एबीसीडी 2 : चित्रपट परीक्षण
बॉक्स ऑफिसवर रेमो डिसुझाच्या ‘एबीसीडी’ या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच ‘एबीसीडी 2’ हा प्रदर्शित झाला. हा चित्रपट नृत्याच्या अफाट जगाची सफर घडवणारा असून या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्रद्धा कपूर, वरूण धवन यांच्यासह डान्सचा किंग प्रभुदेवा यांच्या प्रमुख भूमिका हे आहे.
या चित्रपटाद्वारे रेमोने सालसा, हिप हॉप, कंटेंप्ररी आणि फ्यूजन अशा जगभरातील विविध नावीन्यपूर्ण नृत्यशैलींची पेशकश केली आहे. ‘एबीसीडी’पेक्षा यामध्ये एक पाऊल पुढे टाकण्यात रेमोला यश आले आहे हे मात्र नक्की. भारतातील रिअँलिटी शोमध्ये कॉपी केल्याबद्दल सर्वत्र टीकेची झोड उठलेला संघ लास वेगासमधील जागतिक स्पर्धेला कसा सामोरा जातो याभोवती ही कथा गुंफली आहे. सुरेश (वरूण) आणि विनी (श्रद्धा) हे दोघे नृत्यवेडे बालमित्र. अनेक रिअँलिटी शोमध्ये भाग घेऊन स्पर्धा जिंकणारा यांचा ग्रुप. ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये नृत्य कॉपी केले म्हणून संघ बाद होतो, देशभरात यांच्यावर टीकेची झोड उठते. मात्र, सुरेशच्या आईचे स्वप्न त्याला पूर्ण करायचे असते. जागतिक नृत्यात स्वत:चे नाव करायचे असते. त्यासाठी लास वेगास येथे होणार्या हिपहॉप स्पर्धेत त्याला संघ न्यायचा असतो. तेव्हा संघासाठी विष्णू (प्रभुदेवा) सर कोरिग्राफर म्हणून भेटतात. यानंतर संघ बांधला जातो. मात्र, विष्णू लास वेगासला गायब होतो, तो असे का करतो, इंडियन स्टनर्स संघ जिंकतो का हे चित्रपटात पाहायला हवे.

