सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (21:25 IST)

रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमातल्या गाण्यातले अर्जन वेल्ली होते तरी कोण?

अर्जन वेल्लीने पैर जोड के गंडासी मारी’
ढोलाच्या ठेक्यावर जेव्हा या लोकगीताचे बोल कानावर पडतात, तेव्हा कोणत्याही पंजाबी माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो.
 
पंजाबमध्ये सर्वतोमुखी असलेलं हे नाव रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ सिनेमातल्या एका गाण्यामुळे सध्या गाजत आहे.
 
भूपिंदर बब्बल यांनी गायलेल्या या गाण्याने पंजाबमधील लोकांच्या मनातल्या अर्जन वेल्ली यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि हा अर्जन वेल्ली नेमका आहे तरी कोण, हा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
 
अर्जन वेल्लींचं नाव यापूर्वीही 1982 साली प्रदर्शित झालेल्या पुत्तर जट्टां दे या सिनेमातही आलं होतं.
 
सध्या ‘अॅनिमल’मधल्या गाजत असलेल्या गाण्याच्या निमित्ताने बीबीसी पंजाबीने अर्जन वेल्लीबद्दलचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
‘बंडखोर’ अर्जन वेल्ली
अर्जन वेल्ली पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील दौधार गावातील असल्याचे उल्लेख आहेत.
 
आपला मोठा भाऊ बच्चन सिंह याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो बंडखोर झाला.
 
खूप काळापर्यंत दौधार गावाचे सरपंचपद सांभाळलेले जगराज सिंह दौधार सांगतात की, अर्जन वेल्ली हे त्याचा साथीदार रुप सिंहसोबत पोलिसांच्या चकमकीत मारले गेले होते. ही घटना ब्रिटीश राजवटीतली होती.
 
गावातील वृद्ध लोक सांगतात की, अर्जन वेल्ली हे सिद्धू परिवारातल्या शोभा सिंह आणि चंदा सिंह यांचे वंशज होते.
 
अर्जन वेल्लीच्या वंशजांनी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक संग्रहालयही उभं केलं आहे.
 
अर्जन वेल्लीनं घर का सोडलं?
जय सिंह हे आता 82 वर्षांचे आहेत. लहान असताना घरात वडील आणि आजोबा अर्जन वेल्लीबद्दल बोलायचे हे त्यांना आठवतंय.
 
ते सांगतात की, “त्यादिवशी गावात लग्न होतं. अर्जन वेल्लीच्या घरातल्यांचं त्यांच्या भागीदारांसोबत कडाक्याचं भांडण झालं. या भांडणातला वाद लग्नापर्यंतही पोहोचला. या सगळ्या भांडणात अर्जन वेल्लीचा मोठा भाऊ बच्चन सिंह याचा गोळी लागून मृत्यू झाला.
 
याच घटनेनंतर अर्जन वेल्लीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. तो अतिशय शूर होता.”
 
अर्जन वेल्ली पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी गावातच पोलिस स्टेशन स्थापन केलं.
 
माजी सरपंच जगराज सिंह दौधार यांनी सांगितलं, “अर्जन वेल्ली आमच्याच कुटुंबियांपैकी एक होते. जेव्हा ते लग्नातलं भांडणं झालं होतं, तेव्हा अर्जन वेल्लीच्या बाजूकडचे लोक गंडासे आणि डांग घेऊन विरोधी पक्षाशी भिडले होते. अर्जन वेल्लींनी पाय जमिनीवर खंबीरपणे रोवक गंडासा उचलला आणि विरोधकांना मारलं असा या गाण्याचा भावार्थ आहे.”
 
बाबा अर्जन हे शारीरिकदृष्ट्या बळकट होते आणि खूप चाणाक्षही होते, असं जगराज सांगतात.
 
गावकऱ्यांना अर्जन वेल्लींचा अभिमान
अर्जन वेल्लीच्या कुटुंबियांबरोबरच त्यांच्या गावातील सामान्य लोकांनाही त्यांचं नाव अॅनिमलमधल्या गाण्यात आल्याचा अभिमान आहे.
 
बलविंदर सिंह सांगतात की, अर्जन वेल्ली हे नात्याने त्यांचे काका लागतात.
 
ते पुढे म्हणतात, “सिनेमात माझ्या काकांचं नाव ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. त्यांच्याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी लोक आमच्या घरी येत आहेत.”
 
माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, ब्रिटीशांच्या राजवटीत आमचं घर दोनदा तोडण्यात आलं होतं. अर्जन वेल्लींबद्दलची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आमच्या भागातील लेकी-सुनांची अब्रू जपली.”
 
गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी पैशांची मदत करण्याबद्दलही अर्जन ओळखले जायचे.
 
बलविंदर सिंह यांच्या मते त्याकाळात ब्रिटीश सरकार हे बंडखोर, डाकूंचा बंदोबस्त करण्यात गुंतलं होतं.
 
वेल्ली हे श्रीमंतांना लुटत असले तरी गरीबांना आणि गरजूंना त्यातून मदत करत असल्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदराची भावनाही होती.
 
