लेखक श्री. विलास भि. कोळी यांचे “वाडा” हे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. आणि न राहवून पुस्तकाविषयी लिहावं वाटलं. जुन्या वाड्यामधील इलीमेंट्सला बोलतं करणं या पुस्तकाचा विहार आहे. सुरुवातीची काही पाने वाचली की एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केल्याचे जाणवते.
जुन्या पिढीतील बांधकामे आणि आत्ताच्या इंजिनिअरिंगला लाजवेल असे त्या काळात वापरलेले तंत्र याचा उलगडा वाडा पुस्तकांत आहे. कसे काढत असत पूर्वी क्वांटीटी व इस्टीमेट. का जाणवतो वाड्यात शिरल्याबरोबर उन्हाळ्यात थंडावा आणि हिवाळ्यात उष्णता. कसे ओळखत पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी दगड व कोणता दगड कोठे वापरत. का करत दगडी जमीन सर्वात शेवटी. का वापरले आपल्या पूर्वजांनी दगडासारखे चिरस्थायी माध्यमच. का घेत होते वाड्याचे जोते कमरेइतके उंच. का सोडत होते वाड्यात मध्यभागी मोकळी जागा. का लावल्या जात जोत्याला गोल रिंगा. का लागत नव्हती पूर्वी लाकडांना वाळवी. का पाजले जाई लाकूड कामाला बिब्ब्याचे, बेलाचे व जवसाचे तेल. कशी असायची कारागिरांची कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजन.
सडासारवण, रांगोळी, पुष्करणी, कारंजे, भक्कम लाकडी दरवाजे, उंबरा, दगडी चौक, माजघर, ओसरी, पाटाईचं छत, कडीपाटा चे छत, लग, तुळ्या, खण, सर, हस्त, खुंटी, कोनाडे, देवड्या, देवळी, कडी कोयंडे, बिजागऱ्या, कमानीच्या खिडक्या, अडसर, कारंजे, तळखडे, महिरपी, गणेशपट्टी, हंड्या-झुंबर, पाणीपट्टी, नळीची कौले, खापरी कौले, भित्तीचित्र ही वाड्याची वैशिष्ठे. हे शब्द काही वर्षानंतर ऐकायला देखील मिळणार नाहीत. अशा कितीतरी घटकांची माहिती आणि त्यांचे त्याकाळातील महत्व या पुस्तकांत आहे. एकूण ६० प्रकरणांमधून याविषयीची माहिती लेखकाने दिली आहे. जे हजार शब्दांत सांगता येत नाही ते १ फोटो सांगून जातो. त्यामुळे फोटोंचा वापर केलेला आहे.
बांधकाम स्थापत्यामध्ये असलेले बारकावे इतक्या अभ्यासू वृतीने लेखकाने पाहिले आहेत की कलाकारांची दृष्टी, तत्त्वज्ञान आश्चर्यचकित करून टाकतात. ज्यावेळी वाडे बांधले गेले असतील तेव्हां त्यांचा जो काही थाट असेल तो वेगळाच असणार. दगड, विटा, भेंडे, चुना, सागवान, शिसम वापरून बांधलेला वाडा जो आजही उत्तम प्रकारे दिमाखात उभे आहेत. असे वाडे पहायला स्थपती, वास्तुविशारद, इतिहासकार, अभ्यासक, पर्यटक, दुर्गप्रेमी, मूर्तिकार, फोटोशूट, शुटींगसाठी लोक भेटी देत असतात. आजही चित्रपट, मालिका जुन्या वाड्याशिवाय परिपूर्ण होऊच शकत नाहीत, हे विशेष आणि अभ्यास करण्यासारखे आहे तसेच हे पुस्तक नव्या पिढीला आयडॉल ठरेल. हे लेखकाला इथे सांगावेसे वाटते.
दगडात-लाकडात जीव ओतून काम करणं, त्यातून सुंदर कलाकृती घडवणं आकारहीन दगडांना वेगवेगळे रूपं देण मुळीच सोप नसतं. पाथरवट, वडार, बेलदार आपल्या कलाकुसरीतून वर्षानुवर्षे ही कला घडवत आहेत. वास्तू वैभव उभे आहे ते कलाकारांच्या हातून घडत असलेल्या कलेमुळे. ही कादंबरी प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनपर्यंत पोचावी, ते कलाकार म्हणजे स्थपती, वास्तुविशारद, वडार, बेलदार, पाथरवट, सुतार, गवंडी, बारा बलुतेदार, रंगारी, चितारी, इतिहास घडवणारे अशी हरहुन्नरी माणसे यांनीच जर वाडा पुस्तक वाचले नाही तर याचा खेद आहे. पुस्तक वाचून ते लोक अचंबित होतील. हे पुस्तक त्यांना विचार करायला लावेल. हेच लेखकाचे हाशील असणार आहे.
पुस्तक: वाडा
लेखक: विलास भि. कोळी
प्रकाशन: शॉपिज़न प्रकाशन
किंमत: 239/-
- साक्षी कोळी