शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. ओळख क्रिकेटपटूंची
Written By सॉ. अर्चना गजेंद्र भटूरकर|

अजित आगरकर

नाव : अजित भालचंद्र आगरकर
जन्म : ४ डिसेंबर १९७७, मुंबई
देश : भारत
कसोटी पदार्पण : भारत वि. झिंबाब्वे, हरारे १९९८
वन डे पदार्पण : भारत वि ऑस्ट्रेलिया, कोची १९९८
शैली : मध्यमगती गोलंदाज व उजव्या हाताचा फलंदाज

अजित आगरकर भारताचा आघाडीचा गोलंदाज आहे. महत्त्वाच्या क्षणी तो विकेट घेतो. अनेकदा फलंदाजीत शेवटचे शेपूट (तळातील फलंदाज) वळवळते नि कमी वाटणारी धावसंख्या अचानक वाढते. हे शेपुट गुंडाळणे ही आगरकरची खासीयत आहे. मात्र, त्याचवेळी तळात फलंदाजीला येऊन त्याने अनेकदा उपयुक्त फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याला अष्टपैलू असेही म्हटले जाते.
एकदिवसीय सामन्यात त्याचे पहिले ५० बळी विक्रमी वेळेत पूर्ण झाले. २००२ मध्ये क्रिकेटची पंढरी समजल्या जाणारया लॉर्ड्सवर त्याने आठव्या क्रमांकावर येऊन कसोटी शतक झळकवले. १३३ एकदिवसीय सामन्यात २०० बळी व १००० धावा काढण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. याआधी हा विक्रम द. आफ्रिकेच्या शॉन पोलॉकच्या नावावर होता. त्याने हा टप्पा १३८ एकदिवसीय सामन्यात पार केला होता.
२००३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असताना अॅडलेड येथे झालेल्या कसोटीत त्याने ४१ धावा देत ६ बळी मिळवले व भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आकड्यातील त्याची कारकिर्द अशी -

कसोटी
सामने धावा सरासरी सर्वोत्तम १००/५० बळी सर्वोत्तम झेल
२६ ५७१ १६.७९ १०९ १/० ५८ ६-४१ ६

वन डे
सामने धावा सरासरी सर्वोत्तम १००/५० बळी सर्वोत्तम झेल
१७९ १२४० १५.३० ९५ ०/३ २७० ६-४२ ८५