मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (18:47 IST)

जेव्हा वहिदा रेहमान यांनी म्हटलं होतं की, मी घरून पळून आले नाहीये, मी माझं नाव का बदलू

"कोणतंही काम वाईट नसतं तर माणसं वाईट असतात. तुम्ही कसे वागता यावर तुमचा व्यवसाय, काम अवलंबून असतं." हे शब्द आहेत वहिदा रहमान यांचे. खरंतर ही शिकवण त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली होती. वहिदा रहमान यांचे वडील हे आयएएस अधिकारी होते.
 
समाजात एका प्रतिष्ठित घरात तेही मुस्लीम समुदायातील जन्मलेल्या एका मुलीने जेव्हा आपल्याला भरतनाट्यम शिकायचंय म्हटलं तेव्हा साहजिकच त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
 
अनेक लोक त्यांच्या वडिलांना 'क्या कर रहे हो रहमान?', असं म्हणू लागले होते. मात्र वहिदा यांच्या वडिलांनी भरतनाट्यम शिकायला परवानगी दिली. कोणतंही काम वाईट नसतं तर माणसं वाईट असतात. तुम्ही कसे वागता यावर तुमचा व्यवसाय, काम अवलंबून असतं. हा त्यांनी दिलेला मंत्र वहिदा यांनी आत्मसात करायचा ठरवलं आणि नृत्यापाठोपाठ त्या अभिनयाच्या क्षेत्रातही चमकल्या.
 
वहिदा यांना 2023 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना आज (26 सप्टेंबर 2023) रोजी म्हणजे देव आनंद यांच्या 100 व्या जयंतीदिनीच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
पुरस्काराची घोषणा झाल्यावर रहमान यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, “मी अत्यंत आनंदी आहे. देव आनंद यांची आज जयंती आहे त्यामुळे मला दुप्पट आनंद झाला आहे. ही भेट त्यांना मिळणार होती असं मला वाटतं, ती मला मिळाली.
 
त्यांच्या जयंतीचा उत्सव सुरू असताना मला हा पुरस्कार मिळाला, मी खरंच आनंदी आहे. सरकारने या पुरस्कारासाठी मला निवडलं यासाठी मी त्यांची आभारी आहे.”
 
त्या पुढे म्हणाल्या, “मी सध्या काम करत नाहीये. मी कोणत्या गोष्टीची अपेक्षाही आता करत नाही. मी कधीच कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा केली नाही. जर ते मिळणार असेल तर ते मिळेलच अशी माझी भूमिका असते. त्यांना योग्य वाटलं तर मला मिळेल असा विचार मी करते.”
 
या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्यासंदर्भातील काही गोष्टी येथे पाहू.
 
जेव्हा देवसाब म्हणाले, ‘आय डोंट केअर, माय रोझी इज ओन्ली वहिदा’
देव आनंद यांच्याबरोबर गाईड सिनेमामुळे त्यांच्या भरपूर आठवणी आहेत. ट्विंकल खन्ना यांच्यांशी 'ट्विक इंडिया' या युट्यूब चॅनेलसाठी वहिदा रहमान यांनी आपल्य़ा आठवणी सांगितल्या आहेत.
 
त्या सांगतात पहिल्यांदा देव आनंद भेटले तेव्हा ते जवळपास ओऱडलेच. ते म्हणाले, "वहिदा कैसी हो... देवसाब कौन है, देवसाब नही देव....कहो..."
 
'गाईड' सिनेमाचे हिंदीसाठी दिग्दर्शक विजय आनंद होते तर इंग्रजीसाठी टॅड डिनिएनल्स्की दिग्दर्शक होते. त्या दोघांनाही वहिदा रहमान या सिनेमासाठी आवडल्या नव्हत्या.
 
कदाचित त्यांना आपला चेहरा आवडला नसावा आणि माझं इंग्रजी तेव्हा तितकं चांगलं नसावं असं त्या सांगतात.
 
