गुरूवार, 8 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
Written By मनोज पोलादे|

कॅश

कॅश
PRPR

निर्माता : अनीष
दिग्दर्शक : अनुभव सिन्हा
संगीत : विशाल-शेखर
कलाकार : अजय देवगन, रितेश देशमुख, झायेद खान, शमिता शेट्टी, ईशा देवोल, दिया मिर्झा, सुनील शेट्टी

'कॅश' चित्रपटात 'दस'च्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनुभव सिन्हाच्या अंगलट आला आहे. 'दस' च्या तुलनेत 'कॅश' सात सुद्धा नाही. चित्रपटास स्टाइलिश बनवण्याच्या प्रयत्नात कथानकाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. आधुनिक, बुद्धिमान व चोरीसाठी तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्यार्‍या चोरांच्या टोळक्याभोवती कथानक फिरते.

अजय देवगण व सु‍नील शेट्टीची गँग मौल्यवान हिर्‍याच्या मागावर असते. हिर्‍यांच्या संरक्षणाची जबाबदारी शमिता शेट्टीवर असते. शमिता अजयच्या प्रेमात असते, मात्र तिला त्याच्या कारस्‍थानाबाबत माहिती नसते. कोट्यावधी रूपयांच्या हिर्‍यांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवलेल्या शमितास आपल्या प्रियकराबद्दल काहीच माहित नसणे, यावरूनच तीच्या चातुर्र्‍याची महती पटते, नाही का?

दिग्दर्शक अनुभव सिन्हाने चित्रपटातील कमकुवत दुवे झाकण्यासाठी आपले कौशल्य पणांस लावले आहे. कथानक कमजोर असल्याने प्रेक्षकांना डोके खाजवण्याची उसंत मिळून नये याची त्याने पूर्ण काळजी घेतली आहे. पुर्वाधात ‍चित्रपटास प्रचंड गती असल्याने प्रेक्षकांना वेगाशी ताळमेल घालणे कठीण होवून जाते. उत्तरार्धात वेग थोडा कमी‍ करून त्याने दर्शकांना उपकृत केले आहे.

दिग्दर्शकाने कथानकाऐवजी स्टंट दृश्य करण्यासाठीही डोक्याचा कीस पाडलेला दिसतो. दिग्दर्शकाच्या कल्पनेप्रमाणे स्टंट दृश्य करणे एकतर महाकठीण काम होते. कसेही करून स्टंट चित्रित केलेच तर त्यासाठी प्रचंड पैसा खर्ची पडला असता. दिग्दर्शकाने शक्कल लढवून सरळ ऍनिमेशनच साहय्याने ती दृश्ये पूर्ण केलीत.
PRPR


खेळणेसदृश्य विमानातून पैसे लुटण्याचे दृश्य हास्यास्पद झाले आहे. चित्रपटातील शॉट्सही पापणी लवण्याच्या आत बदलत असल्याने पुष्कळसा कमकुवतपणा लक्षातच येत नाही. चित्रपट स्टायलिश आहे, मात्र येथे ती निरर्थक ठरते. चित्रपटात प्रणयास काहीच स्थान नाही. विनोद व हास्य दृश्याचाही दुष्काळच. अजय व शमितामधील एक दृश्य मात्र दिलखुलास हसवते.

अजय देवगणचा अभिनय खुलला नाही. बहुतेक त्यास दृश्य समजण्यात अडचण आली असणार. त्याने दोनदा सांगितलेला किस्सा अस्पष्ट उच्चारणांमुळे कुणासही समजला नाही. रितेश तर झोपेतून सरळ सेटवर आल्यासारखा भासतो. झायेद जरा बरा वाटला. सुनील शेट्टी प्रत्येक चित्रपटात सारखाच वाटतो. नायिकांमध्ये शमितास अधिक वाव आहे.

तिने आपली भूमिका चांगली साकारली आहे. दिया सुंदर दिसली, मात्र ईशाचा मेकअप काही तिला सुट झाल्यासारखा वाटत नाही. विशाल-शेखरचे संगीत चित्रपटाच्या प्रकृतीशी साधर्म्य राखते. 'माइंडब्लोइंग माहिया' हे गाणे चांगले जमले आहे. रेमो व राजीव गोस्वामींचे नृत्यदिग्दर्शन उत्तम. एकंदरीत काय तर कॅश दिसायला मौल्यवान मात्र बाजारात मुल्य नसलेली नोट आहे.
PRPR