सोमवार, 16 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
Written By वेबदुनिया|

'गजनी' - पैसा वसूल

गजनी   पैसा वसूल
IFM
निर्माता - अल्लू अरविंद, मधू वर्मा
कथा-पटकथा-दिग्दर्शक - ए.आर. मुरुगदास
गीतकार - प्रसून जोशी
संगीतकार - ए.आर. रहमान
कलाकार - आमीर खान, असीन, जिया खान, प्रदीप सिंह रावत

'मै तेरा खून पी जाऊंगा' असे म्हणत खलनायकाला लोळवणाऱ्या नायकांचा एक काळ होता. त्याच्या ठरावीक कथा असायच्या. त्या साच्यातच तो चित्रपट असायचा. पात्र तेवढी बदलायची. अगदी शोलेपासून कालच्या करण अर्जुन, ‘राम लखन’ पर्यंत कोणताही चित्रपट काढला, झाकला तरी यापेक्षा वेगळे काही दिसणार नाही. आई-वडिल किंवा आपल्या प्रेयसी, मित्र यापैकी कोणाच्या तरी खूनाचा सूड ही मध्यवर्ती थीम असायची. मारामारी, पल्लेदार डॉयलॉग हेही त्याचे वैशिष्ट्य असायचे. बॉलीवूडमधला हा ट्रेंड मधल्या काळात पार बदलला आणि हे चित्रपट आऊटडेटेड झाले. पण याच आऊटडेटेड कथेवर अतिशय सफाईदारपणे आजच्या काळात गजनी हा आमीर खानचा चित्रपट आलाय.

IFM
मल्टिप्लेक्सची सुरूवात झाल्यानंतर अशा पारंपरिक चित्रपटांची निर्मिती बंद झाली पण, आमीर खानने नव्या परंपरेला फाटा देत ‘गजनी’ ची निर्मिती केली. याची स्टोरी टिपिकल फिल्मी आहे. पण तरीही चित्रपट आमीरचा असल्याने हटके आहे. चित्रपटातील नायकाला ‘शॉर्ट टर्म मेमरी लॉस’ अर्थात अल्पकालीन स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. हीच थीम या कथानकाचे वेगळेपण दर्शवणारी आहे.

संजय सिंघानिया (आमिर खान) हा मोबाईल कंपनीचा मालक आहे. त्याला कोणतीही घटना पंधरा मिनिटांपेक्षा जास्त काळ स्मरणात राहू शकत नाही. तो सकाळी उठतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये काहीच विचार नसतात आणि त्याला काहीच आठवत नसते. डोळे उघडल्यानंतर 'मी कोण आहे? हा विचार त्याच्या मनात घोळू लागतो. मग हळूहळू आसपासच्या कागदांवर लिहिलेला मजकूर पाहून त्याला थोडे थोडे आठवू लागते.

IFM
संजय एक श्रीमंत उद्योगपती आहे आणि त्याची ‘एयर वाइस’ ही सेल्युलर फोन कंपनी आहे. त्याचे व्यक्तिमत्व अतिशय़ प्रभावी आहे. कल्पना (असीन) एक मॉडेल आहे तिचे संजयवर खूप प्रेम असते. ती संजयला कधीच भेटलेली नाही पण, त्याच्यावर प्रेम असल्याचे ती सर्वांना सांगत असते. माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत ती आपले प्रेम जाहीर करते. ही मुलाखत संजय वाचतो तेव्हा तो संतापतो. कल्पनाला अद्दल शिकवण्यासाठी तो तिच्याकडे जातो पण, तिला पाहून मोहित होतो. दोघे एकमेकांत गुंततात.

सगळे गुडी गुडी चालले असतानाच चित्रपटाला कलाटणी मिळते. काही गुंड मुलींची छेड काढत असतात. त्यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या कल्पना आणि संजयला ते खूप मारतात. त्यात कल्पनाचा मृत्यू होतो आणि संजयच्या डोक्याला गंभीर जखम होते. तो बरा होतो पण, त्याची स्मृती कमी होते. 15 मिनिटांच्या पूर्वीचे त्याच्या काहीच लक्षात रहात नाही. लक्षात ठेवण्यासाठी लिहून ठेवण्याची गरज भासू लागते. कल्पनाच्या मृत्यूचे दृश्यही त्याच्या समोर येऊ लागते आणि बदला घेण्यासाठी तो पेटून उठतो.

