रावणाने एकदा परशुरामाचे धनुष्य घेऊन उचलायचा प्रयत्न केला. पण त्याचं वजन न पेलवल्यामुळे धनुष्य त्याच्यावर पडून तो उताणा पडल्याची कथा रामायणात सर्वांनीच ऐकली असेल. इथे संबंध रामायणाचा नसला तरी त्यातील उताणे पडण्याचा नक्कीच आहे. दुर्देवाने या व्यक्तीचे नाव रामगोपाल (वर्मा) आहे. आणि धनुष्याच्या जागी आग नावाचा चित्रपट आहे. शोले नावाचे शिवधनुष्य पेलण्याच्या नादात रामू सपशेल उताणा पडलाय.
रामगोपाल वर्मा की आग हा चित्रपट रसिकांपूर्वी एका व्यक्तीने नक्की पाहिला असावा. कारण त्याने त्याच्या चित्रपटासाठी जे नाव रजिस्टर्ड केलंय ते आहे, 'रामू पागल हो गया'. आग पाहिल्यानंतर त्याने रजिस्टर्ड केलेले शीर्षक किती चपखल आहे, याची खात्री पटते.
सलीम जावेदच्या पटकथेवर चित्रपट कसा बनवावा
IFM
IFM
याचा वस्तुपाठ रमेश सिप्पी यांनी घालून दिला होता. रामूने चित्रपट कसा बनवू नये याचा वस्तुपाठ घालून दिलाय. रामूच्या आगीचा तेवढाच उपयोग. शोलेची प्रतिमा डोक्यात ठेवून तुम्ही आग पहायला जात असाल तर घोर निराशा हा शब्दही अपुरा पडेल एवढी निराशा होईल. रामूने कथेचा मूळ साचा तोच ठेवून फक्त वातावरण बदलले आहे. पण त्यातील बदल एवढे भयानक आहेत, की ते पचविणे अवघड व्हावे.
रामगढच्या जागी शहर आले आहे. डाकूची जागा भाईने घेतलीय. शोलेची दृश्य थोड्याफार फरकाने तशीच घेतलीत. तेरा क्या होगा कालिया आणि अरे ओ सांबा असे संवाद नाहीत. पण त्या चालीवर दुसरे संवाद आहेत.
कथा शोलेचीच आहे. ठाकूरच्या जागी इन्सपेक्टर नरसिंहा आहे. त्याच्या कुटुंबियांना बब्बन (अमिताभ बच्चन) मारून टाकतो. बब्बनचा बदला घेण्यासाठी नरसिंहा हिरू आणि राज यांना निवडतो. शोलेमध्ये ही सगळी मंडळी लार्जर दॅन लाईफ होती. रामूच्या चित्रपटात ती फार छोटी बनली आहेत. चित्रपटात रोमांस आणि मौजमस्तीला फाटा दिला आहे. अमिताभ आणि धर्मेंद्रची केमिस्ट्री येथे प्रशांत व अजय देवगण यांच्यात दिसणार नाही.
अजय आणि निशा कोठारी यांच्यातील रोमॅंटिक सीन अनेकदा हद्द ओलांडताहेत असे वाटते. अजय देवगणचा सुसाईडचा प्रसंग आणि राजचा हिरूसाठी घुंगरूच्या आईशी लग्नासंदर्भात बोलणी करण्याचा प्रसंग अगदीच हास्यास्पद झाला आहे. चित्रपटाचा मध्यंतरापूर्वीचा भाग तरी कसाबसा सहन करता येतो. नंतर मात्र, दे दणादण हाणामारी आहे. ती सहन करणे कठिण जाते.
IFM
IFM
रामूने बब्बनच्या व्यक्तिरेखेवरच जास्त भर दिला आहे. त्यामुळे बाकीच्या व्यक्तरेखा पांगळ्या बनल्या आहेत. अमिताभचा बब्बन ठीक आहे. पण अनेकदा तो ओव्हरएक्टिंग करतो असे वाटते. अजय देवगण आणि प्रशांत राज यथातथाच आहेत. त्याला त्यांच्यापेक्षा त्या व्यक्तिरेखाला आलेले पंगुत्व कारणीभूत आहे. सुश्मिता सेन व निशा कोठारी यांचा अभिनय ठीक. मोहनलालचा अभिनय चांगला आहे, पण त्याचे हिंदी उच्चार खूप खटकतात. राजपाल यादव तर संतापजनक आहे.
अमित राय यांनी फोटोग्राफीच्या नावावर बरेच प्रयोग केले आहेत. पण ते सगळे चांगले आहेत, असे म्हणण्याचे धाडस करता येत नाही. वेगवेगळ्या कोनातून अनेक प्रसंग शूट केल्याने चेहरे अनेकदा अर्धेमुर्धे दिसतात. अमिताभचा सफरचंद फेकण्याचा शॉट छान जमलाय.
ब्रेक घेण्यासाठी गाणी उपयुक्त आहेत. ती लक्षात ठेवण्याची गरज नाही. तशी वेळही येत नाही. शोलेतील मेहबूबा गाणे उचलले आहे. त्यावर मराठी बाला उर्मिला छान नाचलीय. आणि हो अभिषेक बच्चन दर्शनही यावेळी होते.
शोलेमध्ये आऊट़डोअर शूटींग बरेच होते. ऊन, स्वच्छ
IFM
IFM
प्रकाश, वीरू-बसंती यांची छेडछाड होती. रामूच्या चित्रपटात अंधाराचे साम्राज्य आहे. मळकट, कळकटपणा आहे. नकोसे वाटणारे चेहरे आहेत. शोलेचा पूर्ण प्रभाव बाजूला ठेवून आग पाहिला तरी चटके बसावे असे त्यात काही नाही. कारण आग पार विझून गेलीय. उरलीय ती फक्त राख. आणि राखेचं आपण काय करतो. तर गंगेत सोडून देतो. तसेच याचेही करायचे इति गंगार्पणमस्तू.