शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...
Written By अभिनय कुलकर्णी|

अभिनयाला वाव असणारेच चित्रपट करेन- सागरिका

IFM
IFM
'चक दे इंडिया'नंतर सागरिका घाटगे ही मराठी मुलगी कुठे गायब झाली ते कळतच नव्हते. पण तब्बल दोन वर्षांनंतर सागरिका पडद्यावर पुन्हा दिसली ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फॉक्स'मध्ये. या चित्रपटात तिने सणसणीत अभिनय करत रूपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. 'केवळ छान छान दिसणे आणि हिरोभोवती बागडणे याला आपण अजिबात प्राधान्य देत नाही. अभिनयाला वाव असेल तरच चित्रपट स्वीकारते,' असे स्पष्टपणे सांगणार्‍या या अभिनेत्रीशी मारलेल्या या गप्पांचा गोषवारा...

'फॉक्स'पूर्वी दोन वर्षे तू कुठे होतीस?
- दोन वर्षांचा ब्रेक करीयरमध्ये पडला खरा. असा ब्रेक घेण्याची माझी नक्कीच इच्छा नव्हती. पण नशीबानेच दोन वर्षे रूपेरी पडद्यापासून दूर नेले. तरीही त्यानंतर फॉक्समधून मी पुन्हा आलेय. 'चक दे इंडिया' पाहिलेला प्रेक्षकवर्ग माझा हाही चित्रपट पाहिल अशी अपेक्षा आहे. पहिला चित्रपट हिट दिल्याने लोकांच्याही माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत.

'चक दे इंडिया'नंतर एकदम थ्रिलर चित्रपट का स्वीकारलास?
कारण त्यानंतर मला कायम खेळाडूच्या भूमिका करण्यात अजिबात रस नव्हता. चक दे नंतर अशा अनेक भूमिका माझ्याकडे आल्या. पण मी त्यांना नकार दिला. फॉक्समध्ये मला वाव आहे, असे मला वाटले, शिवाय भूमिकाही वेगळी होती. त्यामुळेच मी तो साईन केला.

ग्लॅमर नसलेली भूमिका स्वीकारण्यामागे काय हेतू होता ?
'चक दे' नंतर ग्लॅमरस भूमिका माझ्याकडे बर्‍याच येत होत्या. पण फॉक्समधलं ग्लॅमर वेगळं आहे. इथे एक पक्की स्टोरीलाईन आहे, त्यावरूनच पुढे जायचं आहे. त्यामुळे ग्लॅमरला मर्यादीतच वाव होता. संपूर्ण चित्रपट थ्रिलर आहे. यात माझ्या ग्लॅमरपेक्षाही अभिनयाचा कस लागला होता. केवळ हिरोभोवती नाचत फिरण्याची ही भूमिका नव्हती. म्हणूनच मी हा चित्रपट स्वीकारला.

'चक दे' नंतरचा मधला काळ कसा गेला?
नक्कीच. पण या काळाने मला खूप काही शिकवले. ग्लॅमरच्या जगातील अनेक गोष्टी या काळात उलगडल्या. माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. 'चक दे' मध्ये मी पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले. तोपर्यंत मला अभिनयाचा काहीही गंध नव्हता. पण आजही मी अगदी नवोदित असले तरी मला त्यातल्या काही एक गोष्टी माहित झाल्या आहेत. हा सगळा अनुभव मला संपन्न करणारा ठरला.

हा तुझा दुसरा चित्रपट. यातला अभिनय कसा झाला तुला वाटते?
हे मीच सांगणे अवघड आहे. आता लोकांनीच तो बघून मला सांगायला हवे की चांगला झाला की वाईट. मात्र, माझ्या या अल्पशा कारकिर्दीत मी टिपीकल नायिकेच्या भूमिकेऐवजी वेगळे काही तरी करण्याचे धाडस केले आहे. केवळ छान छान दिसणे यापलीकडे काही अस्तित्व नायिकेला असले पाहिजे असे मला वाटते. म्हणूनच मी अभिनयाला वाव देणारा चित्रपट स्वीकारला. या चित्रपटातही मी वकिल असले तरी त्या भूमिकेलाही बरेच कंगोरे आहेत.

अर्जुन रामपालने तुला बरीच मदत केली असेल?
- सगळ्याच कलावंतांनी मला मदत केली. त्यातही अर्जुनबरोबर माझे सीन जास्त होते. त्यामुळे त्याच्याबरोबरच माझे एकत्र शॉट्स बरेच झाले. या काळात त्याने बरीच मदत केली. पण त्याशिवाय सनी देओलसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याबरोबरही काम करण्याचा अनुभव मिळाला. उदिता गोस्वामीबरोबर फार काही सीन नव्हते.

'चक दे'च्या अनुभवाचा फायदा 'फॉक्स'मध्ये कितपत झाला?
- नक्कीच काही प्रमाणात झाला. पण हे दोन्ही वेगळे चित्रपट आहेत. चक दे हा पूर्णपणे क्रीडा केंद्रीत चित्रपट होता, तर फॉक्स थ्रिलर. पण मधल्या काळात अभिनयाविषयी वाढलेली माझी जाणीव फॉक्समध्ये दिसून येईल. चक दे आज पाहिल्यानंतर मला असं वाटतं की माझे यातले प्रसंग आता केले तर नक्कीच आणखी चांगले करता येतील. शेवटी अभिनयात तुम्ही दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध आणि पक्व होत जाता हेच खरं.