त्यातच त्याला जिया खान भेटते. ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे ब्रेन स्टडीमध्ये तिला रूची आहे. ती संजयला मदत करण्यास तयार होते. आणि अखेरीस संजय बदल घेतो, अशी याची थोडक्यात कथा.

‘गजनी’ मध्ये रोमॉटिक, एक्शन, थ्रिल असा भरपूर मसाला आहे. पण, ही एक चांगली प्रेमकथाही आहे. कथा सरळसोपी वाटते पण, तिच्यातले चढउतार पडद्यावर फार छान टिपले आहेत. प्रत्येक फ्रेम उत्सुकता वाढवते. दिग्दर्शक ए. मुरुगदास यांनी ही कथा उत्तमरित्या पडद्यावर उतरवली आहे. कधी रोमांस तर कधी ‍एक्शन, कधी थ्रिल यामुळे प्रेक्षक भारावून जातात. कल्पनाच्या भूमिकेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कायम हसणारी, निरागस आणि दुस-यांना मदत करण्याची भावना असणारी कल्पना पडद्यावर फार छान उतरली आहे. तिचा खून झाल्यावर प्रेक्षक सुन्न होतात आणि संजयला सहानुभूती मिळते.

चित्रपटात हिंसाचार खूप आहे. कल्पनाचा खून होताना आणि क्लायमेक्समध्ये आमीरचा अभिनय पाहण्याजोगा आहे. अर्थात असे असले तरी काही त्रुटीही आहे. पण चित्रपट एवढ्या गतीने पुढे जातो की, प्रेक्षकांना जादा विचार करण्याची सवडच मिळत नाही.

‘तारे जमीं पर’ च्या नंतर आमिरने यू टर्न घेऊन शुद्ध कमर्शियल चित्रपटात काम केले आहे. त्याला संवाद कमीच आहेत. पण, बदला घेण्यासाठी आग ओकणारे त्याचे डोळे सारे काही सांगून जातात. एक्शन दृश्यांमध्येही त्याचा अभिनय पाहण्याजोगा आहे. त्याचा बॉडीचा खूप प्रचार झाला आहे पण, चित्रपटात तेवढे काही नाही.

असीनने कल्पनाची भूमिका अतिशय छान केली आहे. विशेषतः रोमॅटिक दृश्ये तर पाहण्यासारखी आहेत. खून होतानाचा तिचा अभिनय लाजबाब. जिया खानही अगदी सहज वावरली आहे. गजनी या शीर्षक भूमिकेत प्रदीपसिंह रावतने जान आणलीय. क्रौर्य चेहऱ्यावर वागवणारा हा खलनायक डोळ्यात भरतो. गळ्यात सोन्याची चेन, अंगठी आणि पांढरे कपडे असा त्यांचा टिपिकल खलनायकी वेश आहे. ‘ऐसा मारेंगे कि उसका नाखून भी नहीं मिलेगा’ हा डॉयलॉग त्याच्या तोंडी आहे.

चित्रपटात अर्थातच हाणामारी भरपूर आहे. पण त्यात गिमिक्स फार नाहीत. एक्शन दृश्यांमध्ये कधीकधी दक्षिणात्य चित्रपटांचा टच दिसून येतो. चित्रपटाचे संगीत उत्तम आहे. ‘गुजारिश’ आणि ‘बहका’ ही गाणी हिटच झाली आहेत. रवी चंद्रन यांची सिनेमॉटोग्राफी उल्लेखनीय आहे.

जबरदस्त एक्शन, रोमांस, ठोके वाढविणारे थ्रिल, आकर्षक लोकेशनवर चित्री‍त करण्यात आलेली गाणी आणि तणाव असणारे ड्राम्यामुळे ‘गजनी’ पैसा वसूल करणारा चित्रपट आहे.