अर्जन वेल्ली यांचा मृत्यू
गुरप्रीत सिंह हेही अर्जन वेल्ली यांच्याच कुटुंबातील एक आहेत.
 
अर्जन वेल्लींना पकडण्यासाठी ब्रिटीश पोलिसांनी त्यांचे खबरी पेरले होते.
 
ते पुढे सांगतात, “त्यांनी व्यवस्थित योजना तयार केली. अर्जन वेल्ली आणि त्यांचे सहकारी रुप सिंह हे डल्ला गावामध्ये एका रात्रीपुरते थांबले होते.
 
ब्रिटीशांच्या खबऱ्यांना या दोघांनाही विष देण्यात यश मिळालं. आपला मृत्यू समोर दिसत असताना या दोघांनी तडफडत मरण्यापेक्षा एकमेकांना गोळी घालत मृत्यूला पत्करलं.
 
जगराज सिंह सांगतात, “ही माहिती जेव्हा पोलिसांपर्यंत पोहोचली, तेव्हा पोलिसांनी या जागेला वेढा दिला. त्यांनी गोळीबार केला आणि अर्जन तसंच त्यांचा साथीदार यामध्ये मृत्यूमुखी पडल्याचं म्हटलं.”
 
“पोलिसांनी आसपासच्या गावातील गावकऱ्यांना मारहाण करून गोळा केलं. त्यांच्यावर दबाव आणला. अर्जन यांच्यावर जे सरकारी इनाम होतं, त्यासाठई हा सगळा बनाव होता. पण त्यात यश आलं नाही. कारण जेव्हा शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा अर्जन यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचं स्पष्ट झालं.”
 
आताच्या तरुण पिढीला अर्जन वेल्लीचं नाव हे या सिनेमामुळे माहीत झालं.
 
बुटा सिंह हा गावातला तरुण मेकॅनिकल इंजिनिअर आहे. तो म्हणतो की, आमच्या गावाचं नाव या सिनेमामुळे चर्चेत आहे.
 
अर्जन वेल्लींबद्दलचा अजून एक दावा
अॅनिमल सिनेमामधल्या अर्जन वेल्ली या गाण्याची चर्चा सुरु झाल्यानंतर लुधियाना जिल्ह्यातल्या रुरका गावातील एका कुटुंबाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि अर्जन वेल्ली हे आपले पणजोबा असल्याचं म्हटलं होतं.
 
बीबीसीने जोगिंदरपाल सिंह विर्क यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. ते कॅनडामध्ये राहतात.
 
जोगिंदरपाल यांनी सांगितलं की, त्यांचे चुलतभाऊ प्रीतपाल सिंह विर्क हे रुरका गावामध्ये राहतात.
 
विर्क यांच्या माहितीनुसार अर्जन वेल्ली हे साडे सहा फूट उंचीचे होते आणि त्यांनी कधीच कोणाचा आदर केला नाही.
 
आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जोगिंदरपाल सिंह विर्क यांनी म्हटलं होतं की, अर्जन वेल्ली यांना गंडासा बाळगण्याचा शौक होता.
 
“एका गरीब माणसाला त्रास देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा हात त्यांनी मोडला होता. त्यांच्या स्वभावामुळे लोक त्यांना ‘वली’ म्हणून ओळखायला लागले.”
 
रुरका गावातील अर्जन यांचे ‘वारस’ सांगतात की, त्यांनी भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान अनेक मुस्लिमांची मदत केली होती, अनेकांना त्यांनी मलेरकोटलाला सोडलंही होतं.
विर्क सांगतात, “त्यांपैकी एक त्यांचा मुस्लिम मित्र राल्ला तेली हा होता. त्यांना अर्जन यांनी पूर्ण सुरक्षेमध्ये मलेरकोटलापर्यंत पोहोचवलं होतं. त्याचे पैसे, सोनं-नाणं त्यांनी स्वतःकडे सुरक्षित ठेवलं. नंतर त्याचा मुलगा सरदार खान येऊन ही सगळी संपत्ती घेऊन गेला.”
 
रुरकामधील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जन यांनी 1968 मध्ये पटियाला इथल्या राजिंदर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. तिथे त्यांचं पित्ताशयाचं ऑपरेशन झालं होतं.
 
अर्थात, या दोन्ही गावांतील लोकांनी अर्जन वेल्लींबद्दल केलेल्या दाव्यांना कोणत्याही पुस्तकातून किंवा कागदपत्रांमधून लिखित स्वरुपातला दुजोरा मिळत नाही.
 
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अर्जन यांची हकीगत गोष्टी-गाण्यांच्या रुपातूनच सांगितल्या गेल्या.
 
भूपिंदर बब्बल ज्यांनी हे गाणं गायलं आहे, त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, अर्जन वेल्ली ही कोणी एक व्यक्ती नाहीये. ती पंजाबमधल्या गावागावांमधली अशी व्यक्ती आहे, जी अन्यायाविरोधात उभी राहिली. त्यामुळे असे अनेक अर्जन तुम्हाला सापडू शकतील.”
 
Published By- Priya DIxit