1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. चित्रपट समीक्षा

डोक्याला फूल आणि फायनल ताप

निर्माता - फिरोज नाडियादवाला
दिग्दर्शक - अहमद खान
संगीत- हिमेश रेशमिया
कलाकार - सनी देवल, शाहिद कपूर, विवेक ओबेरॉय, समीरा रेड्डी, आयेशा टाकिया

IFM
निर्माता फिरोज नाडियादवालाचा फूल अँड फायनल हा चित्रपट बनविण्यासाठी हातचे काहीच राखलेले नाही. वाट्टेल तेवढा पैसे खर्च केला आहे, पण मुळात कथेच्या नावानेच बोंब असेल तर एवढे काही केल्याचा काही उपयोग आहे का ?

अहमद खान यांच्याकडे नाडियादवालासारखा नावाजलेला निर्माता आणि नामवंत कलावंतांची फौज एवढे सारे दिमतीला असूनही ते त्यांनी अक्षरशः वाया घालविले आहे. एखाद्या चांगल्या दिग्दर्शकाकडे एवढे सारे असते, तर त्याने अतिशय चांगला चित्रपट बनवला असता. पण अहमद खान यांना ते अजिबात जमले नाही.

IFM
त्यांनी सारी शक्ती चित्रपटाचा लूक चांगला दिसण्यात घालवली नि कथेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे होते की काय स्टायलिश लूक अर्धातास बरा वाटतो, पण त्यानंतर कथेची बोंबाबोंब सुरू होताच, पडद्यावर जे काही चाललंय त्याचा वीट येऊ लागतो.

आता याची कथा म्हणजे काय तर कथानक घडते ते दुबईत. (हल्ली भारतात काहीच घडत नाही. सगळं काही परदेशात) तर, एका हिऱ्याच्या मागे अनेक जण लागले आहेत. प्रत्येकाचा हेतू वेगळा. कुणाला त्यातून माल कमवायचा आहे, तर कुणाला स्वतःच्या विवंचना संपवायच्या आहेत.

प्रत्येक नायकाची हिऱ्याच्या मागे पडण्यामागची कथा एकत्र येऊन एकूण चित्रपटाची गोधडी विणली आहे. त्यामुळे झाले काय की कशाचाच एकसंध परिणाम होत नाही. म्हणजे चित्रपटाचा नायक कोण हेच कळत नाही. त्यामुळे चित्रपट कुणाच्या नजरेतून पहायचा असा बापुडवाणा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.

नामवंत कलाकारांची फौज असूनही त्यांचा उपयोग पॅचअप वर्कसाठी केला आहे. त्यामुळे कुणीच फूल आणि फायनल सापडत नाही. सगळे अर्धमुर्धे. अगदी छोट्यातली छोटी भूमिकाही एखाद्या नावाजलेल्या कलाकारानेच केली आहे.

IFM
त्यातल्या त्यात शाहिद कपूरने चांगले काम केले आहे. बाकी सनी देवल आपल्या प्रकृतीला जागून योग्य त्या ठिकाणी योग्य तेवढी हाणामारी करतो. विवेक ओबेरॉय ठीक. समीरा रेड्डी व आयेशा टाकिया यांना सुंदर दिसण्याबरोबरच त्यांच्या नायकांबरोबर मम आत्मना म्हणण्याइतकच काम दिले आहे.

चित्रपटाचे खरे हीरो परेश रावल व जॉनी लिव्हर आहेत. त्यांच्या दोघांमधील जुगलबंदी पाहण्यासारखी आहे. बाकी ओमपुरी, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, शर्मिला टागोर, असरानी हे सारे बडे कलाकार चवीसाठी घेतले आहेत.

IFM
चित्रपटात गाण्यासाठी कुठेही संधी नसताना दिग्दर्शकाने ती कोंबून भरण्याचे काम योग्य केले आहे. हिमेश रेशमियांचे संगीत कोंबून या शब्दाला साजेसे आहे. अहमद खान हे मूळातले कोरीयोग्राफर. त्यामुळे त्यांनी या अंगाकडे चांगलेच लक्ष दिले आहे.

त्यामुळे चित्रपट पहायचा असेल तर डोकं घरी ठेवा नि जे समोर चाललंय ते कुठलाही प्रश्न न विचारता पहात रहा. (ध्यान नावाच्या स्थितीत काहीसं असंच असतं म्हणतात.) थोडक्यात काय तर फूल अँड फायनल नावाचे ध्यान पहा नि समाधी म्हणजे झोपावस्थेत जा.
About Writer
मनोज पोलादे
उपसंपादक.... आणखी वाचा