1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा
  6. चित्रपट परीक्षण : मैं तेरा हिरो

चित्रपट परीक्षण : मैं तेरा हिरो

आपल्या हास्यप्रधान सिनेमांतून प्रेक्षकांचं धम्माल मनोरंजन करणारे निर्माता दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा ‘मैं तेरा हिरो’ आज मोठय़ा पडद्यावर दाखल झालाय. गोविंदाला सोबत घेऊन राजा बाबू, हिरो नंबर वन, जुडवा, पार्टनर यांसारख्या अनेक सिनेमांतून प्रेक्षकांना गुदगुल्या करणार्‍या डेव्हिड धवन यांनी याहीवेळेस प्रेक्षकांना निराश केलेलं नाही. परंतु, यावेळेस धवन यांनी आपल्या हुकुमाचे एक्के म्हणजेच गोविंदा किंवा सलमान खान यांच्याशिवाय हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणलाय. कारण, या सिनेमात धवन यांनी आपला मुलगा वरुण धवन याला प्रेक्षकांसमोर आणलंय ‘मैं तेरा हिरो‘ हा तेलुगू सिनेमा ‘कांडिरीगा’ याचा रिमेक आहे. या सिनेमातही दिसतो तो प्रेमाचा त्रिकोण.. हा टिपिकल डेव्हिड धवन सिनेमा असल्याचं प्रत्येक क्षणी दिसत राहतं. सीलू उर्फ श्रीनाथ प्रसाद (वरुण धवन) अभ्यासासाठी बंगळुरूला जातो. यावेळेस त्याला स्टेशनवर सोडण्यासाठी त्याच्या आई-वडिलांसोबतच अनेक लोक दाखल झालेले असतात. खरं म्हणजे, सीलूला लिहिण्या-वाचण्यात अजिबात रस नाही. सीलूच्या सवयींना कंटाळून त्याच्या वडिलांनी (मनोज पाहवा) त्याला पुढच्या अभ्यासासाठी बंगळुरूला पाठविण्याचा निर्णय घेतलाय. कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर सीलू अभ्यासाच्या जवळजवळही फिरकत नाही आणि 

कॉलेजमधील सर्वात सुंदर मुलगी सुनयना (इलियाना) हिला आपलं बनविण्याचा निर्धार मात्र तो नक्की करतो. शहरातील सर्वात रागीट स्वभावाचा पोलीस इन्स्पेक्टर अंगद (अरुणोद्य सिंह) सुनयनावर जीव ओवाळून टाकतो, हे काही सीलू महाशयांना माहीत नाही. कॉलेजमध्ये अंगदला लोक एवढं घाबरतात की कुणीही सुनयनाकडे नजर उठवून पाहण्याचीदेखील हिंमत करत नाही. सुनयनाही अंगदला एवढं घाबरतेय की काही बोलूच शकत नाही. अंगदला जेव्हा सीलूबद्दल माहीत पडतं तेव्हा तो आपल्या गुंडांना सीलूची सुपारी देऊन टाकतो. परंतु, प्रत्येक वेळेस हे गुंड सीलूकडून मार खाऊन परत येतात. तेव्हा अंगद स्वत:च सीलूला धडा शिकवण्याचं ठरवतो. याच दरम्यान, सीलू काही असे फासे फेकतो ज्यामुळे अंगदला पोलीस फोर्समधून निलंबित केलं जातं. सीलू आणि सुनयनाला वेगळं करण्यासाठी मग अंगद अंडरवर्ल्ड डॉन विक्रांतसोबत (अनुपम खेर) जाऊन मिळतो. डॉन विक्रांतची एकुलती एक मुलगी आयशा (नर्गिस फाखरी) सीलूवर एकतर्फी प्रेम करतेय. आयशाला कोणत्याही प्रकारे सुरतमध्ये आपलं प्रेम हस्तगत करायचंय. डॉन विक्रांतचे गुंडे सुनयनाचं किडनॅप करून तिला परदेशात घेऊन जातात. साहजिकच, सीलू आणि अंगदही इथं दाखल होतात. वरुण धवननं यावेळी डेव्हिडचा गोविंदा बनण्याचा प्रयत्न केलाय. डेव्हिड आणि गोविंदाचे सिनेमे वारंवार पाहूनच वरुण कॅमेर्‍यासमोर उभा राहिला होता की काय? असं वारंवार प्रेक्षकांना वाटत राहतं.