रखडलेल्या ’शिवाय’ची गाडी रुळावर
अभिनेता अजय देवगणचा दिग्दर्शक म्हणून महत्त्वाकांक्षी असलेला चित्रपट ‘शिवाय’बाबतची अनिश्चितता अखेर संपली आहे. येत्या आठवड्यात म्हणजे दिवाळीपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. ‘शिवाय’ चित्रपटाचं पहिलं शेड्यूल मसुरी आणि आजूबाजूच्या निसर्गरम्य परिसरात पार पडणार आहे. त्यानंतर हैदराबाद आणि बल्जेरियामध्ये चित्रपटातील महत्त्वपूर्ण दृश्यांचं चित्रीकरण होईल. ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांची नात, साईशा सैगल या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मोठ्या पडद्यावर साईशा आणि अजयला रोमान्स करताना पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
चित्रपटाचं शूटिंग गेल्या वर्षी कॅनडामध्ये होणार होतं. अजय सिनेमाच्या संपूर्ण कास्ट आणि क्रूसह कॅनडातील बर्फाळ भागाला भेटही देऊन आला, मात्र हिमवृष्टीबाबत असमाधानी असल्याने अजयने कुठल्याही तडजोडीविना एकही दृश्य चित्रित न करता परतण्याचा निर्णय घेतला. बल्जेरियामध्ये सिनेमाचं शूटिंग करण्याचं निश्चित झालं. मात्र ‘दृष्यम’च्या शूटिंगमुळे आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटावर लक्ष केंद्रित करणं अजयला जमलं नाही. इतर सर्व चित्रपटांचं काम आटोपल्यानंतरच ‘शिवाय’साठी वेळ काढण्याचं अजय देवगणने ठरवलं आहे.