1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (17:15 IST)

अजय जडेजा : मॅच फिक्सिंगचा वाद, 5 वर्षांची बंदी आणि आता अफगाणिस्तानच्या टीमचे मेंटॉर

ajay jadeja
अफगाणिस्तानने सोमवारी (23 ऑक्टोबर) क्रिकेट वर्ल्डकपच्या सामन्यात पाकिस्तानला आठ विकेटनं पराभूत केलं. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
 
यात भारताचे माजी क्रिकेटपटू अजय जडेजा एका प्रश्नाचं उत्तर देताना दिसत आहेत.
 
"म्हणूनच तुम्ही म्हणत आहात की अफगाणिस्तान लहान संघ आहे, ज्यादिवशी ते पराभव करतील, त्यादिवशी मोठा संघ ठरतील," असं यात अजय जडेजा म्हणत आहेत.
 
अफगाणिस्तानचा संघ मोठ्या संघांना अगदी जवळ येऊही पराभूत करण्यात अपयशी ठरतो? असा प्रश्न अजय जडेजा यांना विचारण्यात आला होता.
 
अफगाणिस्ताननं आता दोन मोठ्या संघाचा पराभव केला आहे. 15 ऑक्टोबरला या संघानं गतविजेत्या इंग्लंडचा 69 धावांनी पराभव केला.
 
अफगाणिस्तानच्या या आश्चर्यकारक कारनाम्याची चर्चा सुरुच होती, तोवर या संघानं पाकिस्तान सारख्या संघालाही लोळवलं.
 
1992 मध्ये वर्ल्डकप जिंकलेल्या पाकिस्तानचा संघ गेल्या काही दिवसांपर्यंत वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होता. पाकिस्तानच्या या संघात अगदी 11 व्या क्रमांकापर्यंत स्टार क्रिकेटपटू आहेत.
 
सात वर्षांनंतर भारतीय भूमीवर पाय ठेवल्यानंतर या संघाचं ज्याप्रकारे स्वागत करण्यात आलं त्याची चर्चा होतीच, पण त्याचबरोबर लंच-डिनरमधील खाद्य पदार्थदेखील चर्चेचा विषय बनले होते.
 
दुसरीकडं अफगाणिस्तानला 14 ऑक्टोबरपर्यंत क्रिकेट वर्ल्डकपमध्ये खेळणारा असा संघ समजलं जात होतं, ज्याच्या विरोधात खेळणाऱ्या संघाला दोन गुण मिळणार हे जवळपास नक्की असेल.
 
   एकीकडं इंग्लंडच्या विरोधात अफगाणिस्ताननं गाजवलेला पराक्रम म्हणजे स्पर्धेतील मोठा उलटफेर असल्याचं तज्ज्ञ म्हणत होते. पण तेच सर्व तज्ज्ञ आता पाकिस्तान विरोधातील त्यांच्या विजयानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वातील या संघाच्या कौशल्यावर फिदा झाले आहेत.
 
पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा विजय केवळ उलटफेर म्हणून मर्यादित ठेवता येणार नाही. कारण त्यांची कामगिरी एवढी कमालीची होती की, संपूर्ण सामन्यात त्यांनी कधीही पाकिस्तान डोकं वर काढूच दिलं नाही.
 
बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग या तिन्ही आघाड्यांवर अफगाणिस्तानच्या टीमने बाबर आझमच्या पाकिस्तानी संघाला पछाडल्याचं पाहायला मिळालं.
 
या विजयाचा जल्लोष एवढा आहे की, चेन्नईपासून ते दिल्ली, इस्लामाबाद आणि काबूलपर्यंतही त्याचा आवाज घुमतोय. कारण विजयानंतर जसा चेन्नईच्या मैदानावर डान्स झाला तसेच काबूलमध्येही चाहते थिरकल्याचं पाहायला मिळालं.
 
