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात. काहींना या आजारामुळे नैराश्यही जाणवतं.