शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (16:20 IST)

सुष्मिता सेनने जेव्हा ऐश्वर्या रायशी स्पर्धेच्या भीतीने 'मिस इंडिया' स्पर्धेतून नाव मागे घेतलेलं

उद्योगपती ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेनसोबतचे फोटो शेअर करत, सुष्मिताला 'माय बेटरहाफ' असं संबोधलं आहे. ललित मोदींनी सुष्मिता सेनसबोतचे चार फोटो ट्वीट केले आहेत. मालदीव आणि सार्डिनियामधून लंडनमध्ये परतल्यानंतर सुष्मिता सेनसोबतचे फोटो ललित मोदींनी ट्वीट केले.
 
या ट्वीटमध्ये 'नवीन आयुष्याची नवी सुरुवात' असं म्हणत सुष्मिता सेनला 'बेटरहाफ' म्हटलंय.
 
या ट्वीटनंतर ललित मोदींनी स्पष्टीकरणासाठी पुन्हा एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी म्हटलं की, "स्पष्ट करतो की, आम्ही लग्न केलं नाहीय. सध्या एकमेकांना डेटिंग करत आहोत. पण तेही (लग्न) लवकरच होईल."
 
ललित मोदींच्या ट्वीटनंतर सुष्मिता सेनचं नाव चर्चेत आलंय.
 
सुष्मिता तिच्या नातेसंबंधांमुळे यापूर्वीही चर्चेत आली होती. पण त्याचबरोबर अनपेक्षितपणे मॉडेलिंगला सुरुवात करुन थेट मिस युनिव्हर्स बनलेली, वयाच्या 24 व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेणारी, आपल्या भूमिकांबद्दल कायम ठाम असलेली अशी सुष्मिताची दुसरी बाजूही आहे.
 
तिचा हा रिल आणि रिअल लाइफमधला प्रवास नेमका कसा होता?
 
'मिस इंडिया'साठी अशी झाली विचारणा
कडक शिस्तीच्या बंगाली वातावरणात वाढलेली सुष्मिता ग्लॅमरच्या दुनियेत अपघातानेच आली.
 
आपल्या मुलीनं आयएएस बनावं अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. त्याच दृष्टिनं ते तिला वाढवत होते. पॉकेटमनीही अगदी मोजून मिळायचा. त्यावेळी टीन एजर सुष्मितानं पॉकेटमनीसाठी उन्हाळ्याच्या सुटीत सेल्स गर्ल म्हणूनही काम केलं. त्यावेळीही तिला अनेक जण तू मॉडेलिंग का करत नाहीस, असं विचारायचे.
 
पण तिनं ते फारसं मनावर घेतलं नाही.
 
एकदा ती मित्र-मैत्रिणींसोबत नाइट क्लबमध्ये गेली होती. वडिलांना मात्र मी मैत्रिणीकडे अभ्यासाला जातीये, असं सांगितलं होतं.
 
 
तिथे एक गृहस्थ तिच्याकडे आले आणि त्यांनी तिला म्हटलं की, तू 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी व्हायला हवंस.
 
तिचा त्यांच्यावर विश्वास बसला नाही. पण त्यांनी तिला स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड देऊन भेटायला बोलावलं. ते टाइम्स ऑफ इंडियाचे रंजन बक्षी होते.
 
आता हे सगळं घरी, वडिलांना कसं सांगायचं हा प्रश्न होता. सुष्मितानं घाबरत घाबरत आईला सांगितलं... तेव्हा आईची प्रतिक्रिया होती, 'तू हे करायला हवंस.'
 
आईच्या प्रोत्साहनामुळे सुष्मितानं 'मिस इंडिया' स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
 
ऐश्वर्यासोबत स्पर्धा नको म्हणून मागे घेतलं होतं नाव
1994 साली सुष्मिताने मिस इंडिया स्पर्धेसाठी फॉर्म भरला होता. त्याच वर्षी ऐश्वर्या राय हीसुद्धा स्पर्धेत सहभागी झाली होती. ऐश्वर्या या सौंदर्यस्पर्धेत येण्याआधी काही जाहिरातींमध्ये झळकली होती आणि मॉडेलिंग विश्वात तिच्या नावाची चर्चा सुरू झाली होती.
 
त्यावेळी केवळ ऐश्वर्या सहभागी होतीये म्हणून 25 मुलींनी आपलं नाव मागे घेतलं होतं. सुष्मितालाही जेव्हा हे कळल तेव्हा तिने पण आयोजकांना माझा फॉर्म परत करा, मलाही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असं म्हटलं होतं.
 
हा सगळा किस्सा स्वतः सुष्मिता सेनने दिवंगत अभिनेते फारुख शेख यांच्या जीना इसी का नाम है या कार्यक्रमात सांगितला होता.
 