पण देव आनंद यांनी मात्र वहिदा रहमानच या सिनेमा करतील असं सांगितलं. ‘आय डोंट केअर, माय रोझी इज ओन्ली वहिदा’ असं बजावल्यामुळे दोन्ही दिग्दर्शकांनी त्याला होकार दिला.
 
आडनाव बदलायला नकार
वहिदा रहमान यांनी वयाच्या 17 व्या वर्षी सिनेमासृष्टीत प्रवेश केला. सीआयडी हा त्यांचा पहिला सिनेमा होता.
 
1956 साली हा सिनेमा आला होता. या सिनेमात वहिदा रहमान आणि देव आनंद हे मुख्य कलाकार होते. गुरुदत्त यांनी सिनेमाची निर्मिती केली होती तर राज खोसला त्याचे दिग्दर्शक होते.
 
ट्विंकल खन्ना यांच्याशी बोलताना वहिदा यांनी या सिनेमाच्या आठवणीही सांगितल्या आहेत.
 
त्यांनी म्हटलं की, "राज खोसला यांनी मला म्हटलं तुझं स्क्रीनसाठी नाव बदलूया. मी विचारलं की, माझ्या नावात काय वाईट आहे? तेव्हा राज यांनी म्हटलं की, मोठं नाव आहे.
 
मी त्यांना म्हटलं की, मला तुम्ही 'वहिदा' अशीच हाक मारणार, 'वहिदा रहमान इकडं ये' असं थोडीच तुम्ही म्हणणार आहे. शिवाय मी काय घरातून पळून आले नाहीये. माझी आई इथे शेजारी बसलीये. मग मी का नावं बदलावं."
 
"यावर शेवटी राज खोसला यांनी म्हटलं की, ठीक आहे, नको बदलूया नाव तुझं."
 
मोठी झाल्यावर मी बिकिनी घालेनसुद्धा, पण सध्या....
वहिदा रहमान यांनी 'सीआयडी' सिनेमाची आणखी एक आठवण सांगितली आहे.
 
आपण सुरुवातीपासूनच काही नियम पाळले असं त्या सांगतात. कपड्यांच्याबाबतीत आपण कोणतीही तडजोड करणार नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं. जर मला कपड्यांमध्ये अस्वस्थ वाटत असेल तर असे कपडे मी वापरणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं.
 
त्या सांगतात, “त्यावेळेस मी फक्त 17 वर्षांची होते. सगळ्या अटी मान्य झाल्यावर करारावर माझी आई सही करणार होती. स्वाक्षरीची वेळ आल्यावर मी परत म्हटलं की, थांबा माझी आणखी एक अट आहे. आता मात्र राज खोसला वैतागले. गप्प बसून राहिलेल्या गुरुदत्त यांना राज म्हणाले, 'अरे, तू इसको साइन कर रहा है, या ये लडकी तुम्हे साईन कर रही है...'
 
यानंतर वहिदा यांनी आपली अट सांगितली की, मला जर कपड्यांमध्ये अस्वस्थ वाटलं तर मी काम करणार नाही. ती अट करारात घालण्यातही आली.
 
त्या सांगतात, "मी राज खोसला यांना सांगितलंही की पुढे मोठी झाल्यावर मी कदाचित बिकिनीही घालेन पण आता माझी ही अट आहे, आणि ती त्या करारात घेण्यात आली."
 
डॉक्टर व्हायचं होतं
वहिदा रहमान यांना लहानपणापासून आपण डॉक्टर व्हावसं वाटत होतं. त्याकाळी मुस्लीम धर्मियांत डॉक्टर या पेशाला विशेष महत्त्व आणि आदराचं स्थान होतं त्यामुळे आपणही डॉक्टर व्हावं असं त्यांना वाटत असे.
 
