सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑक्टोबर 2023 (21:32 IST)

क्रिकेट वर्ल्ड कप IND vs AFG : रोहित शर्माची विक्रमांची बरसात, टीम इंडियाचा शानदार विजय

Cricket World Cup IND vs AFG:रोहित शर्माच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारतानं दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे विश्वचषकाच्या सामन्यात भारतानं 8 विकेट्स राखून विजय साजरा केला.
अफगाणिस्ताननं दिलेल्या 273 रन्सच्या लक्ष्यचा पाठलाग करताना रोहितनं धुवांधार शतक ठोकलं.
 
रोहितनं 84 बॉल्समध्ये 16 चौकारआणि 5 षटकारांच्या मदतीनं 131 धावा केल्या आणि इशान किशनच्या साथीनं सलामीला 156 धावांची स्फोटक भागीदारीही रचली.
 
त्यानंतर विराट कोहलीच्या साथीनं विराटनं 49 धावांची भागीदारी केली. विराटनं 55 धावांची नाबाद खेळी केली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. श्रेयस अय्यरनंही नाबाद 25 धावा केल्या.
अफगाणिस्तानकडून केवळ रशिद खाननं दोन विकेट्स काढल्या. त्यानंच इशान किशन आणि रोहित शर्माला बाद केलं.
 
पण रोहितनं तोवर विक्रमांची बरसात केली होती.
 
रोहितची विक्रमी खेळी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या सामन्यात रोहित शून्यावर बाद झाला होता, पण अफगाणिस्तानविरुद्ध त्यानं सगळ्या रन्स वसूल करून घेतल्या.
 
रोहित शर्मा बोलिंगऐवजी बॅटिंगकडे वळला आणि टीम इंडियाचा 'हिटमॅन' कसा झाला, इथे वाचा.
 
रोहितनं अफगाणिस्तानविरुद्ध ठोकलेलं शतक हे पुरुषांच्या वन-डे विश्वचषकात कुठल्याही भारतीयानं ठोकलेलं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे.
 
सचिन तेंडुलकरला मागे टाकत वन डे विश्वचषकात सर्वाधिक शतकांचा विक्रम आपल्या नावे केला आहे. या स्पर्धेत रोहितच्या नावावर आता 7 शतकं जमा आहेत. त्यातली पाच त्यानं 2019 सालच्या विश्वचषकात ठोकली होती.
 
या सामन्यात रोहितनं ठोकलेला तिसरा षटकार विक्रमी ठरला.
 
रोहितच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलनं 553 षटकार लगावले होते.
 
कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी20 या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून रोहितनं एकूण 556 सिक्सर्स सोडले आहेत.
रोहित शर्मानं वन-डे विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा करण्याच्या डेव्हिड वॉर्नरच्या विक्रमाची बरोबरी केलीय.
 
या स्पर्धेत हजार धावा करणारा रोहित चौथा भारतीय आहे.
त्याशिवाय रोहित आता वन-डे क्रिकेटमधील पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय
 
अफगाणिस्तानची झुंजार फलंदाजी
त्याआधी कर्णधार हशमतउल्ला शाहिदी आणि अझमतउल्ला ओमारझाई यांच्या अर्धशतकांच्या जोरावर अफगाणिस्तानं 8 बाद 272 रन्सची नोंद केली.
सामन्यात 3 विकेट्स झटपट परतल्यावर हशमतउल्ला आणि ओमरझाईनं या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 121 धावांची भागिदारी केली. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारताविरुद्ध केलेली ही पहिलीच भागिदारी आहे.
 
हशमतउल्लानं सर्वाधिक 80 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या विकेट्स ठराविक अंतरानं पडल्या.
 
भारताकडून बुमरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 39 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. बुमराहची विश्वचषक स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. हार्दिक पांड्यानं 2 तर शार्दूल आणि कुलदीपला प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
नवीन, विराट आणि 'स्पोर्टिंग स्पिरिट'
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यापेक्षा विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील लढतीची सर्वांना उत्सुकता होती.
 
त्यामागचं कारण आहे विराट आणि नवीनमधला वाद. यावर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यात विराट आणि नवीन यांच्यात वाद झाला होता.
 
अफगाणिस्तानचा जलदगती गोलंदाज नवीन उल हक दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो मैदानात येताच दिल्लीतल्या प्रेक्षकांनी कोहली, कोहली असा गजर करण्यात सुरूवात केली.
 
विराट कोहली फलंदाजीला आल्यानंतर नवीननं पुढं येत विराटशी हस्तांदोलन केलं. त्यानंतर विराटनंही नवीनची पाठ थोपटली.
 
या दोघांच्या खिलाडू वृत्तीला स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
 
हार्दिक पंड्याचा वाढदिवस
 
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचा 11 ऑक्टोबर हा वाढदिवस. भारत आणि अफगाणिस्तान सामन्याआधी हार्दिकचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
 
हार्दिकनं मैदानावर केक कापला, तेव्हा माजी क्रिकेटर गौतम गंभीरही तिथे होता. आपण वाढदिवसाच्या दिवशी पहिल्यांदाच मॅच खेळत असल्याचं हार्दिकनं सांगितलं.
 































Published By- Priya Dixit