बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (16:11 IST)

दिलीप कुमार यांनी जेव्हा राज कपूर यांना म्हटलं होतं की, तू मला पेशावरला घेऊन जाशील

जेव्हा राज कपूर अखेरच्या घटका मोजत होते तेव्हा दिलीप कुमार यांनी त्यांना म्हटलं होतं की, "आपण दोघं एकत्र पेशावरला जाऊ. तुम्ही मला पेशावरला घेऊन जाल.
 
पेशावर शहरात महाबर खान मशीद, तिथल्या छावण्या, तिथला बाजार, त्या गल्ल्या जिथे इंग्रज माणसं गुलाबी आणि लाल रंगाचे गुलाब खरेदी करण्यासाठी येत असत. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे तरळून जात आहे."
 
दिलीप कुमार यांचं आत्मचरित्र- 'दिलीप कुमार- द सब्स्टन्स अँड द शॅडो' मध्ये यासंदर्भात लिहिलं आहे. ते वर्णन वाचून पाकिस्तानात 11 डिसेंबर 1922 मध्ये जन्मलेले दिलीप कुमार पेशावरच्या आठवणी विसरलेले नाहीत, हे लगेचच जाणवतं.
 
त्यांचं आत्मचरित्र वाचताना पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजारातील गंध आणि ते वातावरण अनुभवता येतं.
पेशावरमधल्या थंडीने गारठलेल्या रात्रीचं वर्णन करताना त्यांनी लिहिलंय की, "थंडीच्या काळात सगळी माणसं गाद्यागिरद्या, रजया घेऊन गच्चीत येत असत. शेकोटी तयार करून उब मिळवत. प्रत्येकाला गाणं म्हणावं लागे किंवा गोष्ट सांगावीच लागे.
 
आजीला वाटलं एखादी गोष्ट लहान मुलांनी ऐकू नये तर ती सांगणाऱ्याला थांबवत असे. माझ्यासाठी आजी ही पहिली सेन्सॉर बोर्ड होती."
 
पेशावरची आणखी एक गोष्ट दिलीप कुमार लिहितात, "थंडीच्या दिवसात बिछान्यात मांजरांना झोपवण्यात येत असे. जेणेकरून आम्ही झोपायला जाईपर्यंत बिछान्यात थोडी उब निर्माण झालेली असे."
 
दिलीप कुमार मुलाखतीदरम्यान अनेकदा किस्से ऐकवणं आणि चांगली स्क्रिप्ट निवडण्याची क्लृप्ती या गोष्टी पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजारातून शिकल्याचं ते सांगत असत.
ते नेमकं कसं याचा किस्सा जाणून घेऊया. ते लिहितात, "संध्याकाळी नमाज पडल्यानंतर दुकानदार, मौलवी, व्यापारी रंजक किस्से सांगत असत. किस्से सांगण्यात ही त्यांची खासियत होती. कधी थांबायचं, कुठे हलक्या आवाजात बोलायचं, कधी आवाज उंचवायचा याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांच्या गोष्टी ऐकता ऐकता मी कथेत गुंग होऊन जायचो. घरी पोहोचेपर्यंत कथेतल्या माणसांचं काम मी करू लागे."
 
दिलीप कुमार वडिलांना 'आगाजी' नावाने संबोधत. पेशावरमध्ये त्यांच्या फळांच्या अनेक बागा होत्या. दिलीप कुमार यांचे वडील आणि बशेश्वरनाथ घट्ट मित्र होते. पृथ्वीराज कपूर हे बशेश्वरनाथ यांचे चिरंजीव. दिलीप कुमार यांच्या घरचे तीसच्या दशकात व्यापाऱ्याच्या चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत मुंबईला आले. तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचे ढग दाटू लागले होते.
 
दिलीप कुमार आणि राज कपूर यांची मैत्री
मुंबईत दिलीप कुमार आणि पृथ्वीराज कपूर यांचे चिरंजीव राज कपूर अभिनेते होण्यासाठीच आले आणि मित्रही झाले.
80च्या दशकात दिलीप कुमार यांना पेशावरला जाण्याची संधी मिळाली. 1988च्या बेतात त्यांना पेशावरहून एक पत्र आलं. पेशावरमध्ये पहिल्यांदाच ब्लड बँकेचं उद्घाटन होणार होतं आणि त्याच्या उद्घाटनाचं निमंत्रण त्यांना देण्यात आलं होतं. दिलीप कुमारांनी हे निमंत्रण स्वीकारलं हे पाकिस्तानचे पंतप्रधान जिया उल हक यांना समजलं तेव्हा त्यांनी खाजगी भेटीचं रुपांतर सरकारी भेटीमध्ये केलं.
 
दिलीप कुमार आणि राज कपूर यांना पेशावर प्रचंड आवडत असे. जेव्हा दिलीप कुमार 1988 मध्ये पेशावरहून भारतात परतले तेव्हा राज कपूर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी आशा सोडली होती.
 