या सर्व धामधुमीत सर्वाधिक वेळा नाव घेतलं गेलं ते अजय जडेजा यांचं. कारण अफगाणिस्तान हा एक मोठा संघ असल्याचं त्यांनी खूप आधीच जाहीर करून टाकलं होतं.
 
एका वादानंतर अजय जडेजा यांची क्रिकेट कारकीर्द अवेळी संपुष्टात आली होती. पण अफगाणिस्तानच्या संघात नवे प्राण फुंकल्याचं क्षेय त्यांनाच दिलं जात आहे.
 
सचिन तेंडुलकरने केले कौतुक
अजय जडेजा हे नाव भारतीय क्रिकेटसाठी काही अनोळखी नाही.
 
1992 मध्ये भारतीय संघासाठी पहिला वन डे सामना खेळणारे अजय जडेजा 2000 पर्यंत भारतीय संघाचा नियमित भाग होते. सध्या ते अफगाणिस्तानच्या संघाच्या मेंटरच्या भूमिकेत आहेत.
 
अफगाणिस्तानच्या संघाच्या गेल्या तीन सामन्यांतील दुसऱ्या विजयानंतर भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार सचिन तेंडुलकर यांनीही सोशल प्लॅटफॉर्म एक्सवर जडेजा यांचं कौतुक केलं आहे.
 
"या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानची कामगिरी उत्तम होत आहे. फलंदाजांमध्ये शिस्त पाहायला मिळत आहे. धावांसाठी वेगानं पळताना पाहून ते घेत असलेल्या परिश्रणाची जाणीव होते. कदाचित हे सर्व काही मिस्टर अजय जडेजाच्या प्रभावामुळंच होऊ शकलं असले," असं सचिन यांनी पोस्ट केलं.
 
सचिन तेंडुलकर यांनी मांडलेल्या या मतामध्ये सर्वांनाच सत्यता जाणवत आहे. त्याला कारणही तसंच आहे. सचिन तेंडुलकर असे खेळाडू आहेत ज्यांनी अफगाणिस्तानचे सध्याचे मेंटर जडेजा यांच्याबरोबर ड्रेसिंग रूम शेअर केली आहे.
 
चेस मास्टर अजय जडेजा
जडेजा जवळपास आठ वर्ष भारतीय संघाचे नियमित सदस्य होते. 1992 ते 2000 दरम्यान जडेजा यांनी फक्त 15 कसोटी सामने खेळले, पण त्याच दरम्यान 196 वनडे सामन्यांत त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं.
 
मैदानावर कायम हसमुख असलेले जडेजा त्यांच्या चपळतेमुळं भारतीय संघातील सर्वात लोकप्रिय खेळाडुंपैकी एक होते. चाहते त्यांना 'मिस्टर चार्मिंग' म्हणायचे. अनेक चाहते सामना नव्हे तर जडेजा यांना पाहण्यासाठीच येतात, असे दावे त्यावेळी केले जायचे.
 
तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर त्यांनी अनेक सामन्यांची दिशा बदलून टाकली.
 
जडेजा यांनी 41 सामन्यांत सलामीला फलंदाजी केली. पण त्यांची अधिक चर्चा झाली ती मधल्या फळीतील फलंदाज म्हणून.
 
युवराज सिंग, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीचा काळ सुरू होण्याच्या खूप पूर्वी अजय जडेजा हेच टीम इंडियाचे 'चेस मास्टर' आणि 'बेस्ट फिनिशर' म्हणून ओळखले जात होते.
 
पाकिस्तानवरील अफगाणिस्तानच्या विजयानंतर 1996 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलचे व्हिडिओ फुटेज अजूनही व्हायरल आहे. त्यात अजय जडेजा पाकिस्तानचे स्पीडस्टार वकार युनूस यांच्या गोलंदाजीवर षटकार खेचताना दिसतात.
 
