Jailer 2 Movie Review 'जेलर २' मध्ये रजनीकांत यांचा पुन्हा धुमाकूळ; पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा!
रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट जेलर २ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमारच्या सुपरहिट चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. लोकांमध्ये त्याची क्रेझ खूप जास्त दिसून येत आहे कारण या चित्रपटात बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनचा कॅमिओ आहे. पहिल्या भागाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर अपेक्षांचे डोंगर प्रचंड उंच होते. चला तर मग पाहूया, 'टायगर' मुथुवेल पांडियनची ही नवी इनिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते का!
कथानक
कथेची सुरुवात तिथूनच होते जिथे पहिला भाग संपला होता. निवृत्त जेलर मुथुवेल पांडियन (रजनीकांत) आता आपल्या कुटुंबासोबत शांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याच्या भूतकाळातील आणि पहिल्या भागातील घटनेचे काही धागेदोरे त्याच्या वर्तमानात वादळ निर्माण करतात. यावेळी धोका अधिक मोठा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेला आहे. नेटवर्क मोडण्यासाठी आणि कुटुंबासह देशाच्या सुरक्षेसाठी टायगरला पुन्हा एकदा हातात शस्त्र घ्यावे लागते. एस. जे. सुर्या आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या एन्ट्रीने मुख्य खलनायकाची बाजू अधिक भक्कम आणि धोकादायक झाली आहे.
सकारात्मक बाजू
रजनीकांत यांचा स्वॅग आणि स्क्रीन प्रेझेन्स: वयाच्या या टप्प्यावरही थलैव्हरचा पडद्यावरील स्वॅग, चालण्याची पद्धत आणि डायलॉग डिलीव्हरी थक्क करणारी आहे. 'जेलर २' मध्ये रजनीकांत ज्या प्रकारचे 'वलय' निर्माण करतात, ते खरोखरच उल्लेखनीय आहे. प्रत्येक दृश्यात, त्यांचे पात्र 'मुथुवेल पांडियन' पुढे काय करेल, याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, ते पडद्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवतात. दिग्दर्शक नेल्सनने आपल्या नेहमीच्या 'डार्क कॉमेडी'चा आणि ॲक्शनचा अत्यंत योग्य मेळ घातला आहे.
अनिरुद्ध रविचंदर हा या चित्रपटाचा खरा दुसरा हिरो आहे. प्रत्येक मास सीन आणि एन्ट्री सीनला त्याच्या संगीताने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. अनिरुद्धचे संगीत रजनीकांत वलयाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते.
पहिल्या भागाप्रमाणेच यात शिव राजकुमार, मोहनलाल आणि इतर कलाकारांचे कॅमिओ थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट मिळवून देतात. दरम्यान, या चित्रपटातील हृतिक रोशनचे काही क्लिप्स समोर आले आहेत. हृतिकला एका कॅमिओ भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
सहकलाकारांच्या भूमिकेत योगी बाबू आणि रम्या कृष्णन यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. योगी बाबू आणि नमो नारायणन यांच्या दृश्यांवरून प्रेक्षक नक्कीच खदखदून हसतील.
याव्यतिरिक्त, 'कल्पक' कुटुंबाची भूमिका साकारणारे मिथुन चक्रवर्ती, विद्या बालन, एस. जे. सूर्या आणि जतिन सरना यांनी कथानकात एक प्रकारची भीतीची भावना प्रभावीपणे निर्माण केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना एका पूर्णपणे नवीन भूमिकेत पाहणे आनंददायी होते. मात्र विद्या बालनच्या पात्राचे चित्रण अधिक चांगल्या प्रकारे केले जाऊ शकले असते.
मुख्य खलनायकाच्या भूमिकेत एस. जे. सुर्या यांनी रजनीकांत यांना तोडीस तोड टक्कर दिली आहे.
काही त्रुटी
सेकंड हाफमधील काही लांबलेले प्रसंग आहेत. चित्रपटाचा पहिला भाग जितका वेगाने जातो, त्यामानाने मध्यांतरानंतर कथा थोडी रेंगाळल्यासारखी वाटते. तसेच पहिल्या भागाप्रमाणेच कथेचा आराखडा असल्याने काही प्रसंगांचा अंदाज आधीच बांधता येतो.
'जेलर २' हा केवळ एक चित्रपट नसून रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी उत्सव आहे. जर तुम्हाला डार्क कॉमेडी, हाय-व्होल्टेज ॲक्शन आणि रजनीकांत यांचा मास अवतार आवडत असेल, तर हा चित्रपट थिएटरमध्येच पाहण्यासारखा आहे. पहिल्या भागाची यशस्वी परंपरा पुढे चालू ठेवण्यात दिग्दर्शक आणि कलाकारांची टीम यशस्वी झाली आहे.
चित्रपटाचे नाव: जेलर २ (Jailer 2)
कलाकार: रजनीकांत, रम्या कृष्णन, एस. जे. सुर्या, मिथुन चक्रवर्ती, शिव राजकुमार, मोहनलाल
दिग्दर्शक: नेल्सन दिलीपकुमार
संगीत: अनिरुद्ध रविचंदर
रेटिंग: (३.५/५)

