सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. संवाद
  4. »
  5. मुलाखत
Written By वेबदुनिया|

सृजनातून निर्मितीचा आनंद- अमरजीत सिंग

- हरेकृष्ण शर्मा

WD
कला जन्मजात असते, परंतु पुढे तिचा विकासही व्हायला हवा. आपल्यातल्या कलेची जाणीव एकदा झाली की ती कधी स्वस्थ बसू देत नाही. निर्मितीचे धुमारे सतत फुटायला लागतात. सृजन आकार घेऊ लागते. यातून सुखाची, आनंदाची अनुभूती येते, असे मत पंजाबमधील भटिंडा येथील ख्यातनाम चित्रकार अमरजीत सिंग यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी जीवनातील अनेक अनुभव कॅनव्हासवर जिवंत केले आहेत. सध्या त्यांनी गुरु नानक यांचे चित्र रेखाटले आहेत ते अतिशय मनमोहक आहे. सध्या ते श्री गुरू ग्रंथ साहिब या शीखांच्या पवित्र धर्मग्रंथावर आधारित चित्रांची मालिका साकारत आहेत. अमरजीत सिंग यांच्या चित्रकारीतेच्या वाटचालीविषयी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात....

प्रश्न : चित्रकारीतेकडे आपण कसे वळलात?
उत्तर : प्रत्येकात नाजूक भावना असतात. कलेची भावनाही अशीच नाजूक आहे. ती माझ्यात उपजतच होती. फक्त तिचा विकास करण्यासाठी गुरूची आवशक्यता होती. जीवनाच्या प्रवासात सुख दु:खाच्या माध्यमातून ही कला आपोआपही विकसित होत असते. माझे मामा रवींद्रसिंग मान हे ही एक महान चित्रकार आहेत. माझ्यात असलेला चित्रकार त्यांनी ओळखला आणि या क्षेत्रात करियर करण्यास प्रोत्साहन दिले. तेव्हा मी आठव्या इयत्तेत होतो. मी त्यांना गुरू मानतो. त्यांच्याकडे मी चार ते पाच वर्षे प्रशिक्षण घेतले. भटींडा येथे आल्यानंतर मी खर्‍या अर्थाने चित्रकारीतेला सुरवात केली.

प्रश्न : जीवनात कलेला खूप महत्त्व आहे, आपल्याला काय वाटते?
उत्तर : कला ही नाजूक भावना आहे. त्यामुळे कलेला जीवनात खूप महत्त्व आहे. आपले जीवन हे सुख- दु:खाचे भांडार आहे. सुखामागून दु:ख व दु:खामागून सुख असे हे चक्र नेहमी सुरू असते. त्यामुळे कला ही अशी शक्ती आहे की, ती या दोन्ही अवस्थांत मदत करत असते. कलेमुळे मनशांती मिळत असते.

प्रश्न : आतापर्यंत आपण कोण कोणती चित्रे रेखाटली आहेत?
उत्तर : मी आतापर्यंत भरपूर चित्र रेखाटली. सध्या मी गुरु ग्रंथ साहिब ही मालिका करतो आहे. या मालिकेतील चित्रांचे बर्‍यापैकी काम झालेले आहे. मात्र, हा प्रोजेक्ट मोठा असल्याने आणखी त्याला वेळ लागणार आहे. गुरु साहिबवर काम झालेले आहे. परंतु, गुरूवाणी दर्शनावर अजून काही विशेष काम झालेले नाही. भविष्यात 'गुरूवाणी दर्शन'वर कार्य करण्याचे प्रयत्न सुरू आहे. या व्यतिरिक्त मी प्रसिध्द लेखकांची ही चित्र मालिका सुरू केली आहे. त्यातील जवळपास 150 चित्रे तयार आहेत. बाबा फरीदजी, सूफी कवी, बुल्ले शाह, शाह हुसेन, फजल शाह यांच्यासह आताच्या अमृता प्रीतम, प्रो. मोहनसिंग, गुरबख्श सिंग प्रीतलडी, शिवकुमार बटालवी, अवतारसिंग पाश, ईश्वरचंद्र नंदा यांचे चित्र ही रेखाटण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.

प्रश्न : पंजाबचे कवी, साहित्यिक व संत मंडळींवर चित्र रेखाटण्याची प्रेरणा आपल्याला कोणाकडून मिळाली?
उत्तर : मी उच्चशिक्षण घेऊ शकलो नाही. परंतु, मला लहानपणापासूनच पुस्तके वाचण्याची आवड आहे. साहित्यिकच समाज तयार करतो असते, असे माझे मत आहे. साहित्यिक हा समाजाचे महत्वपूर्ण अंग आहे. मी ज्यांना वाचतो, त्यांच्याकडून प्रेरित होता, त्यांना रेखाटण्याचा विचार माझ्या मनात येत असतो. भविष्यात देशातील सगळ्यात मोठ्या साहित्यिकाचे चित्र रेखाटण्याचा माझा मानस आहे.

प्रश्न : मुंबई हल्ल्यात मकबूल फिदा हुसेन यांनी साकारलेल्या चित्राचे नुकसान झाले, आता ते पुन्हा चित्रित करत आहेत? याबाबत आपण काही सांगाल?
उत्तर : मुंबई येथील हॉटेल ताजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला तर जगविख्यात चित्रकार फिदा हुसेनच्या चित्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हुसेन साहेब यांचे चित्र पुन्हा रेखाटले जात आहे, ही आनंदाचे गोष्ट आहे. मी एवढेच म्हणेन की कला कधीच मृत होत नसते.

प्रश्न : आपले प्रदर्शित झालेले चित्र व सरकारकडून त्याला मिळालेल्या पुरस्काराविषयी काही सांगाल?
उत्तर: मी रेखाटलेल्या कलाकृतीचे पंजाबमध्ये प्रदर्शन सुरूच असते. सरकारकडून मिळालेल्या सन्मानापेक्षा नागरिकांकडून मिळणारे प्रेम हे लाखमोलाचे आहे. तोच मला मिळालेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे.

प्रश्न : नवोदित चित्रकारांना आपण कुठला संदेश द्याल?
उत्तर : प्रत्येकाला उदरनिर्वाह करण्यासाठी काही ना काही करावेच लागते. मात्र, कला ही निस्वार्थ हेतूने केल्यानंतरच प्रगती होत असते. मी नवोदित चित्रकारांना एवढेच सांगेन की, कलेचा झरा वाहता ठेवला पाहिजे. चित्रकारीतेत सातत्य नेहमी ठेवले पाहिजे.