त्या सामन्यात जडेजा यांनी 25 चेंडूंमध्ये 45 धावा केल्या होत्या. ट्वेंटी-20 फॉरमॅट येण्यापूर्वी खेळलेली ही खेळी 'गेम चेंजर' ठरली होती आणि त्यामुळंच ती खेळी पाहणारे आजही त्याचा उल्लेख करत असतात.
 
वनडेमध्ये अजय जडेजा यांच्या नावावर सहा शतकं आणि 30 अर्धशतकंही आहेत.
 
कर्णधार म्हणूनही कमाल
अजय जडेजा हे चांगले मीडियम पेसरही होते. त्यांनी वनडेमध्ये 20 विकेट घेतल्या होत्या. मैदानावर क्षेत्ररक्षणाच्या जोरावरही त्यांनी अनेक सामन्यांत भारताला आघाडी मिळवून दिली होती.
 
त्यांच्यामध्ये एका चांगल्या कर्णधाराची झलकही पाहायला मिळत होती. अजय जडेजा यांनी 13 सामन्यांत भारतीय संघाचं नेतृत्व करत 8 सामन्यांत विजय मिळवून दिला होता.
 
मॅच फिक्सिंगचा वाद
अजय जडेजा यांचं करिअर वेगानं झेप घेत असतानाच मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळं त्यावर ब्रेक लागला. डिसेंबर 2000 मध्ये त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी लावण्यात आली.
 
नोव्हेंबर 2004 मध्ये त्यांची याचिका फेटाळण्यात आली आणि नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे त्यांचे स्वप्न पूर्णपणे भंगले. त्यावेळी सुनावणीसाठी त्यांच्याकडून कोणीही हजर झालं नव्हतं.
 
पण, एका खंडपीठानं त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली होती.
 
ते दिल्लीच्या संघात परतले आणि कर्णधार बनले. 2005 मध्ये त्यांनी राजस्थान टीमचे कर्णधार आणि कोच अशी दुहेरी भूमिका निभावली.
 
निवृत्तीनंतरही ते कोच आणि कमेंटेटर म्हणून कायम क्रिकेटशी संलग्न राहिले.
 
नव्या रोलमध्येही हिट
अफगाणिस्तानच्या संघाचे मेंटर म्हणून अजय जडेजा यांनी या संघाची विचार करण्याची पद्धतच बदलली आहे. या संघाशी जवळून संबंध असणाऱ्यांच्या मते जडेजा यांनी या संघाला विजयाचा मंत्र शिकवला आहे.
 
हा संघ आता कोणत्याही संघाच्या विरोधात दबावात खेळत नाही, असा जडेजा यांचा दावा आहे.
 
"निडरता हे अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. ते कोणत्याही संघाच्या नजरेला नजर भिडवून त्यांचा सामना करू शकतात," असं जडेजा यांचं मत आहे.
 
पाकिस्तानचे माजी कर्णधार शोएब मलिक यांनी अजय जडेजा यांना खेळताना पाहिलं आहं. त्यांच्याबरोबर कमेंटेटर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
 
अफगाणिस्तानच्या संघात दिसणाऱ्या बदलाचे सर्वाधिक श्रेय हे जडेजा यांना द्यायला हवं, असं शोएब यांचं मत आहे.
 
अफगाणिस्तानच्या पाकिस्तानवरील विजयानंतर माध्यमांद्वारे शोएब मलिक यांची प्रतिक्रिया समोर आली. "मी अजय जडेजा यांना जवळून पाहिलं आहे. मी त्यांच्याबरोबर 2015 च्या वर्ल्डकपमध्ये एका चॅनेलसाठी काम केलं आहे.
 
क्रिकेटबाबत त्यांना असलेली समज हे त्यांचं वैशिष्टय आहे. तुमच्या आजुबाजुला योग्य लोकं असतील, तर त्याचा खूप फरक पडत असतो," असं ते म्हणाले.
 
हा फरक खरंच किती मोठा असतो याची जाणीव आता पाकिस्तान आणि इंग्लंडबरोबरच संपूर्ण जागाला होत आहे.