"ऐश्वर्या कमालीची सुंदर आहे आणि सगळ्यांनाच हे माहीत आहे. त्यामुळे मला वाटलं आपण तिच्यासोबत सहभागी व्हायला नको. मी घरी आल्यावर जेव्हा आईला हे सांगितलं. तेव्हा तिनं माझी चांगलीच खरडपट्टी काढली. माझ्या आईनं म्हटलं की, तू प्रयत्नसुद्धा न करता हार मानत आहेस. ऐश्वर्या जर जगातील सर्वांत सुंदर मुलगी आहे असं तुला वाटत असेल तर इतर कोणापेक्षाही तिच्याकडून पराभूत झालेलं काय वाईट? पण आधी तुझं सर्वोत्तम देऊन तर पाहा."
 
हा किस्सा आपण नंतर ऐश्वर्याला सांगितल्याचंही सुष्मितानं म्हटलं होतं.
 
आईनं समजावल्यानंतर सुष्मिता या स्पर्धेत केवळ सहभागीच झाली नाही तर मिस इंडियाचा किताबही तिनं पटकावला.
 
त्याच वर्षी तिनं मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व केलं आणि मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी ती पहिली भारतीय होती. त्याच वर्षी ऐश्वर्या राय ही मिस वर्ल्ड ठरली होती.
 
बॉलिवूडमध्ये पदार्पण
मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुष्मिता सेनसाठी बॉलिवूडचे दरवाजेही खुले झाले. 1996 साली विक्रम भट्टनं दिग्दर्शित केलेल्या दस्तक चित्रपटातून सुष्मितानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिनं मिस युनिव्हर्स ठरलेल्या तरुणीची भूमिका साकारली होती, जिला तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून त्रास दिला जात असतो. मुकुल देव आणि शरद कपूर हे दोघं चित्रपटाचे नायक होते. सुष्मिताचा हा बॉलिवूड डेब्यू बॉक्स ऑफिसवर मात्र यशस्वी ठरला नव्हता. त्यानंतर तिने एका तमीळ चित्रपटात काम केलं.
 
1999 मध्ये ती डेव्हिड धवनच्या बिवी नंबर 1 सिनेमात झळकली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. त्याच वर्षी तिनं 'सिर्फ तुम'सारखा वेगळ्या धाटणीचा सिनेमाही केला.
 
सुष्मितानं आँखे, मैं हूँ ना, मैंने प्यार क्यूं किया, समय, मैं ऐसा ही हूं, तुमको भूला ना पायेंगे, फिलहाल सारख्या चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. यातील काही चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही ठरले. पण सुष्मिता स्वतंत्रपणे, केवळ आपल्या जीवावर चित्रपट यशस्वी करू शकणारी अभिनेत्री ठरली नाही.
 
2006 मध्ये सुष्मितानं दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांच्या 'चिंगारी' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. कल्पना लाजमी या प्रयोगशील आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखल्या जात. पण सुष्मिताचा हा प्रयोगही फारसा यशस्वी ठरला नाही.
 
2020 मध्ये सुष्मिता सेननं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. तिने डिस्ने प्लस हॉटस्टारवरील 'आर्या' या सीरिजमध्ये अपघातानं आपल्या नवऱ्याचं ड्रग्ज व्यवसायाचं साम्राज्य सांभाळावं लागलेल्या स्त्रीची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही पसंतीची पावती मिळाली.
 
आपल्या बॉलिवूडमधील करिअरबद्दल बोलताना एकदा सुष्मितानं म्हटलं होतं, "मी जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा स्वतःलाच एक अट घातली होती. मी जेव्हा या इंडस्ट्रीतून बाहेर पडेन, तेव्हा स्वतःची एक जागा बनवून जाईन. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा माझी स्वतःची ही इंडस्ट्री सोडण्याची तयारी झाली असेल, तेव्हाच मी जाईन. त्याआधी नाही."
 
मुलींना दत्तक घेण्यासाठी कायदेशीर लढाई
46 वर्षांची सुष्मिता ही दोन मुलींची आई आहे. ती सिंगल मदर आहे. रिनी आणि अलिसा या दोन मुलींना तिने दत्तक घेतलं आहे. पण अविवाहित असताना, वयाच्या विशीत मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेणं आणि तो प्रत्यक्षात आणणं हे सुष्मितासाठी तितकं सोपं नव्हतं. त्यासाठी तिला कायदेशीर लढाईही लढावी लागली होती. काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्ना हिच्या 'द आयकॉन्स' या कार्यक्रमात बोलताना सुष्मितानं हा सगळा प्रवास सांगितला होता.
 
वयाच्या 19 व्या वर्षी मिस युनिव्हर्स झाल्यानंतर सुष्मिता एका अॅडॉप्शन सेंटरमध्ये गेली होती. तिथे गेल्यावर आपण इथे केवळ फोटोसेशन करतोय ही गोष्ट तिला खटकली. त्यावेळी तिच्या मनात मुल दत्तक घेण्याचा विचार आला.
 