अर्थात पुढे त्या सिनेकलाकार म्हणून नावारुपाला आल्या असल्या तरी त्यांचा वैद्यकशास्त्राबद्दलचा ओढा कमी झाला नाही. आजही त्या वैद्यकविषयांसंदर्भातील, औषधांसदर्भातील विविध नियतकालिकं वाचतात, त्यात काय नवे शोध लागले आहेत याची माहिती घेतात.
 
वहिदा यांना आपल्या या 5 भूमिका आवडतात
गाईड
 
गाईड हा सिनेमा 1965 साली प्रदर्शित झाला. सुप्रसिद्ध लेखर आर. के नारायण यांनी 'द गाईड' ही कादंबरी 1958 साली प्रकाशित केली होती. त्यावर हा सिनेमा आधारित आहे.
 
विजय आनंद यांनी हिंदीसह इंग्रजीतही हा सिनेमा केला होता. या सिनेमामुळे भारतीय सिनेमा सातासमुद्रापार पोहोचला होता.
 
'टाइम' मासिकाने 2012 साली बेस्ट बॉलिवूड क्लासिक सिनेमांच्या यादीत चौथ्या क्रमाकांवर गाईडला स्थान दिले होते. या सिनेमात लता मंगेशकरांचं 'आज फिर जिने की तमन्ना है' या गाण्यानं आणि त्यातील वहिदा यांच्या अभिनयानं रसिकांना वेड लावलं होतं.
 
शिकागो आंतरराष्ट्रीय फिल्म सोहळ्यात वहिदा यांना 'गाईड'साठी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच या सिनेमाला सवोत्कृष्ठ अभिनेता, अभिनेत्री, सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, सवोत्कृष्ठ सिनेमा असे फिल्मफेअरचे चारही पुरस्कार मिळाले होते.
 
मुझे जिने दो
 
हा सिनेमा 1963 साली प्रदर्शित झाला होता. एक डाकूसुद्धा कसा प्रेम करू शकतो अशा विषयावर हा सिनेमा होता. याचे दिग्दर्शक सुनील दत्त होते आणि ते सिनेमाचे नायकही होते. डाकू जर्नैल सिंहची भूमिका त्यांनी केली होती. त्यासाठी 1964 साली त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. वहिदा रहमान यांनी यात चमेली जानची भूमिका केली होती.
 
खामोशी
 
हा सिनेमा आशुतोष मुखर्जी यांच्या 'नर्स मित्र' या लघुकथेवर आधारित होता. त्यावर बंगाली भाषेत एक सिनेमा झाला होता. त्याचं 1969 साली हिंदी रुपांतरण करण्यात आलं.
 
वहिदा रहमान आणि राजेश खन्ना यांचा हा सिनेमा होता. या सिनेमाला ब्लॅक अँड व्हाइट सिनेमॅटोग्राफीसाठी फिल्मफेअर मिळालं होतं.
 
तिसरी कसम
 
1966 साली प्रदर्शित झाल्यावर या सिनेमाला लोकांची फारशी पसंती मिळाली नव्हती. मात्र या सिनेमाशिवाय भारतीय सिनेमाचा इतिहास पूर्ण होत नाही. फणिश्वरनाथ रेणू यांच्या 'मारे गए गुलफाम' या कथेवर हा सिनेमा आधारित होता. यात राज कपूर आणि वहिदा रहमान होते. मात्र या सिनेमामुळे शैलेंद्र कर्जाच्या विळख्यात सापडले.
 
1967 साली या सिनेमाला सर्वोत्कृष्ठ सिनेमा असा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. मॉस्को फिल्म सोहळ्यातही त्याला पुरस्कार मिळाला. सजन रे झूठ मत बोलो, दुनिया बनानेवालो, पान खाए सईंया हमारो ही गाणी विशेष गाजली होती.
 
रेश्मा और शेरा
 
'रेश्मा और शेरा' या सिनेमाची सुनील दत्त यांनी निर्मिती केली होती. वहिदा यांनी यामध्ये रेश्माची भूमिका केली होती. त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. तसेच जयदेव यांना दिग्दर्शनासाठी आणि रामचंद्र यांना सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.