बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...
Written By चंद्रकांत शिंदे|
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2010 (16:27 IST)

वडिल म्हणाले, मनमोकळेपणाने काम कर- अभिषेक बच्चन

PR
PR
अमिताभ बच्चन यांनी छोट्या पडद्यावरील सुत्रसंचालनात मानदंड प्रस्थापित केला आहे. आता त्यांचा पुत्र अभिषेक बच्चन छोट्या पडद्यावर पदार्पण करतो आहे. नॅशनल बिंगो नाईट गेम शो असे या कार्यक्रमाचे नाव असून कलर्स वाहिनीवरून तो प्रक्षेपित केला जाणार आहे. यासंदर्भात अभिषेकशी साधलेला हा संवाद....

पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर येत असलेला अभिषेक या कार्यक्रमाविषयी खूप उत्सुक आहे. तो म्हणतो, गेल्या अनेक वर्षांपासून मला अनेक चॅनेल्सकडून सूत्रसंचलनाविषयी विचारणा होत होती. पण यापैकी कोणत्याही कार्यक्रमाची संकल्पना मला आवडली नाही. पण कलर्सची प्रोग्रॅमिंग हेड अर्श्विनी यार्दी व फॉक्स स्टुडीओचे व्यवस्थापकीय संचालक नचिकेत पंतवैद्य यांनी बिंगो शो विषयी मला सांगितले. मला हा कार्यक्रम आवडला. तो परदेशात लोकप्रिय असल्याचेही कळाले. या दोघांनाही मला या शोचे भारतीयीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. ही संकल्पनाच मुळात मला आवडली होती. म्हणूनच मी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालकत्व स्वीकारायला होकार दिला.

हा कार्यक्रम काय आहे हे सांगताना अभिषेक म्हणाला, हा थोडा वेगळा 'गेम शो' आहे. यात प्रेक्षकही खेळू शकतात. हा आकड्यांचा खेळ आहे. अनेक ठिकाणी घराघरांत हा खेळ खेळला जातो. याचे भारतीयीकरण करताना त्याला नृत्य, मनोरंजन आणि विनोदाची फोडणी दिली आहे. या कार्यक्रमात दोन सेलिब्रेटी सहभागी होतील. त्यांच्यासोबत स्टुडीओत असणारे आणि बाहेर कार्यक्रम पाहणारे प्रेक्षकही सहभागी होऊ शकतील. त्यांना एक तिकीट दिले जाईल. त्यावर एक नंबर असेल. या कार्यक्रमातून आम्ही निवडक नंबर काढू. कोणत्याही लाईनमध्ये पाच नंबर आल्यानंतर त्याला बक्षिस दिले जाईल. पण तत्पूर्वी त्याला काही प्रश्न विचारले जातील. त्याची योग्य उत्तरे दिल्यानंतरच हे बक्षिस दिले जाईल.

या शोमध्ये अमिताभ बच्चन, शाहरूख खान, फरहान अख्तर, किरण खेर, अर्शद वारसी, विद्या बालन यांच्यासह विंदू दारासिंह, प्रवेश राणा यांनाही आणण्यात येणार आहे. शनिवारी रात्री जेवता जेवता हा कार्यक्रम पाहता येईल. शिवाय पैसेही जिंकतील.

कार्यक्रमात ऐश्वर्या राय-बच्चन व जया बच्चन याही दिसतील काय असे विचारले असता, 'आम्ही तेरा भाग चित्रित केले आहेत. त्या त्या नाहीत. पण पुढच्या भागात कदाचित त्या असतीलही असे उत्तर अभिषेकने दिले.

या शोसाठी अमिताभ यांच्याकडून काही टिप्स मिळाल्या काय? या प्रश्नावर अभिषेक म्हणाला, त्यांनी आपल्याला हा शो खूप चांगला असल्याचे सांगून मनमोकळेपणाने काम कर. तसे केल्यास सगळे काही सुलभपणे होईल, असे सांगितले. या कार्यक्रमाची संकल्पना मला पूर्णपणे कळल्याने काम करणे सोपे गेले.

असे कार्यक्रम महत्त्वाचे असतात की सुत्रसंचालक या प्रश्नावर 'दोन्ही' असे उत्तर देऊन 'दोन्ही गोष्टी परस्पर पूरक असाव्यात. संकल्पना चांगली असूनही सुत्रसंचालक चांगला नसेल तर काहीही उपयोग होत नाही. पण सुत्रसंचालक चांगला असूनही संकल्पना चांगली नसेल तरीही काही उपयोग होत नाही' याकडे अभिषेकने लक्ष वेधले.

आता आपल्या वडिलांनी आराम करावा असे वाटत नाही काय? या प्रश्नावर, मलाच काय घरच्या सगळ्यांनाच त्यांनी आता विश्रांती घ्यावी असे वाटते आहे, असे सांगून अभिषेक म्हणाला, गेल्या चाळीस वर्षांपासून ते काम करताहेत. पण या वयातही नवीन काही शिकण्याचा त्यांचा उत्साह आहे. म्हणून तर 'पा'सारखी भूमिका साकारायला ते तयार झाले. मुलगा म्हणून त्यांनी आता विश्रांती घ्यावी असे वाटते, पण चाहता म्हणून त्यांचे चित्रपट दर शुक्रवारी प्रदर्शित व्हावे असेही वाटते.