क्विक गन मुरूगन- फसलेले विडंबन
IFM
IFMदिग्दर्शक : शशांक घोष
कलाकार : राजेद्र प्रसाद, विनय पाठक, रणवीर शौरी, संध्या मृदुल, रम्भा, अश्विन मुश्रान
क्विग गन मुरूगनचे प्रोमोज पाहिले असतील दाक्षिणात्य काऊबॉयचा हा अवतार पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असाल. पण ही उत्सुकता समाधानात उतरविण्याचे सामर्थ्य मात्र या चित्रपटात नाही. छानपैकी उपहासात्मक प्रसंगाची तडतडबाजी पहाण्यासाठी तुम्हा जाता आणि फुसका फटाका मात्र नशिबी येतो. उत्तम कच्च्या मालातून चांगली भाजी शिजवण्याच्या नादात ती करपून गेली आहे.
शशांक घोष दिग्दर्शित 'क्विग गन मुरूगनमधील' मुरूगन हे पात्र त्यांनी आणि राजेश देवराज यांनी १९९४ मध्ये चॅनेल व्हीसाठी जन्माला घातले होते. आता तोच मुरूगन (राजेंद्र प्रसाद) पडद्यावर आला आहे. हा एक तमिळ काऊबॉय आहे. तो पक्का शाकाहारी आहे आणि राईसप्लेट रेड्डी हा त्याचा शत्रू आहे. हा राईस प्लेट रेड्डी मॅकडोसा कॉर्पोरेशनचा प्रमुख आहे आणि नॉन व्हेज डोसा बनविण्याची त्याची योजना आहे. पण मॅंगो डॉली (रंभा) या आपल्या मदतनीसाच्या सहाय्याने मुरूगन त्याची ही योजना उधळून लावतो. मधल्या काळात प्रेयसी लॉकेट लव्हर (अनू मेनन) आणि त्याची मदतनीस मॅंगो डॉली यांच्यात त्याचे भजे होते. हाही कथाभाग आहे.
हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटाच्या टिपीकल साच्यावर केलेले हे विडंबन आहे. मात्र ९० मिनिटे हे विडंबन खेचून नेताना पटकथाकार आणि दिग्दर्शकाची चांगलीच गोची झाली आहे. या पात्रातून टिव्हीसाठी थोडावेळ विनोद निर्माण करणे सहज शक्य आहे. पण एक आख्खा चित्रपट त्याला घेऊन तयार करणे अवघड. कारण त्यासाठी बांधीव पटकथा लागते. विडंबनाचा प्लॉट शेवटपर्यंत पटकथेत न्यावा लागतो. मुरूगन इथेच कमी पडला आहे. या पात्राला एका कथेत बांधण्याचा अट्टाहास पूर्णतः अयशस्वी ठरला आहे.
अभिनयाच्या बाबतीत मुरूगन झालेल्या राजेंद्र प्रसादने बहार आणली आहे. 'माईंड इट'चा पंच अप्रतिम. अनू मेनन आणि रंभाही कामे त्यांच्या भूमिकेला साजेशी. रावडी एमबीए झालेल्या राजू सुंदरमचे काम लक्षणीय आहे.
एकुणात, क्विक गन मुरूगन विडंबनातून विनोद या अपेक्षेची पूर्ती करत नाही. पटकथा बांधिव आणि चुरचुरीत संवाद असते तर मजा आली असती.