वयाच्या 21 व्या वर्षी सुष्मितानं मुलगी दत्तक घेण्यासाठी अर्ज केला होता. कोर्टात ते प्रकरण सुनावणीला यायलाही तीन वर्षं लागली.
 
जजने तिला म्हटलं, " जर आज मी या ऑर्डरवर सही केली आणि तू ही जबाबदारी नीट पार पाडली नाहीस, तर जे परिणाम होतील त्याला दोन लोक उत्तरदायी असतील- तू आणि मी."
 
पण सुष्मिताला मुलीला दत्तक घेता आलं. या मुलीचं नाव रिनी.... सुष्मिताची ही थोरली लेक सध्या अभिनय क्षेत्रातच पाय रोवू पाहत आहे. सुट्टाबाज ही तिची शॉर्ट फिल्म काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती.
 
रिनीला दत्तक घेतल्यानंतर काही वर्षांनी सुष्मिताने दुसऱ्या मुलीला दत्तक घेतलं. यावेळी तिचा संघर्ष वेगळा होता.
 
मूल दत्तक घेण्याच्या नियमांनुसार जर तुम्ही एकाच लिंगाची दोन मुलं दत्तक घेता येत नव्हती. म्हणजे जर आधी मुलगी दत्तक घेतली असेल, तर दुसरा मुलगा दत्तक घ्यायला हवा.
 
दत्तक घेण्याचा विचार करणाऱ्या इतर पालकांसोबत सुष्मितानं या नियमाविरुद्ध एक कायदेशीर लढाई लढली. दहा वर्षांचा हा संघर्ष होता.
 
ज्यावेळी या संदर्भात उच्च न्यायालयाचा नवीन नियम आला, त्यानंतर तीन महिन्यांनी मुलीला दत्तक घेण्यासाठी सुष्मितानं अर्ज केला आणि अलिसा तिच्या आयुष्यात आली.
 
विक्रम भट्टपासून रोहमन शॉलपर्यंत रिलेशिपची चर्चा
सुष्मिता सेनचं वैयक्तिक आयुष्य हे तिच्या रिलेशनशिपमुळेही अनेकदा चर्चेत आलं.
 
ज्या विक्रम भट्टच्या चित्रपटातून सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, त्याच विक्रम भट्टसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. या नात्यामुळे विक्रम भट्ट आणि त्याची पत्नी आदिती यांच्या नात्यात दुरावा आल्याचंही म्हटलं गेलं होतं.
 
विशेष म्हणजे या नात्यात असताना सुष्मिता आणि विक्रम भट्ट यांनी एकत्रित 'रांदेव्हूज विथ सिम्मी गरेवाल' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सिमी गरेवाल यांनी सुष्मिताला एका विवाहित पुरुषासोबत नात्यात असण्याबद्दल विचारलं होतं.
 
त्यावेळी सुष्मिता सेननं म्हटलं होतं, "तो आणि त्याची पत्नी एकत्र राहात नाहीयेत. जर त्या व्यक्तीच्या लग्नात प्रॉब्लेम असेल तर मी स्वतःला दोष देत फिरणार नाही किंवा त्या व्यक्तीलाही अपराधीपणाची भावना देणार नाही."
अर्थात, सुष्मिता सेन आणि विक्रम भट्ट यांचं नातं फार काळ टिकलं नाही.
 
त्यानंतर सुष्मिता सेनचं नाव अभिनेता रणदीप हुडा, पाकिस्तानी क्रिकेटपटू वासिम अक्रम, फिल्ममेकर मुद्दसर अलीसोबतही जोडलं गेलं.
 
अलीकडेच सुष्मिता सेन मॉडेल रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करायचे.
 
एका फॅशन शो दरम्यान या दोघांची भेट झाली होती. त्यांच्या या पहिल्या भेटीला काहीच दिवस झाले असतील, हे दोघे पुन्हा एकत्र दिसले.अगदी फॉरेन ट्रिप्स असो वा इन्स्टाग्राम, पुढे बऱ्याचदा हे दोघेही सोबत दिसू लागले.
 
 
काही महिन्यांपूर्वी सुष्मिता आणि रोहमन वेगळे झाले.
रोहमनने आपल्या इन्स्टाग्रामवर म्हटलं होतं की, आता आमचं मैत्रीचं नातं सुरू झालं असून ही मैत्री कायम राहील. आमचं नातं संपलं असेल तरी प्रेम उरलंय.
 
आता सुष्मिता ललित मोदींसोबत नात्यात आहे. हे दोघंही विवाहबद्ध झाले नसले तरी लवकरच आम्ही लग्न करू असं ललित मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.