'राज, तू मला पेशावरला घेऊन जाशील'
 
ऋषी कपूर यांनी दिलीप कुमार यांच्यावरील पुस्तकात लिहिलं आहे की, राज कपूर यांची प्रकृती चिंताजनक होती. दिलीप अंकल राज कपूर यांना भेटायला आले आणि म्हणाले, "राज मी नुकताच पेशावरहून परतलो आहे. तिथल्या चपली कबाबांचा स्वाद आणि गंध तुझ्यासाठी आणला आहे.
 
आपण दोघे मिळून पेशावरला जाऊ. तिथल्या रस्त्यारस्त्यांवर हिंडू. जुन्या दिवसांप्रमाणे कबाब आणि रोट्यांचा आस्वाद घेऊ. राज, तू मला पेशावरमधल्या अंगण असलेल्या घरी घेऊन जाणार आहेस."
 
दिलीप कुमार यांच्या डोळ्यात अश्रू होते. तिथून निघताना त्यांनी राज कपूर यांना पाहिलं. ती त्यांची शेवटची भेट ठरली.
 
दिलीप कुमार यांचं राज कपूर यांना बरोबर घेऊन पेशावरला जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. राज कपूर यांचं 2 जून 1988 रोजी निधन झालं.
 
पेशावरहून फोनवर बर्थडे पार्टी
अनेक वर्षांपासून पेशावरमधले त्यांचे चाहते दिलीप कुमार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी केक कापून साजरा करत असत. जेव्हा केक कापला जात असे तेव्हा दिलीप कुमार, सायरा बानो, वहिदा रहमान हे फोनवर असत.
एकदा मीही या फोनकॉलमध्ये सहभागी झालो. मी दिल्लीहून या कॉलमध्ये सहभागी होत असे. अनेक वर्ष ही परंपरा सुरू राहिली.
 
तसं तर मी अनेक बर्थडे पार्टीमध्ये सहभागी होत असे मात्र दिलीप कुमार यांच्या वाढदिवसाच्या बर्थडे पार्टीत सहभागी होण्याचा अनुभव अनोखा होता.
 
वाजपेयींचा सल्ला
दिलीप कुमार यांना 1998मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यावेळी वाद झाला होता. त्यावेळी अनेकांनी त्यांच्यावर अँटी नॅशनल असण्याचा आरोप केला होता.
 
त्यावेळी दिलीप कुमार पेशावरला म्हणजे पाकिस्तानला जायचं की नाही अशा साशंकतेत होते. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर दिलीप कुमार यांनी पाकिस्तानचा पुरस्कार स्वीकारला.
 
'नवाझ साहेब, तुम्ही हे काय केलंत?'
 
दिलीप कुमार यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांनी त्यांच्या पुस्तकात दिलीप कुमार यांच्याबद्दलचा एका किस्सा लिहिला.
 
त्यांनी लिहिलं आहे, नवाझ शरीफ यांना सांगण्यात आलं की भारताचे पंतप्रधान तुमच्याशी तातडीने बोलू इच्छित आहेत. कारगिलसंदर्भात बोलायचं आहे.
 
"वाजपेयी यांचं बोलणं झाल्यानंतर नवाझ शरीफ फोन ठेवणार तितक्यात पलीकडून एक वेगळाच आवाज आला. पलीकडून दिलीप कुमार बोलू लागले. नवाझ शरीफ यांना विश्वासच बसला नाही. ते स्वत: दिलीप कुमार यांचे चाहते होते. दिलीप कुमार नवाझ यांना म्हणाले, मियाँ साहब, कारगिलमध्ये तुम्ही हे काय केलंत. याचे परिणाम काय होतील याचा तुम्ही विचारच केला नाही. "
 
दिलीप कुमार अभिनेते होण्यापूर्वी त्यांचे वडील त्यांना सांगत की असं काम करा की ब्रिटन सरकारतर्फे देण्यात येणारा ओबीई पुरस्कार तुम्हाला मिळेल. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा तो कालखंड होता.
 
त्या घटनेविषयी दिलीप कुमार यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे. 1998 मध्ये मला पेशावरहून निमंत्रण आलं. आज मी तिथे भारतीय म्हणून राजकीय अतिथी म्हणून जातो आहे. माझ्या वडिलांना वाटायचं की मला ऑर्डर ऑफ ब्रिटिश एंपायर हा सन्मान मिळावा. पेशावरमध्ये माझं जे स्वागत झालं ते वडिलांनी पाहिलं असतं तर त्यांना प्रचंड आनंद झाला असता.
 
हे स्पष्ट आहे की दिलीप कुमार जितके भारतात राहिले तितकेच पाकिस्तानमध्येही राहिले.