शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (21:34 IST)

महेश मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा..'च्या ट्रेलरवर महिला आयोगाचा 'हा' आक्षेप

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा नवीन सिनेमा 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सिनेमाच्या ट्रेलरमधील काही दृश्यांवर आक्षेप घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला याबाबत पत्र लिहिलं आहे.
 
दिवंगत ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. येत्या 14 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
हा सिनेमा मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर आधारित असल्याचं समजतं. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
 
सिनेमातील काही लैंगिक दृश्य सेंसॉर करण्याचं त्यांनी आपल्या पत्रात सुचवलं आहे.
 
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
10 जानेवारीला या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यात काही आक्षेपार्ह दृश्य असून हा ट्रेलर इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसून येत आहे.

अल्पवयीन मुलांसाठीही ही दृश्य उपलब्ध आहे. राष्ट्रीय महिला आयोग याचा निषेध करत असल्याचंही पत्रात म्हटलं आहे.
आयोगाने म्हटलंय, माहिती व प्रसारण मंत्रालयाने याची दखल घ्यावी आणि अशी दृश्य सेन्सॉर करावीत. अशाप्रकारची आक्षेपार्ह दृश्य खुल्या पद्धतीने प्रसारित करण्यावरही आयोगाने आक्षेप घेतला आहे.
या पत्राची एक प्रत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनाही पाठवण्यात आली आहे.
 
महेश मांजरेकर यांनी या सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे.
 
यापूर्वी महेश मांजरेकर यांनी 2 ऑक्टोबर 2020 रोजी महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीच्या दिवशीच, नथुराम गोडसेवर चित्रपट तयार करण्याची घोषणा केली. यावरूनही त्यांच्यावर टीका करण्यात होती.