आमिर खान आता नव्या चेहर्याच्या शोधात
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान सध्या नव्या चेहर्याच्या शोधात आहे. आमिर खान प्रॉडक्शन हाऊस आपल्या आगामी सिनेमासाठी एका तरुण मुलीचा शोध घेत आहेत. ट्विटरवर याबाबत पोस्टर अपलोड करुन आमिरने उत्सुक तरुणींना संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.
आमिर खान प्रॉडक्शनला 12 ते 17 वर्षाच्या तरुणीची गरज आहे, जी गाणंही गाऊ शकते. आपल्या आवडतं हिंदी गाणं गाताना व्हिडिओ-ऑडिओ रेकॉर्ड करा आणि Castingakfilms.com या ईमेलवर पाठवा, असे आवाहन आमिरने ट्विटरद्वारे केले आहे. शिवाय, हिंदीमध्ये थोडक्यात स्वत:बद्दल माहितीही पाठवण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर, आई किंवा वडिलांची स्वाक्षरी असलेलं एक पत्रही ईमेलसोबत जोडण्यास सांगितलं आहे. आमिर खान प्रॉडक्शनची सुरुवात 2001 मध्ये झाली आहे आणि सिनेसृष्टीत नवनवे चेहरे आणण्यासाठी आमिर खान प्रॉडक्शन ओळखलं जातं.

